Sunday, 29 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

****



जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते. या मालिकेचा ४३वा भाग आज प्रसारित झाला. आपल्या पूर्वजांनी जलसंधारणासाठी अनेक उपाययोजना केल्या, आपण त्या आत्मसात करुन पाणी वाचवलं पाहिजे, असं ते म्हणाले. मनरेगाच्या माध्यमातूनही जलसंधारण मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांनी नमूद केलं.



 सरकारनं तरुणांसाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इंटर्नशीप करण्यासाठी ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशीप २०१८’ हा उपक्रम सुरु केला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास, पेयजल या मंत्रालयांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील, तसंच यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ भारत मिशनद्वारे एक प्रशस्तीपत्र आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन क्रेडीट पॉईंट दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माय जी ओ व्ही ओपन फोरमवर या इंटर्नशीपसाठी नोंदणी करता येणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी होऊन, स्वच्छतेचं आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केलं.



 राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी, त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.   

 फिट इंडिया सारख्या चळवळी आपल्यासाठी आपल्या देशासाठी महत्त्वपूर्ण असून,योग हा त्यात सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं त्यांनी नमूद केलं. 



 बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान बुद्धांचं स्मरण करत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करुन त्यांचं अनुकरण करण्याच्या जबाबदारीची आठवण करुन देत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमा, तसंच आगामी रमजान महिन्यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. वीस वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात झालेल्या पोखरण अणु चाचणीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

****



 नवी दिल्ली इथं आज काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोश सभेच आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी विविध मुद्यांवरून सरकारवर टीका केली.

****



 उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. उत्तराखंडात गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे यापुर्वीच उघडण्यात आले, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उद्या उघडण्यात येणार आहेत. यंदाच्या यात्रेत वैद्यकीय उपचारासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****



 अडॉप्ट अ हेरीटेज: 'आपली परंपरा-आपली ओळख' योजना ही पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसंच राज्य सरकार यांचा एकत्रित उपक्रम असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुसज्ज पर्यटनाला प्रोत्साहन देणं आणि याबाबत सहकार्य कायम ठेवणं हे या योजनेमागचं मुख्य उद्दीष्टं असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, खाजगी कंपन्या आणि उद्योग विश्वाचे प्रतिनिधी तसंच सर्वसामान्यांना पारंपारिक स्थळे आणि पर्यटन, अधिक सुलभ बनवण्यासाठीची जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

****



 ग्रामसभा रद्द करण्याचा किंवा त्यांची संख्या कमी करण्याचा कोणताही निर्णय शासनानं घेतलेला नसल्याचं ग्रामविकास विभागानं स्पष्ट केलं आहे. गावात सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीनं ग्रामसभांच्या फक्त तारखा बदलण्यात आल्या असून, ज्या गावांमध्ये सामंजस्याचं वातावरण आहे ती गावं एक मे रोजीच ग्रामसभा घेऊ शकतात, असं विभागानं म्हटलं आहे.

****



 बुलडाणा जिल्हयातल्या खामगाव जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****



 राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि कार्यकर्ते राकेश राळेभात यांची काल अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. जामखेड इथं काल सायंकाळी  बाजार समितीच्या आवारात ही घटना घडली. राजकीय फलक लावण्यावरून गेल्या वर्षी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची तक्रार मयत योगेश यांच्या भावानं दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जामखेड बंदची हाक दिली आहे. या प्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह इतर ४ ते ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



 अहमदनगर इथं केडगाव भागात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची नुकतीच हत्या झाली होती.

*****

***

No comments: