Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2018
Time 6.50AM to 7.00AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या दुष्काळ प्रवण भागातले आठ मोठे आणि ८३ छोटे सिंचन
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची साडे तेरा हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत
Ø कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø जालना शहरातल्या प्रस्तावित रसायनशास्त्र शिक्षण संस्थेचं येत्या चार मे रोजी उद्घाटन
आणि
Ø आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवाल तर पुरुष एकेरीत
एच एस प्रणॉय यांना कांस्यपदक
*****
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातल्या दुष्काळ प्रवण भागात सिंचन प्रकल्प
पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं सहाय्य करणार
आहे. यामध्ये आठ मोठ्या आणि ८३ छोट्या प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयानं
काल याबाबत जारी केलेल्या पत्रकात या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं म्हटलं आहे. सुमारे
१३ हजार ६५१ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या या प्रकल्पांमुळे तीन लाख ७७ हजार हेक्टरवरचं
क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. छोटे प्रकल्प येत्या दोन वर्षांत तर मोठे प्रकल्प २०२२-२३
पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला भारतीय राष्ट्रीय कृषी
सहकारी बँक - नाबार्डच्या माध्यमातून कर्ज उभारणी करून, आपला वाटा उचलता येणार आहे.
****
कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान
शेतीपर्यंत पोहचवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. काल नागपूर इथं, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृहा’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी शासन
विविध योजना राबवत असून, या योजना आणि नव तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं आणि त्याचा शेतात वापर केल्यास निश्चितच उत्पादकता वाढून कृषी क्षेत्रातल्या उत्पदनात भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
देशाची अर्थव्यवस्था
२०१८ -१९ या चालू आर्थिक वर्षात किमान साडेसात टक्के दरानं वाटचाल करेल, असं नीति आयोगाचे
उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. काल, मुंबई इथं आयोजित आर्थिक परिषदेत ते
बोलत होते. गुंतवणुकीतली वाढ आणि क्षमतेचा पुरेपूर उपयोग, यामुळे हा विकास दर गाठणं
शक्य होईल, असं ते म्हणाले. सध्या आर्थिक वातावरण अनुकूल-सकारात्मक असून चलनफुगवटाही
नियंत्रणात असल्याचं, कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, या कार्यक्रमात
बोलताना, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी, राज्याचं नवं उद्योग धोरण सप्टेंबर २०१८ मध्ये अंमलात
येणार असल्याची माहिती दिली. राज्य शासनानं उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राबवलेल्या
विविध धोरणांमुळे जगातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पहिली पसंती दिल्याचं सांगून
उद्योगक्षेत्रात महिलांची भागिदारी वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं देसाई म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा
मराठीत केलेला अनुवाद प्रसारीत होईल. रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुर्नप्रसारण केलं
जाईल.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड, देवळा, उमराणे, येवला, आणि मालेगाव या पाच बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या बाजार समिती आवारात काही महिन्यात झालेल्या कांदा लिलावात
२० व्यापाऱ्यांनी कांदा घेतला पण शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली नसल्याची तक्रार आहे. नाशिक इथं पणन मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत या बाजार समित्यांवर
कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उप जिल्हानिबंधकांनी या नोटीसा बजावल्या असून ११ मे पर्यंत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.
****
भारताच्या जीवन
शैलीचं दर्शन शास्त्रीय नृत्यातून दिसून येतं तसंच देशाच्या विविध प्रांतांमधल्या नृत्यकलांनी
संबंधीत भाषा-संस्कृतीची जोपासना करत ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवली असं मत प्रसिध्द
चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल महागामी
गुरुकुलातर्फे आयोजित दोन दिवसीय नृत्य विषयक
चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन गोपालकृष्णन यांच्या
हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आज या महोत्सवात नृत्य विषयक परिसंवाद आणि चार चित्रपटही
दाखवण्यात येणार आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
जालना शहरात उभारण्यात येत असलेल्या रसायनशास्त्र शिक्षण संस्थेचं येत्या
चार मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री
बबनराव लोणीकर यांनी जालना इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जालना शहरात सिरसवाडी
परिसरात २०० एकर जमिनीवर ही संस्था उभारण्यात येत असून, यासाठी सरकारनं ३९३ कोटी रुपयांची
तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षात या संस्थेत रसायन तंत्रज्ञान
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय-घाटीत निवासी डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसापासून पुकारलेला
संप काल मागे घेतला. रूग्णांच्या नातेवाईकांनी माराहाण केल्याच्या कारणावरून
हा संप पुकारण्यात आला होता. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक आणि अन्य मागण्यांसदर्भात घाटी प्रशासनानं संबंधित
समित्यांनां ठोस पावलं उचलण्याचे आदेश दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली.
दरम्यान, घाटीचा
बाह्य रूग्ण विभाग १ मे या दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त बंद राहणार आहे, मात्र ३०
एप्रिल रोजी बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुटी असली तरीही तो चालू राहील, असं प्रशासनानं
कळवलं आहे.
****
लातूर इथं मोफत कृत्रिम हस्तरोपण शिबीर घेण्यात आलं. शंभराहून अधिक रुग्णांनी या शिबीरात सहभाग नोंदवला. लातूरचं विवेकानंद रुग्णालय, भारत विकास परिषद आणि महाराष्ट्र
आरोग्य मंडळ, रोटरी क्लब डाऊन टाऊन पुणे यांच्या वतीनं हे शिबीर आयोजित करण्यात आलं.
रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल विजय राठी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, या उपक्रमाचं कौतुक करत, अन्य संस्थांनीही या उपक्रमाचं अनुकरण
करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन केलं.
****
आशियाई बॅडमिंटन
अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय यांना
कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. या स्पर्धेत काल या दोघांनाही उपांत्य फेरीत
पराभवाचा सामना करावा लागला. सायनाचा चीनी तैपेईची ताई झु यिंगनं २५-२७, १९-२१ असा
सलग दोन सेटमध्ये पराभव केला. तर चीनच्या चेन लाँगनं प्रणॉयचा २१-१६, २१-१८ असा सरळ
दोन गेममध्ये पराभव केला.
****
उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पनवेल नांदेड
या विशेष रेल्वेच्या आगामी तीन महिन्यांत २६ फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये नांदेडहून प्रत्येक शनिवारी सुटणाऱ्या रेल्वेच्या १३ फेऱ्या आणि पनवेलहून प्रत्येक
रविवारी सुटणाऱ्या
रेल्वेच्या १३ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण
मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली.
****
हिंगोलीच्या जिल्हा
क्रीडा विभागाच्या वतीनं दिला जाणारा यावर्षीचा युवा पुरस्कार, सद्भाव सेवाभावी संस्थेचे
अध्यक्ष अभयकुमार भारतीया यांना जाहीर झाला आहे.
युवा वर्गासह
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या एक
मे रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. पन्नास हजार रुपये, स्मृतिचिन्ह, आणि प्रमाणपत्र
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
परभणी जिल्ह्यात
मानवत शहरातले अवैध धंदे बंद करून, गावगुंडांना आवर घालावा, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं
स्थानिक पोलिस प्रशासनाकडे केली आहे. काल या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं, या शिष्टमंडळामध्ये
आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचा समावेश होता.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदर्श ग्राम पाटोदा इथं येत्या दोन मे रोजी दुसऱ्या भूमिजन साहित्य
संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाषा, साहित्य,
संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित या संमेलनलाचे अध्यक्ष
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे हे असतील. या संमेलनात विविध परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातल्या ऐतिहासिक अवशेषांची ओळख होण्यासाठी औरंगाबाद
हिस्ट्री सोसायटीतर्फे आज हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता विद्यापीठ
परिसरातल्या ऍथलेटिक्स मैदानापासून या वॉकला सुरूवात होईल.
*****
***
No comments:
Post a Comment