Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
काँग्रेससह
इतर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात
महाभियोगाचा प्रस्ताव आणला आहे. काँग्रेसनं आज ६० खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेला
प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला आहे. न्यायमूर्ती बी
एच लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निवाड्याच्या पार्श्वभूमीवर
ही नोटीस देण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्षांनी या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी
मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी
राज्यसभेत ५० तर लोकसभेत शंभर खासदारांचं समर्थन आवश्यक असतं. उपराष्ट्रपती प्रस्तावाची
छाननी करुन तो मांडावा की नाही याचा निर्णय घेतील.
दरम्यान,
न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याबाबत लोकप्रतिनिधींसह अनेकांनी केलेली जाहीर विधानं
दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. न्यायमूर्ती ए के सिक्री
आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या समोर चाललेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी
याबाबत नाराजी व्यक्त केली. खटल्याची पुढची सुनावणी येत्या सात मे रोजी होईल.
काँग्रेस
आणि इतर विरोधी पक्षांनी सादर केलेला हा महाभियोग प्रस्ताव राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा
आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
****
दिल्ली
उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं आज दिल्लीत निधन झालं, ते ९४
वर्षांचे होते. १९५८ ते १९८५ या काळात ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. देशात
मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीशी संबंधित प्रकरणांवर लक्ष केंद्रीत
करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते
अध्यक्ष होते.
****
राज्यात
विविध उद्योगांमध्ये शिकाऊ उमेदवारांचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि सात लाखांचं उद्दिष्ट
पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं आज कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या
वतीनं शिकाऊ उमेदवारी अधिनियम २०१७च्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला अभ्यासक्रम तयार करण्याची मान्यता असल्यानं
उद्योजकांनी आवश्यक असलेलं प्रशिक्षण घेऊन पुढे यावं, त्यास राज्य शासन परवानगी देणार
असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य
शासनाच्या ‘स्पर्श’ प्रकल्पांतर्गत राज्यातल्या एक हजार २६९ शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम
करण्यात आल्या असून, त्यामुळे एक एप्रिलपर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी
झाला आहे. या योजनेसंदर्भातल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. यामुळे विज बिलापोटीचे
९२ पूर्णांक ६८ लाख रुपयांची बचत झाली आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य
शासनाच्या सर्व इमारतींच्या छतांवर आणि परिसरातील मोकळ्या जागेत सौर ऊर्जा निर्मितीची
संयंत्रं बसवण्यात येणार आहेत.
****
मराठवाड्यातल्या
वैद्यकीय जागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच
कृषी आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक टेक्सटाईल पार्क उभारण्याची
मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीलं आहे.
टेक्सटाईल पार्क झाल्यास परभणीच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
****
लातूर
इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात १६६ प्रशिक्षणार्थींच्या सोळाव्या
तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. मुदखेड इथल्या सीआरपीएफ महाविद्यालयाचे प्राचार्य
महानिरीक्षक राकेशकुमार यादव यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या केंद्रात
आतापर्यंत सहा हजार जणांनी प्रशिक्षण घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना
इथं प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या रेशीम कोष बाजारपेठेचं उद्घाटन उद्या वस्त्रोद्योग
मंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. कृषी उत्पन्न
बाजार समिती परिसरात ही बाजारपेठ उभारण्यात आली आहे.
****
देशात
लहान मुलींवर अत्याचाराविरोधात, तसंच हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं दर्शन घडवत आज धुळ्यात
इन्साफ आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या तिरंगा चौकापासून निघालेला हा मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन
देण्यात आलं. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
धुळे
जिल्ह्यातल्या देांडाईचा इथंही मुस्लिम समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढून कठूआ तसंच
इतर अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment