आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग
यांच्यात वुहान इथं सुरू असलेल्या दोन दिवसांच्या अनौपचारिक शिखर परिषदेत आज पुन्हा
एकदा चर्चेला सुरुवात झाली. वुहान इथं आयोजित अनेक बैठकांमध्ये द्वीपक्षिय, जागतिक आणि क्षेत्रीय अशा अनेक मुद्द्यांवर
यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक शिखर परिषदेच्या पहिल्या
दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भारत आणि चीनचे संबंध अधिक दृढ करण्यावर आणि जागतिक
मुद्द्यांवर चर्चा केल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.
****
पुढच्या वर्षात राज्यात २५
हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी सांगितलं आहे. पुणे इथं काल ऊर्जा संवर्धनामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्या
राज्यातल्या विविध संस्थांना महाऊर्जाच्या वतीनं गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
२०२५ पर्यंत राज्यातल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचा वापर करावा, यासाठी राज्य
शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
ढोकी इथं एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. आज सकाळी हा अपघात
झाला. जखमींना लातूर आणि उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी
परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कसगी
इथले गिरीश बदोले यांनी राज्यातून पहिला तर देशभरातून विसावा क्रमांक मिळवला आहे. नांदेडचे
दिग्विजय बोडके यांनी राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. याशिवाय बीडचे प्रणय नहार,
परळीचे रोहित गुट्टे, जालन्याच्या डॉ.मोनिका घुगे आणि डॉ.श्रीकांत तापडिया, औरंगाबादचे
नूह सिद्दीकी, शेख सलमान, आणि स्नेहल भापकर यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं
आहे.
****
औरंगाबाद शहराच्या कचरा समस्येचा
पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी काल आढावा घेतला. येत्या ३० एप्रिलपर्यंत रस्त्यावर
साचलेल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, तसंच ओल्या कचऱ्यावर तत्परतेनं कंपोस्टींग
प्रक्रिया करुन, शहर लवकरात लवकर स्वच्छ, सुंदर करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी
दिले.
****
No comments:
Post a Comment