Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल
२०१८
दुपारी १.०० वा.
****
१२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या
गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी मंजुरी दिली आहे. आता हा अध्यादेश देशभरात लागू झाला आहे. यानुसार १२ वर्षांखालील
बालकांवर लैंगिक अत्याचारासाठी फाशी, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या - किशोरवयीनांवर
लैंगिक अत्याचारासाठी पूर्वीच्या १० वर्षांऐवजी २० वर्ष तुरुंगवास, किंवा जन्मठेपेची
तरतूद करण्यात आली आहे.
फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेशालाही राष्ट्रपतींनी
मंजूरी दिली आहे. या अध्यादेशानुसार आर्थिक गुन्ह्यानंतर फरार झालेल्यांची तसंच कर्ज
बुडव्यांची संपत्ती, आता जप्त करता येणार आहे.
****
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या
कंपन्यांनी स्वत:ला अमेरिकेमध्ये दिवाळखोर घोषित करून घेण्याच्या कार्यवाहीमध्ये भारत
सरकारनं हस्तक्षेप केला आहे. भारतामध्ये नीरव मोदीच्या कंपन्यांची चौकशी सुरू असताना,
अमेरिकेमध्ये या कंपन्या दिवाळखोर घोषित झाल्या तर पंजाब नॅशनल बँकेच्या हिताला धोका
पोहोचेल, हे लक्षात घेत सरकारनं हे पाऊल उचललं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
ग्रामीण भागातल्या क्षमतांना मुख्य आर्थिक
प्रवाहाशी जोडण्याची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र
मोदी ॲपच्या माध्यमातून भाजपच्या देशभरातल्या आमदार आणि खासदारांशी आज संवाद साधताना
पंतप्रधानांनी, महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यासाठी, स्वच्छता अभियानाला
केंद्रस्थानी ठेवून सूचना देण्याचं आवाहन केलं. लोकहिताच्या प्रत्येक कामात भाजप नेत्यांनी
सहभागी व्हावं, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे
****
पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक
वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील, असं भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर
ऊर्जित पटेल यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन इथे आंतरराष्ट्रीय अर्थपुरवठा समितीला ते
संबोधित करत होते. जागतिक मागणीमध्ये वाढ होत असल्यानं निर्यात वाढेल, नवीन आर्थिक
गुंतवणुकीला चालना मिळेल, आणि आर्थिक वृद्धीची गतीही वाढेल, असं मत पटेल यांनी व्यक्त
केलं.
****
२०२० ते २०२५ या कालावधीत केंद्रीय गृहमंत्रालयासाठी
साडेतीन लाख कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता असल्याचं गृहमंत्रालयानं पंधराव्या
वित्त आयोगासमोर सांगितलं आहे. अंतर्गत सुरक्षा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल,पोलिस यंत्रणेचं
आधुनिकीकरण, सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि केंद्रशासित प्रदेश, यासाठी हा निधी
लागणार आहे. केंद्र आणि राज्यसरकारांच्या एकत्रित
आणि समन्वयित प्रयासांमुळे देशातल्या अंतर्गत
सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
हातमाग विणकरांना प्रोत्साहन मिळावं या
दृष्टिकोनातून, राज्याच्या वस्त्रोद्योग विभागातर्फे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचं
आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या वस्त्राला पंचवीस हजार
रुपये, दुसऱ्या क्रमांकाला वीस हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला पंधरा हजार रुपयांचं बक्षीस
दिलं जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हातमागावर विणलेल्या कापडाचे नमुने, वस्त्रोद्योग
विभागाच्या मुंबईतल्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयात पाठवावेत. तसंच अधिक माहितीसाठी
०२२ - २५ ४० ५३ ६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं वस्त्रोद्योग विभागानं कळवलं आहे.
****
साहित्यात लेखक केंद्री पंरपरा
बदलणे गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ
समीक्षक डॉ.हरिशचंद्र थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त, आज औरंगाबाद इथं, मराठवाडा साहित्य
परिषदेच्या वतीनं आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. साहित्यामध्ये
वाचक आणि वाचन प्रक्रीयेला केंद्रस्थानी ठेवणं महत्त्वाचं
असल्याचं ते म्हणाले. दोन सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमात विंदा करंदीकरांच्या साहित्यावर
आधारित चर्चा तसंच विविध निबंधांचं वाचन होणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या परिवर्तन या संस्थेतर्फे
साजऱ्या होणाऱ्या शेक्स्पिअर महोत्सवाच्या
यंदाच्या चौथ्या वर्षीच्या कार्यक्रमात आज, समकालीन भारतीय रंगभूमी, या विषयावर आशुतोष पोतदार यांचं व्याख्यान, तसंच, शेक्सपिअर
नाट्यदर्शन, हा कार्यक्रम होणार आहे. शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालय परिसरातल्या
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आज संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरू
होईल.
*****
***
No comments:
Post a Comment