Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च
न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर
सर्वोच्च न्यायालय येत्या तीन मे रोजी सुनावणी घेणार आहे. महान्यायवादी के के वेणुगोपाल
यांनी या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ॲट्रॉसिटी
कायद्यातल्या काही अटी शिथील करण्याचा निर्णय न्यायालयानं गेल्या २० मार्च रोजी दिला
होता, त्या निर्णयावर सरकारनं ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
****
ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मल्होत्रा यांनी आज सर्वोच्च
न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांना
पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेट नियुक्ती होणाऱ्या
त्या पहिल्या महिला वकील आहेत. यासोबतच आता सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची
संख्या २५ झाली आहे.
****
महाराष्ट्रातली माजरा कोळसा खाण मिळवण्यासाठी फसवणूक केल्याबद्दल
आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं गोंडवाना इस्पात
प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अशोक डागा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,
त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयानं संबंधीत कंपनी आणि संचालकांविरुद्ध
चुकीची माहिती दिल्यामुळे समन्स बजावलं होतं. २००३ मध्ये या कंपनीला माजरा कोळसा खाण
देण्यात आली होती. यासंदर्भात आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
****
छत्तीसगढ तेलंगणा सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये
सुरु असलेल्या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. बीजापूरमध्ये अद्यापही
ही चकमक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात तहाब परिसरात आज
सकाळी संशयीत दहशतवाद्यांनी सुरक्षा बलाच्या शिबीरावर उखळी तोफांचा मारा केला. त्यानंतर
भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. यात जीवित हानीचं वृत्त नसून,
अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
****
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सचे निवासी डॉक्टर
आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. एका वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या सहकार्यासोबत गैरवर्तन
केल्याच्या निषेधार्थ या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. गेल्या बुधवारी ही घटना घडल्यानंतर
संबंधित वरिष्ठ डॉक्टरांनी माफी मागितली असून, रुग्णांची दुरावस्था टाळण्यासाठी संप
मागे घेण्याची विनंती संस्थेनं जारी केलेल्या पत्रकात केली आहे. मात्र त्या डॉक्टराचं
निलंबन करण्याची मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, राज्य
कर्मचारी विमा महामंडळ तसंच निवृत्तीवेतन नियंत्रण आणि विकास प्राधिकरण यांना आता
त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची वेतनविषयक माहिती मासिक तत्वावर जाहीर करावी लागणार
आहे. संघटित क्षेत्रात सेवेत असणारे तसंच नव्यानं येणारे
कर्मचारी यांचं विश्लेषण करण्यासाठी केंद्र सरकारकडे
ही माहिती द्यावी लागणार आहे. ई
पी एफ ओ, इ एस आय सी आणि पी एफ आर डी ए या तीन कंपन्यांनी सप्टेंबर २०१७
ते फेब्रुवारी २०१८ या
सहा महिन्यांच्या कालावधीतली त्यांच्याकडील वेतनविषयक माहिती काल जाहीर
केली. या उपलब्ध माहितीनुसार, या कालावधीत राष्ट्रीय
निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रमुख आस्थापनांमध्ये चार लाख
२० हजार नवीन खाती उघडण्यात आली, तसंच
या कालावधीत ३५ लाख ३०
हजार नवीन पगार पत्रकं निर्माण
केल्याचं समोर आलं आहे. मात्र ई एस आय सी मधली माहिती अद्याप आधारला जोडली नसल्यामुळे त्यात काही बदल
होऊ शकतो असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथं मराठवाडा विभागतल्या तालुका स्तरावरील पर्जन्यमापक
यंत्रणेसंबंधी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईच्या कुलाबा हवामान खात्याच्या
वतीनं आज एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. हवामान खात्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक
पावासाची अचूक नोंदणी घेण्यासाठी आणि पर्जन्यमापक यंत्र कार्यरत ठेवण्याचं प्रशिक्षण
देत आहेत.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियायी युवा मुष्ठीयुद्ध
अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत चार भारतीय महिला खेळाडू दाखल झाल्या आहेत. ४८ किलो
वजनी गटात नितू तर अनामिका, मनिषा आणि ललिता यांनी अनुक्रमे ५१, ६४ आणि
६९ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसंच,
दिव्या पवार आणि आस्था पहवा या उपांत्य फेरीतल्या प्रवेशानंतर आज कांस्य पदकांसाठी
खेळणार आहेत. पुरुष गटात अंकित हा अंतिम फेरीत दाखल होणारा एकमेव भारतीय
खेळाडू ठरला आहे. भावेश कट्टीमनी ५२ किलो
वजनी गटात तर अमन ९१ किलो वजनी गटात कांस्य पदकासाठी लढतील.
दरम्यान, आशियायी अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या
एकेरी उपांत्य फेरीत सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, के श्रीकांत आणि एच.एस प्रणॉय हे
भारतीय खेळाडू दाखल झाले असून, आज
ते आपापले सामने खेळतील.
//*********//
No comments:
Post a Comment