Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
वैद्यकीय
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट च्या कटऑफ गुणांमध्ये
१५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. या निर्णयाचा
सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना लाभ होईल, असं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं
आहे. वैद्यकीय शिक्षण आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमातल्या जागा भरण्यासाठी सर्व प्रकारचे
प्रयत्न केले जात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.
****
सरकारला
२०१७-१८ या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या रुपात ४१ हजार कोटी रुपये
महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी एक जुलैपासून ही कर प्रणाली लागू झाली. अर्थ
मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. ऑगस्ट २०१७
ते मार्च २०१८ या आठ महिन्यांच्या काळात ७९ हजार कोटी रुपये जीएसटीच्या रुपात प्राप्त
झाले असून, राज्यांना ४१ हजार कोटी रुपयांहून अधिक भरपाई दिल्याचं मंत्रालयानं म्हटलं
आहे.
****
देशात
रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षाविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी होणं आवश्यक
असल्याचं, केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं
स्वयंसेवी संस्थांच्या रस्ते सुरक्षा विषयक बैठकीत बोलत होते. रस्ते सुरक्षाविषयक कायद्यांची
भीती आणि या कायद्यांचा आदर करण्याच्या वृत्तीचा नागरिकांमध्ये अभाव असल्यामुळेच अपघात
घडतात, असं ते म्हणाले. लोकांच्या सहभागाशिवाय रस्ते वाहतुक सुरक्षा साध्य होणार नाही,
असं ते म्हणाले.
****
देशातल्या
जास्तीत जास्त नागरिकांना विशेषतः युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य आणि
केंद्र सरकारनं एकत्रितपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता
मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं आयोजित राज्यांच्या कौशल्य
विकास आणि उद्योजकता मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते.
****
मुंबई
विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल
तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी आज राजभवनात पेडणेकर यांना नियुक्तीचं पत्र सुपूर्द
केलं. रसायन शास्त्राचे प्राध्यापक आणि मुंबईतल्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे
प्राचार्य असलेले डॉ.पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून
पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत असेल.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात डॉ.संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून
कार्यमुक्त केल्यानंतर मुंबई विद्यापीठाचं कुलगुरूपद रिक्त झालं होतं. भारतीय अंतराळ
संशोधन संस्था-इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ.के.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील निवड
समितीनं पेडणेकर यांची या पदासाठी निवड केली आहे.
****
देशाभरातल्या
बांधकाम, उत्पादन, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट
कार्य करणाऱ्या ७२ व्यवस्थापनांना आज नवी दिल्लीत केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष
गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. त्यात राज्यातल्या १५ उद्योग संस्थांचा
समावेश आहे.
****
मुंबईतल्या
कमला मिल्स अग्निकांड प्रकरणी मोजोस बिस्तो पबचा भागीदार युग तुलीचा जामीन अर्ज आज
मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला. वन अबव्ह पबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे
ही आग लागल्याचं तुलीनं आपल्या अर्जात म्हटलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात
झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता.
****
कुख्यात
गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक तारिक परवीन याला आज ठाणे पोलिसांनी मुंब्रा इथून अटक केली
आहे. तारिक परवीन हा १९९८ मधल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातला आरोपी आहे. जानेवारी
२०१५ मध्ये तारिक परवीन हा दाऊदच्या टोळीचा सक्रीय सदस्य होता.
****
महाराष्ट्र
शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र तसंच
कृषी विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची एम एच टी-सी
ई टी परीक्षा येत्या १० मे रोजी होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या १५ उपकेंद्रांवर
ही परीक्षा होणार असून, तीन हजार ५६९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. सुरक्षेच्या
दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रांवर पोलिस यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार आहेत.
****
राज्यात
आज सर्वात जास्त ४५ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी आणि नांदेड
इथं ४३, बीड ४२, उस्मानाबाद ४० पूर्णांक सात, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या परळी इथले सराफा व्यापारी अजय सोनपेठकर यांचा आज उष्माघातानं मृत्यू
झाला. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
****
No comments:
Post a Comment