आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
चीनमध्ये वुहान शहरात होणाऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी,
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. काल रात्री वुहान
विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. जागतिक, प्रादेशिक
आणि द्विपक्षीय मुद्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा होणार आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी २९ एप्रिलला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशावासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३वा
भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा बीड चा कुस्तीपटू
राहुल आवारेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत गौरव केला. राहुलनं ५७
किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा स्पर्धांमध्ये पदक
पटकावणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापूर्वीच घेतला असल्यामुळे
आता राहुलनं २०२२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागावं, त्यासाठी प्रशिक्षणासह
आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन पाठबळ देईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्याला
प्रोत्साहन दिलं.
****
मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात राज्याला स्वावलंबी बनवण्यासाठी
विभागानं नियोजनबद्ध योजना आखावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
मुंबई इथं मत्स्य व्यवसाय विकासासंदर्भात राज्यस्तरीय
बैठकीत ते बोलत होते. राज्यात मत्स्य
व्यवसायाला चालना देताना या क्षेत्रात योजना, योजनांची
गती आणि नियोजन यासंदर्भात मिशनमोड स्वरूपात काम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
भंडारा-गोंदिया- पालघर या लोकसभा मतदारसंघात तर सांगली
जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये येत्या २८ मे रोजी पोटनिवडणूक
होणार अहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया इथं निवडणूक
होत आहे, तर डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस कडेगाव मतदारसंघाची निवडणूक होणार
आहे. ३१ मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार
आहे.
****
औरंगाबाद
महानगरपालिका आयुक्तपदी डॉ.निपुण विनायक यांची बदली करण्यात आली आहे. सध्या केंद्र
सरकारच्या स्वच्छता अभियान या उपक्रमाचे सचिव असलेले विनायक यांचे बदली आदेश काल जारी
करण्यात आले. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून ह्या पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे
आहे.
//********//
No comments:
Post a Comment