Sunday, 22 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं नो युवर कस्टमर या प्रणालीच्या मार्गदर्शक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. सरकारनं मनी लाँडरिंग प्रतिबंधक नियमांमध्ये गेल्या जून महिन्यात सुधारणा केल्यामुळे केवायसीच्या नियमांमध्ये हे बदल केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.राष्ट्रीय बायोमेट्रिक ओळखपत्र आधार ची बँकखात्याशी जोडणी करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयानं आधार पत्र अनिवार्य करण्यासंदर्भात निर्णय दिल्यानंतरच याची अंमलबजावणी होईल. आतापर्यंत केवायसी साठी निवासाचा पुरावा, पॅन क्रमांक आणि छायाचित्र  ही कागदपत्रं आवश्यक होती, सुधारित नियमांनुसार यासाठी आता आधारपत्र आणि पॅनक्रमांक आवश्यक असतील.

****

 आज जागतिक वसुंधरा दिन आहे. पर्यावरण संरक्षणाला समर्थन देण्याच्या उद्दिष्टानं जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो.१९७० या वर्षापासून युनेस्कोनं हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. या वर्षीच्या या दिनाचं घोषवाक्य आहे- प्लास्टिक प्रदूषण संपवा.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या लोकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा त्रेचाळीसावा भाग असेल. नागरिकांना आपली मतं आणि सूचना नरेंद्र मोदी ॲपवर, किंवा माय जीओव्ही या खुल्या मंचावर पाठवता येतील. किंवा, १८००-११-७८०० या निशुल्क वाहिनीवर रेकॉर्ड करता येतील. तसंच १-९-२-२ या क्रमांकावर मिस कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या एसएमएस मधल्या लिंकवरून थेट पंतप्रधानांना संदेश पाठवता येईल.

****

 नेपाळमधल्या ललितपूर इथे कालपासून सुरू झालेल्या दक्षिण आशियायी ज्यूडो अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी काल सगळ्या म्हणजे चारही वजनगटातली सुवर्णपदकं जिंकली तर पुरुष खेळाडूंनी दोन वजनगटातली कांस्य पदकं मिळवली.

****

केंद्र सरकारनं नागालँडच्या दोन उग्रवादी संघटनांसोबतच्या संघर्ष विराम कराराला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. नॅशनल सोशलिस्ट काउंन्सिल ऑफ नागालॅंडच्या एन आणि आर या गटांशी असलेल्या या कराराला पुढच्या वर्षीच्या सत्तावीस एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे.

*****

***

No comments: