Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
सरन्यायाधीश दीपक मिश्रा
यांच्या विरोधातला महाभियोग प्रस्ताव फेटाळल्याबद्दल काँग्रेस पक्षानं उपराष्ट्रपती
तसंच राज्यसभेचे सभापती एम.व्यंकय्या नायडू यांच्यावर टीका केली आहे. उपराष्ट्रपतींच्या
या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं पक्षानं सांगितलं आहे. काँग्रेस
पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. सर्वंकष चौकशी
न करता, हा निर्णय घाईघाईनं घेतल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला.
****
फिजिओथेरपी या विषयाच्या
पदवी अभ्यासक्रमासाठी योगशास्त्र विषयाच्या पदविका धारक उमेदवारांना प्राधान्य मिळेल,
असं विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलं आहे. या संदर्भात नेमलेल्या तज्ज्ञ समितीनं
ही सूचना केली असून, प्रवेश परीक्षेतले गुण आणि इतर पात्रता निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या
उमेदवारांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या
बहुचर्चित नाणार प्रकल्पासाठी जारी केलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेली नाही,
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ही अधिसूचना रद्द झाल्याची
घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्याचा उल्लेख शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
यांनी नाणार इथल्या जाहीर सभेत केल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी, अशी अधिसूचना
रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाही तर उच्च अधिकार समितीला असतात, असं नमूद केलं
आहे. या प्रकल्पाबाबतचा निर्णय कोकण आणि राज्याचं हित लक्षात घेऊनच घेतला जाईल, असंही
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
राज्यात अत्याधुनिक वाहतुक
नियोजन यंत्रणेचा वापर आधी मुंबईत करण्यात येणार असून, त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर
राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली.
राज्यातल्या रस्ते सुरक्षा पंधरवड्याचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षित
प्रवासाबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं.
****
ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर
उद्योगांना बळ देण्यासाठी सरकारला विविध उपाय सुचवले असून, त्यांच्या अंमलबजावणीबाबत
सरकार विचार करेल अशी अपेक्षा, माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत
होते. आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षानं घेतला आहे. मात्र, ज्या राज्यात जो घटकपक्ष प्रभावी असेल, त्याचं नेतृत्व अन्य
घटकपक्षांनी मान्य करावं, असं धोरणही ठरवण्यात आलं आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर
जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित असलेला
इंटरचेंज पॉईंट, अर्थात चढ-उतार स्थळ, इतरत्र हलवलं जाऊ नये, या मागणीसाठी या तिन्ही
गावातल्या शेतकऱ्यांनी आज जालना-राजूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. काही उद्योजक,
अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा पॉईंट खादगाव शिवारात हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचा
आरोप करत, शेतकऱ्यांनी, नायब तहसीलदार संदीप ठाकणे यांना मागण्यांचं निवेदन दिलं.
****
औरंगाबाद इथं निर्माण झालेल्या
कचरा समस्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात आजपासून, महापालिका
कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं. कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करावं, सार्वजनिक
स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी कायमस्वरुपी कर्मचारी नियुक्त करावेत, आदी मागण्या आंदोलकांकडून
करण्यात आल्या आहेत.
****
जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट
सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. जालना तसंच मंठा शहरात
ही कारवाई करण्यात आली. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान काल झालेल्या
सामन्यावर सट्टा लावताना, पोलिसांनी त्यांना
अटक केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या या कारवाईत अनेक मोबाईल फोन, एलसीडी टीव्हीसह रोख
रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
****
राज्यात अकोला, वाशिमसह विदर्भातल्या
काही जिल्ह्यात येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान
खात्यानं आज जारी केला आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मच्छीमारांना आज
देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment