Tuesday, 24 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

****



 राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशातल्या मांडला इथं ग्राम स्वराज अभियानाला सुरुवात केली. पंचायत राज संस्थांमध्ये ई प्रशासन रुजवण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा देण्यावर या योजनेचा भर आहे.  ही योजना देशभरात लागू होणार असून, जिथं पंचायती नाहीत तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचाही त्यात समावेश आहे.  पंचायत राज संस्था लोकशाहीचा आत्मा असून, त्या नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीनं प्रोत्साहित करत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात लाम जंगल परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एक लष्करी जवान आणि एक पोलिस शहीद झाले, तर एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली. दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 कर्नाटकात होणाऱ्या  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कागोडू थिमप्पा यांनी काल तेराव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. १९६२ पासून ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. बदामी आणि वरुणा इथल्या चार मतदार संघात भाजपानं अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ एप्रिलला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशावासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 किमान आधारभूत दर योजने अंतर्गत २०१७-१८ या हंगामासाठी तूर खरेदीची मुदत राज्य शासनाच्या विशेष विनंतीवरून महाराष्ट्रासाठी १५ मे २०१८ पर्यंत वाढवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचे आभार मानले आहेत. यामुळे अधिकाधिक संख्येनं शेतकऱ्यांना त्यांच्या तुरीला आश्वासित किंमत मिळू शकणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात हमीभावानं तुर खरेदीची मुदत १८ एप्रिल पर्यंत होती, राज्य शासनानं मुदत वाढवण्यासाठी केंद्राकडे विनंती केल्यानंतर ती आता १५ मे करण्यात आली आहे.

****



 पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार तालुक्यातले १९४ गावं सहभागी झाले असून, या चळवळीत शहरी भागातल्या नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन, चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी यांनी केलं आहे. ते उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना जलसंधारण कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या डिझेलच्या खर्चासाठी दीड लाख रुपयांचं अनुदान देण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले असल्याचं, उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितलं.

****

 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पॉईंट, अर्थात चढ-उतार स्थळ, इतरत्र हलवलं जाऊ नये, या मागणीसाठी या तिन्ही गावातल्या शेतकऱ्यांनी काल जालना-राजूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. काही उद्योजक, अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा पॉईंट खादगाव शिवारात हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी, नायब तहसीलदार संदीप ठाकणे यांना मागण्यांचं निवेदन दिलं.

****



 औरंगाबाद शहरात साचलेल्या ८० टक्के कचऱ्याचं विलगीकरण झालं असून, ओला कचरा शेतकऱ्यांनी कंपोस्ट खतासाठी घेऊन जावा, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे. काल विभागीय आयुक्तालयात कचरा व्यवस्थापनासंबंधी आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

****



 भारतानं आठवी दक्षिण आशियाई जुडो अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. नेपाळमध्ये ललितपूर इथं स्पर्धेच्या कालच्या शेवटच्या दिवशी भारतीय महिला आणि पुरुष संघानं आपापले सामने जिंकले. अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी यजमान नेपाळचा पाच - शुन्य असा, तर पुरुष संघानं पाकिस्तानचा तीन - दोन असा पराभव केला. वैयक्तिक गटात १० सुवर्ण आणि तीन कांस्य पदकं मिळवून भारतानं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं.

*****

***

No comments: