Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2018
Time 6.50AM to 7.00AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेचा लाभ २००१ ते २००९ मधल्या थकीत कर्ज खातेदारांनाही देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय
Ø मुंबई इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचं,
जालना इथं उपकेंद्र स्थापन करण्यास मान्यता
Ø
येत्या एक मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून डिजिटल स्वाक्षरी सातबारा देण्यास प्रारंभ
Ø राज्याच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई पंचायत तृतीय
पुरस्कार
आणि
Ø जालना जिल्ह्यात शंभर रुपयांच्या सहा
लाख १७ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त
*****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ
२००१ ते २००९ मधल्या थकीत कर्ज खातेदारांनाही देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई इथल्या
रसायन तंत्रज्ञान संस्थेचं, जालना इथं उपकेंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली
असून, यासाठी ३९६ कोटी रुपयांचा खर्च आणि आवश्यक पदांनाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून
आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचं सर्वेक्षण
करून पुनर्विलोकन करणं, तसंच राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा संस्था
स्थापन करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर
निवडणुकीसाठी, व्यापारी आणि अडते या घटकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र
कृषी उत्पन्न पणन अधिनियम-१९६३ मध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता
दिली.
वन विभागातल्या योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या
आणि नियमित होण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित ५६९ कामगारांना कायम करण्याचा निर्णय, तसंच
भूमिगत जलवाहिन्या टाकणं आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमीन वापर हक्काचं संपादन
करण्यासह इतर बाबींच्या तरतुदीसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे.
****
नक्षलग्रस्त भागातल्या गडचिरोली जिल्ह्यात लागोपाठ दोन दिवस
झालेल्या नक्षलविरोधी चकमकींमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३७ झाली आहे. रविवार आणि सोमवारी केलेल्या कारवाईनंतर
२२ नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते, काल या ठिकाणी राबवण्यात आलेल्या
शोधमोहिमेदरम्यान आणखी १५ मृतदेह सापडल्याची
माहिती पोलिस जनसंपर्क
अधिकारी प्रशांत दिवटे यांनी दिली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई आहे.
****
येत्या एक मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून डिजिटल स्वाक्षरी सातबारा देण्यास प्रारंभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
यांनी काल मुंबईत ही माहिती
दिली. राज्यातल्या ४३ हजार ९४८ महसुली गावांपैकी ४० हजार गावांचं सातबारा संगणकीकरणाचं
काम पूर्ण झालं आहे.
या संगणकीय सातबाऱ्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची
आवश्यकता नाही, डिजिटल स्वाक्षरी असलेला हा सातबारा सर्व शासकीय तसंच निमशासकीय कामासाठी ग्राह्य
धरण्यात येणार आहे.
दरम्यान, जगातील इतर देशात रस्ते
बांधकामासाठी वापरण्यात येणारं आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याचा अभ्यास करून
राज्यातल्या रस्ते निर्मितीमध्ये सुधारणा करावी, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं
आहे. मुंबई इथं काल राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा विभागातल्या
अधिकाऱ्यांसाठी आयोजित, ‘सार्वजनिक खरेदी प्रक्रियेमध्ये मूल्य निश्चिती’ या
विषयावरच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
****
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची साक्षीदार असलेल्या
पूजा सकट हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, तसंच तिच्या
मृत्यूला जबाबदार आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सकट कुटुंबाचं
कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ सीबीएसईच्या बारावी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अर्थशास्त्र विषयाची पुनर्परीक्षा
आज होत आहे. पूर्वीच्या प्रवेशपत्रांवर पूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा
होणार असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अर्थशास्त्र
विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी फुटल्यामुळे ही पुनर्परीक्षा घेतली जात आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
*****
केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात यशस्वीपणे
पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल राज्याच्या ग्रामविकास
विभागाला राष्ट्रीय ई पंचायत तृतीय पुरस्कार मिळाला आहे. काल राष्ट्रीय पंचायत राज
दिनानिमित्त, मध्यप्रदेशात मंडला इथं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याच्या
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. डिजीटल इंडिया
अंतर्गत देण्यात येणारा हा पुरस्कार राज्याला दुसऱ्यांदा मिळाला असून महाराष्ट्राचा
ग्रामविकास विभाग चांगली कामगिरी करत असल्याचे गौरवोद्गार यावेळी पंतप्रधानांनी काढले.
****
जालना जिल्ह्यात काल पोलिसांनी शंभर रुपयांच्या सहा
लाख १७ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करत, एकाला अटक केली आहे. विशेष
कृती दलानं, अंबड जालना रस्त्यावर एका वाहनातून या बनावट नोटा जप्त केल्या. शेख समीर
शेख मुन्ना असं या आरोपीचं नाव असून, त्यानं अंबड इथून या नोटा आणल्याची माहिती पोलिसांनी
दिली.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची
निवडणूक आता ११ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बँकेचे संचालक, बाबाजानी दुर्राणी
यांचं संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाला, दुर्राणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे, या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानं, निवडणूक
ही पुढे ढकलण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी, नळेगाव आणि अंबुलगा
इथले अवसायनात निघालेले साखर कारखाने आगामी गाळप हंगामात सुरू करणार असल्याचं लातूरचे
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते.
शेतकऱ्यांचं हित जोपासलं जावं यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातले
अवसायनात निघालेले कारखाने पुन्हा सुरू करण्याचं धोरण ठरवलेलं आहे, त्या अनुषंगाने
हे कारखाने सुरू होणार असल्याचं निलंगेकर म्हणाले.
*****
वाहन चालवताना सावध राहण्याचं आवाहन परभणीचे अप्पर
जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केलं आहे. परभणी इघं रस्ता सुरक्षा
अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलिस कुठल्याही चौकशीला बोलावणार नाहीत,
त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीस दवाखान्यापर्यंत पोहोचवून त्याचा जीव वाचवण्यास मदत
करावी असं आवाहनही त्यांनी केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या ढोराळा
सज्जाचा तलाठी नितीन कांबळे आणि त्याचा खासगी लेखनिक खंडू आल्टे या दोघांना काल एक
हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. शेतजमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरची
ऑनलाईन नोंद, मंडळ अधिकाऱ्याकडून मंजूर करून घेत, सात बारा उतारा देण्यासाठी त्यानं
लाचेची मागणी केली होती. खासगी लेखनिकामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक
पथकानं या दोघांना अटक केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर जवळील खडकपाटी इथं दुकाचीला
ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. काल दुपारी
ही दुर्घटना घडली. जखमीवर जिंतूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात १९७५ ते ७७ च्या दरम्यान आणिबाणीच्या
कालावधीत शिक्षा भोगलेल्या व्यक्तींनी आपली माहिती आवश्यक पुरावा कागदपत्रांच्या प्रमाणित
प्रतींसह, येत्या दोन मे पर्यंत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असं आवाहन
करण्यात आलं आहे. आणिबाणीच्या कालावधीत बंदिवास तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा यथोचित
गौरव करण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं ही माहिती संकलित करण्याचे आदेश दिले
आहेत.
****
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
चार तालुक्यातले १९४ गावं सहभागी झाले आहेत.
या गावांना जलसंधारण कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या डिझेलच्या खर्चासाठी
दीड लाख रुपये अनुदान देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. उस्मानाबादचे
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी ही माहिती दिली.
****
राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार
मिळाल्याबद्दल, ज्येष्ठ समीक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. ॠषीकेश कांबळे यांचा,
कैलास पब्लिकेशन्स आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे.
औरंगाबाद इथं मसापच्या ना गो नांदापूरकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम
होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment