Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ एप्रिल
२०१८
दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी चीन च्या भेटीसाठी जाणार असून, तिथल्या
वुहान शहरात ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत अनौपचारिक शिखर बैठक करणार
आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल पेइचिंग मध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री
वांग यी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वराज या सध्या
चीनच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय आणि चिनी लोकांनी एकमेकांच्या भाषा शिकाव्यात, त्यामुळे
संवादातले अडथळे दूर होऊन दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असं मत
स्वराज यांनी आज बीजिंग इथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं.
****
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात
काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे
सभापती एम.वेंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे. या प्रस्तावात महाभियोगासाठी सबळ कारण
नसल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. हा प्रस्ताव अयोग्य त्यामुळे तो फेटाळला गेल्याची
प्रतिक्रिया भाजपचे नेते नलिन कोहली यांनी व्यक्त केली, तर, हा केवळ न्यायाधीशांना
दबावात ठेवण्यासाठीचा काँग्रेसचा प्रयत्न होता, असा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी
यांनी केला. याबाबत पुढे कोणतं पाऊल उचलायचं हे आता पक्ष ठरवेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ
वकील आणि काँग्रेस नेते केटीएस तुलसी यांनी केलं आहे. भारताचे माजी अटॉर्नी जनरल सोली
सोराबजी यांनी नायडू यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांसह
सर्वोच्च न्यायालयाच्या इतर सर्व न्यायमूर्तींनी आज पंधरा मिनिटं उशिरानं आजच्या कामकाजाला
सुरुवात केली. या पंधरा मिनिटांमध्ये आजच्या घटनाक्रमाबाबत त्यांनी चर्चा केली असावी,
असा अंदाज पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आला आहे.
****
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी
आज पक्षाच्या देशव्यापी ‘संविधान बचाओ‘ अभियानाची सुरुवात करत आहेत. भाजप सरकारच्या
काळात देशाच्या संविधानावर आणि दलितांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांच्या निषेधार्थ
काँग्रेस हे अभियान हाती घेत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुढील वर्षाच्या
चौदा एप्रिलपर्यंत हे अभियान सुरू राहणार असून, याकडे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी
लोकांपर्यंत पोचण्यासाठीचे काँग्रेस पक्षाचे प्रयत्न, अशा दृष्टीनं पाहिलं जात असल्याचं
पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई
च्या शाळांमध्ये, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आणि शारिरीक
शिक्षणाच्या तासाला दररोज उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात येणार आहे. या विषयासाठी
विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येणार असून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षांना
पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा विषय शिकणं आवश्यक करण्यात आलं आहे. मंडळानं जारी
केलेल्या नवीन नियमांनुसार प्रत्येक इयत्तेसाठी रोज खेळाचा तास असणंही अनिवार्य करण्यात
आलं आहे. शालेय विद्यार्थ्यांमधल्या लट्ठपणाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी
हे निर्णय मंडळानं घेतले आहेत.
****
रस्त्यांवरच्या सुरक्षेबाबत लोकांमध्ये
जागृती आणण्याच्या हेतूनं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयानं आजपासून
येत्या तीस तारखेपर्यंत एकोणतिसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं आहे. गृहमंत्री
राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नीतिन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमातून
या सप्ताहाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री
दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत या सुरक्षा सप्ताहाची आजपासून सुरुवात होत आहे. या
सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
अपघातांची कारणं आणि ते टाळण्याचे उपाय याबाबत माहिती दिली जाणार आहे.
****
राज्यातल्या
शेतकऱ्यांना या खरीप हंगामासाठी बीटी बियाण्याचाच वापर करावा लागेल, असं कृषीमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. गुलाबी बोंड अळीचं व्यवस्थापन या विषयावरच्या एका
बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या कृषी विद्यापीठांना आणि संशोधन संस्थांना नॉन
बीटी बियाणं विकसित करण्याचे निर्देश दिले असल्याचं सांगून, ते बियाणं उपलब्ध होईपर्यंत
शेतकऱ्यांनी बीटी बियाण्याचाच योग्य ती दक्षता घेत उपयोग करावा, असं फुंडकर यांनी यावेळी
सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment