Tuesday, 24 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला;

Ø  या निर्णयाला काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

Ø  विधीसंघर्ष ग्रस्त बालकांशी निगडित प्रकरणातल्या साक्षीदारांसाठी योग्य अशी न्यायालयीन खोली बनवण्याबाबत सरकारनं विचार करावा - मुंबई उच न्यायालयाचे निर्देश

Ø  पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिकचा कर तसंच अधिभार रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

आणि

Ø  राज्यातल्या ६५४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २७ मे रोजी मतदान

*****



 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम.वेंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे. या प्रस्तावात महाभियोगासाठी सबळ कारण नसल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे.

 देशाचे माजी महान्यायवादी सोली सोराबजी यांनी उपराष्ट्रपतींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काँग्रेस पक्षानं मात्र या निर्णयावर टीका करत, उपराष्ट्रपतींच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. सर्वंकष चौकशी न करता, हा निर्णय घाईघाईनं घेतल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला.

****

 बाल न्याय कायद्याअंतर्गत ज्या विधी संघर्ष ग्रस्त बालकाची चौकशी सुरू आहे, किंवा अशा प्रकरणातल्या साक्षीदारांसाठी योग्य अशी न्यायालयीन खोली बनवण्याबाबत सरकारनं विचार करावा, असे आदेश मुंबई उच न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात बाल कल्याण मंडळ आणि बाल न्याय मंडळात किती पदं रिकामी आहेत, तसंच, बाल न्याय कायद्यातल्या कोण कोणत्या तरतुदींची अजून अंमलबजावणी झालेली नाही, या संबधीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारनं सादर करावा, असंही उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. उच्च न्यायालयानं स्वत:हून दाखल करून केलेल्या, एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल हे आदेश दिले.

****

 काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काल पक्षाच्या देशव्यापी ‘संविधान बचाओ‘ अभियानाला प्रारंभ केला. देशाच्या संविधानावर आणि दलितांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांच्या निषेधार्थ हे अभियान हाती घेत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुढील वर्षाच्या चौदा एप्रिलपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

****

 गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलानं काल आणखी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. परवा याच परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी मारले गेले होते. या सोळापैकी अकरा नक्षलवाद्यांची ओळख पटल्याचं, सुरक्षा दलाकडून सांगण्यात आलं.

****

 राज्यातल्या विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावं, यासाठी नियोजन विभागानं कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिले आहेत. मराठवाडा विकास मंडळ, विदर्भ विकास मंडळ, आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची काल राजभवनात संयुक्त बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

 रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुचर्चित नाणार प्रकल्पासाठी जारी केलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेली नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ही अधिसूचना रद्द झाल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्याचा उल्लेख शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार इथल्या जाहीर सभेत केल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी, अशी अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाही तर उच्च अधिकार समितीला असतात, असं नमूद केलं आहे.

****

 ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगांना बळ देण्यासाठी सरकारला विविध उपाय सुचवले असून, त्याबाबत सरकार विचार करेल अशी अपेक्षा, माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घेतला आहे, मात्र ज्या राज्यात जो घटकपक्ष प्रभावी असेल, त्याचं नेतृत्व अन्य घटकपक्षांनी मान्य करावं, असं धोरणही ठरवण्यात आलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.

****

 राज्यात अत्याधुनिक वाहतुक नियोजन यंत्रणेचा वापर आधी मुंबईत करण्यात येणार असून, त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत, राज्यातल्या रस्ते सुरक्षा पंधरवड्याचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर.  डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलवर लावलेला अधिकचा कर अन्यायकारक असून, तो कमी करवा आणि इंधनावरचे विविध अधिभार त्काळ रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. पेट्रोल-डिझेलला जीएसटी वस्तू सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.

****

 राज्यातल्या ६५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर दोन हजार ८१२ ग्रामपंचायतींमधल्या चार हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे. या ६५४ ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचीही थेट निवडणूक होणार आहे. सात मे ते बारा मे या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, १६ मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील, २७ मे रोजी मतदान आणि  मतमोजणी २८ मे रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये  औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार, बीड दोन, नांदेड सात, परभणी एक, उस्मानाबाद तीन, लातूर पाच, तर अहमदनगर जिल्ह्यातल्या ७७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पोटनिवडणूक होणाऱ्या जागांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४१, बीड ३५, नांदेड १७७, परभणी ४०, उस्मानाबाद ६५, जालना २८, लातूर ९४, हिंगोली ५५, तर अहमदनगर जिल्ह्यातल्या १२४ जागांचा समावेश आहे.

****

 परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज २४ एप्रिलऐवजी उद्या २५ एप्रिलला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले.  बँकेचे संचालक, बाबाजानी दुर्राणी यांचं संचालकपद रद्द करण्याच्या सहकार खात्याच्या निर्णयाला, दुर्राणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, त्या याचिकेची सुनावणी आज होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्याचे निर्देश न्यायालयानं दिले.

****



 विधान परिषदेच्या उस्मानाबाद लातूर बीड या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या एका जागेसाठी २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, सात मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. येत्या २१ मे रोजी मतदान होणार असून, एक हजार सहा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

****

 पैठण इथल्या संत एकनाथ साखर कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक अनियमितता आणि सहकार कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे, सहनिबंधक सहकारी संस्थेनं ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. जालना तसंच मंठा शहरात ही कारवाई करण्यात आली. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान परवा झालेल्या सामन्यावर सट्टा लावताना, पोलिसांनी त्यांना अटक केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या या कारवाईत अनेक मोबाईल फोन, एलसीडी टीव्हीसह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

****

 औरंगाबाद इथं निर्माण झालेल्या कचरा समस्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात कालपासून, महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं होतं, महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं.

*****

***

No comments: