Monday, 30 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

*****



 ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत दिवस आज साजरा केला जात आहे. देशातल्या ग्रामीण भागात आरोग्य शिबीरं आयोजित करुन त्यात आयुष्मान भारत योजनेची माहिती त्यात दिली जात आहे. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशनबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामसभाही घेतल्या जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.   

****



 जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा इथं सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी आज सकाळी शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 मुंबई पुणे महामार्गावर पनवेल नजीक आज सकाळी कार आणि टेम्पोच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, नादुरुस्त कारला धक्का मारत असताना टेम्पोनं धडक दिल्यानं, हा अपघात झाला. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

****

 शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि आत्महत्येच्या विचारातून परावृत्त करण्यासाठी उद्या एक मे पासून मराठवाडा तसंच पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यांमधून शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. मंत्रालयात प्रवेश करून आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून या सन्मान यात्रेला प्रारंभ होणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिरढोण इथं या शेतकरी सन्मान यात्रेचा नऊ मे रोजी समारोप होणार असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी यावेळी दिली.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात सात लाख अकरा हजार हेक्टर म्हणजेच सुमारे शंभर टक्के क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. यापैकी दोन लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, तीन लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, २३ हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, तर ६० हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी प्रस्तावित असल्याचं, कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं आज शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगपूरा इथल्या महात्मा ज्योतिबा फुले चौकातून या अभियानाला सुरुवात केली. शहरातल्या नऊ प्रभागात प्रभाग सभापती, नगरसेवक, वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी हे अभियान राबवत आहेत. नागरिकांनी स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरण करण्याचं आवाहन भापकर यांनी केलं आहे.

****



 उत्तराखंडमधल्या बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराचे दरवाजे काल उघडण्यात आले असून, उत्तराखंड सरकारनं केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

****

 संवैधानिक पदाचा आदर राखला गेला पाहिजे आणि त्यांच्या औचित्याबद्दल प्रश्न उपस्थित करता कामा नये, असं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. भारत-चीन संबंध योग्य मार्गावर असून, चीननं यासाठी संपूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये केली जात असलेली लष्करी कारवाई योग्य असून, सरकार त्यात खंड पडू देणार नाही, असंही ते म्हणाले.

****



 दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला, कविंदर शर्मा यांच्यासह आठ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कविंदर शर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवलं जाणार आहे.

****



 देशभरात टपाल खात्यांतर्गत पेमेंट बँकांच्या ६५० शाखा पुढच्या महिन्यापर्यंत कार्यरत होतील, असं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. ते भोपाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पेमेंट बँकांच्या प्रणाली एकीकरणाचं काम पूर्ण झालं असून, भारतीय रिझर्व बँकेनं अनिवार्य केलेल्या प्रक्रिया येत्या आठवड्याभरात पूर्ण होतील, असं ते म्हणाले. टपाल विभागाच्या पेमेंट बँका सुरू झाल्यानं दीड लाखाहून अधिक टपाल कार्यालयांच्या माध्यमातून लोकांना बँकांच्या सेवेचा लाभ घेता येईल असं त्यांनी सांगितलं.

****



 भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरननं चीनमधे अॅनींग इथं झालेल्या टेनिस एटीपी चॅलेंजर स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात प्रज्ञेशनं इजिप्तच्या मोहम्मद सफवतचा पाच - सात, सहा - तीन, सहा - एक असा पराभव केला. अठ्ठावीस वर्षाच्या प्रज्ञेशला २१ हजार ६०० अमेरिकी डॉलर्सचं बक्षीस मिळालं आहे.

*****

***

No comments: