Friday, 20 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.04.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****

§   नांदेड, परभणी, जालना आणि बीड या चार जिल्ह्यांमधल्या १० हजार ९३४ कोटी रूपयांच्या विविध रस्त्यांच्या कामांचं ई- भूमीपूजन; मराठवाड्यातल्या रस्त्यांसाठी एक लाख कोटी रूपयांची तरतूद

§   आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीसाठी चर्चा अंतिम टप्प्यात तर स्वबळावर लढण्याचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुनरूच्चार

§   न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र चौकशीची गरज नाही, सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

§    अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गायिका -अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची निवड

आणि

§   औरंगाबाद शहरातला कचरा दहा दिवसात हटवण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निर्देश

****

नांदेड, परभणी, जालना आणि बीड या चार जिल्ह्यांमधल्या १० हजार ९३४ कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामांसह अन्य विविध कामांच ई- भूमीपूजन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

नांदेड जिल्ह्यात लोहा इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अंतर्गत औसा ते चाकूर या ५५ किलोमिटर, चाकूर ते लोहा या ११४ किलोमिटर आणि लोहा ते वारंगा या १८७ किलोमिटर रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याच्या कामांसह जिल्ह्यातल्या अन्य रस्त्यांच्या पुनर्बांधणी आणि दर्जा वृद्धीच्या कामांचं ई भूमीपूजन काल करण्यात आलं. एकूण पाच हजार ३४३ कोटी रुपये या कामांवर खर्च करण्यात येणार आहेत.

परभणी इथं ६६ रस्त्यांच्या कामांचं ई- भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलं. यासाठी दोन हजार १९६ कोटी ३६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर समाधान शिबीराअंतर्गत जिल्ह्यात दोन लाख लोकांना विविध योजनांचा लाभ झाला, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यातल्या रस्त्यांसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना केली.

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथंही विविध रस्त्यांच्या कामांचं भूमीपूजनही मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीनंतर आता १० लाख बेघरांना २०१९ पर्यंत घरं देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.

****

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीसाठीची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत निर्णय होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

नांदेड इथं मिशन २०१९ अंतर्गत काँग्रेसच्या मराठवाडा स्तरीय निमंत्रित पदाधिकाऱ्यांचं काल अधिवेशन झालं, या अधिवेशनादरम्यान, वार्ताहरांशी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका करत त्यांनी या पक्षाला पराभूत करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन केलं. राज्य उघड्यावरच्या शौचापासून मुक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं ते म्हणाले.

****

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मराठवाडा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघांतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कालपासून औरंगाबाद इथं होत आहे. या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.  प्रथेप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये तर पावसाळी अधिवेशन मुंबईत व्हावं आणि परंपरेप्रमाणे मंत्रीमंडळाची बैठक औरंगाबादमध्ये घेण्यात यावी, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिवेशनाबरोबरच विकास योजनाही दिल्या गेल्या पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.

****

न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असं सांगत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत.  या प्रकरणात चार न्यायाधीशांनी दिलेल्या जबाबावर शंका घेण्याचं कारण नाही असं सांगत पोलिसांचा तपास समाधानकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गुजरातमधल्या सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभाग न्यायालयाचे न्यायाधीश लोया यांचा एक डिसेंबर २०१४ रोजी नागपूरमध्ये मृत्यू झाला होता. न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांनी शंका व्यक्त केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात चार जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. राजकीय प्रतिस्पर्धेच्या उद्देशातून या याचिका दाखल करण्यात आल्या असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गायिका अभिनेत्री किर्ती शिलेदार यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत काल सर्वानुमते ही निवड करण्यात आली. येत्या १३ ते १५ जून दरम्यान मुंबईत हे संमेलन होणार आहे.

****

औरंगाबाद शहरातला कचरा दहा दिवसात हटवण्याचे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ठाकरे कालपासून दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर असून, महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच असल्याचं ते म्हणाले. कचऱ्यामुळे शहरवासियांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी माफी मागितली. कचऱ्याच्या या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले हॉटेल तसंच मंगल कार्यालय व्यावसायिक कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावतात की नाही याची अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांचं  एक पथक आज पाहणी करणार आहे.

या तपासणीमध्ये कचरा व्यवस्थापनात त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रशासच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.

****

राज्य शासनानं जाहीर केलेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांच्या धोरणाविरोधात आणि या धोरणातल्या त्रुटी दूर करण्याच्या मागणी संदर्भात काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षक कृती समितीनं मोर्चा काढला. मोर्चात सहभागी शिक्षकांनी, शिक्षकांना एक समान न्याय मिळाला पाहिजे, पती पत्नी बदली धोरणात समानता हवी, बदली धोरणातल्या त्रुटी दूर करा अशा घोषणा दिल्या. 

****

जालना पोलीस आणि कृषी विभागानं शहरातल्या कचेरीरोड भागात संयुक्त कारवाई करत ६४ लाख ४२ हजार रूपयांचं बनावट कपाशी, भाजीपाला बियाणं जप्त केलं आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

लातूर इथले प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुर्यनारायण रणसुभे यांना हिंदी साहित्यातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आग्रा इथल्या केंद्रीय हिंदी संस्थानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या जून महिन्यात नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल, असं लातूर जिल्हा हिंदी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतिश यादव यांनी सांगितलं.  पाच लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या मानोली गावच्या चार जणांनी काल आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावातल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांनी हे पाऊल उचललं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहाराच्या भूमी अभिलेख कार्यालयातल्या छाननी लिपिकाला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडलं. शेतजमीन मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

परभणी इथंही न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात तक्रारदाराच्या बाजूनं साक्ष देऊन मदत करण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या पोलिस जमादार शेख उस्मानला अटक करण्यात आली.

//**********//


No comments: