Monday, 23 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम.वेंकय्या नायडू यांनी भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला आहे. यासंदर्भात लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, माजी विधी सचिव पी.के.मल्होत्रा यांच्यासह राज्यसभा सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसंच संवैधानिक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी सरन्यायाधीशां विरुद्ध महाभियोग प्रस्ताव दिला होता.

****

 भारतातून प्रथमच एक हजार तीनशे आठ मुस्लिम महिला पुरुष साथीदारा शिवाय हज यात्रेला जात असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली आहे. हज यात्रेला जाण्यासाठीची निवड लॉटरी पद्धतीनं होते, मात्र एकट्या जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना या लॉटरी पद्धतीतून सूट दिल्याचं, तसंच या महिलांसाठी महिला हज मदतनीस नेमले जाणार असल्याचं नकवी यांनी सांगितलं.

****

 राज्यसरकारनं इंटरनेटवरची अकरा संकेतस्थळं बंद केली आहेत. या संकेतस्थळांवरून पायरेटेड साहित्य दाखवलं जात असल्याच्या तक्रारी मनोरंजन क्षेत्रातून प्राप्त झाल्यानंतर सरकारनं ही कारवाई केली आहे. राज्य सायबर सेलचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी ही माहिती दिली आहे. गृहविभागाकडून यासंबंधीचे निर्देश प्राप्त झाल्यावर ही कारवाई महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं केली, आणि अशा प्रकारची ही देशातली पहिलीच कारवाई आहे.

****

 शिवसेनेचे एक नेते सचिन सावंत यांची काल रात्री मुंबईतल्या कांदिवलीमध्ये दोन हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली. काल रात्री आठच्या सुमाराला ही घटना घडली. सावंत हे शिवसेनेचे गोकुळ नगर विभागाचे  उपशाखा प्रमुख होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

****

 नेपाळच्या ललितपूर इथे सुरू असलेल्या आठव्या दक्षिण आशियायी ज्यूडो अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं दहा सुवर्णपदकं जिंकली आहेत. भारताच्या महिला खेळाडूंनी सर्व, म्हणजे सात सुवर्ण पदकं जिंकली तर पुरुष खेळाडूंनी सातपैकी तीन सुवर्णपदकं जिंकली.

*****

***

No comments: