Thursday, 19 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातल्या पाण्यासह आणखी ५० दशलक्ष घनफूट पाणी पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, यासाठी ५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं आज भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अंतर्गत एकूण पाच हजार ३४३ कोटी रुपये खर्चाच्या ५४८ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाच्या ई-भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. राज्यात गेल्या साडे तीन वर्षात १५ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झालं असून, रस्ते, वीज आणि पाणी असा सर्वांगिण विकास साधणं, हे सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लातूर-नांदेड इथलं दुषित पाणी परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्रास देण्यात यावं, आणि मांजरा धरणातलं शुध्द पाणी लातूरकरांना पिण्यासाठी द्यावं, असं राज्य सरकारला सुचवल्यानंतर या प्रकल्पाचा प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री आणि गडकरी आज मराठवाडा दौऱ्यावर असून, परभणी इथंही त्यांनी रस्त्याच्या ६६ कामाचं ई भूमिपूजन केलं. रस्त्यामुळे जिल्ह्याची प्रगती होते, उद्योग रोजगाराच्या संधी निर्माण होतात, त्यामुळे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. परभणी जिल्ह्यात येणाऱ्या काळात नऊ ब्रिज बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. 

****

प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांना कालबद्ध पद्धतीनं हटवण्यासाठी सरकार एक धोरण तयार करणार असल्याचं केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव युद्धवीर सिंह मलिक यांनी सांगितलं आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २०२० पर्यंत हे धोरण लागू करण्यात येणार असून, यात २० वर्ष जुन्या सर्व वाहनांचा समावेश असेल, असं ते म्हणाले.

****

लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात पुरावे गोळा करणं आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचं प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे, असं सरकारनं म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना द्यावेत, असं या पत्रात म्हटलं आहे. जे पोलिस अधिकारी आरोपींसोबत मिळून तपासात बाधा आणतात, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गांधी यांनी दिले.

****

औरंगाबाद शहरातला कचरा दहा दिवसात हटवण्याचे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून, महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच असल्याचं ते म्हणाले.

****

पुणे जिल्ह्यात कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयानं आज त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमामध्ये हिंसाचार घडवल्याच्या आरोपात एकबोटेंना अटक करण्यात आली होती.

****

कोकणातल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध केल्याप्रकरणी शिवसेनेचे लांजा इथले आमदार राजन साळवी यांना आज राजापूर पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी साळवी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता. मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी साळवी यांच्यासह पक्षाच्या इतर पदधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

****

जालना पोलीस आणि कृषी विभागानं शहरातल्या कचेरीरोड भागात संयुक्त कारवाई करत ६४ लाख ४२ हजार रूपयांचं बनावट कपाशी, भाजीपाला बियाणं जप्त केलं आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या सिरसाळा इथं आंघोळीसाठी गेलेल्या दोन शिक्षकांचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल ही घटना घडली असून, आज त्यांचे मृतदेह परळी तालुक्यातल्या सफदराबाद इथं सापडले. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहाराच्या भूमी अभिलेख कार्यालयातल्या छाननी लिपिकाला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडलं. शेतजमीन मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...