Tuesday, 24 April 2018

Text - All India Radio News, Aurangabad - 24.04.2018....17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशातल्या प्रत्येक कुटुंबात मुलींचं महत्व वाढलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज ग्राम स्वराज अभियानाला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली, तर मुलींच्या सुरक्षेची चिंता नाही, असं ते म्हणाले. गावं आणि गावकऱ्यांना सशक्त बवनण्याच्या कार्यात, केंद्र सरकार, लोकप्रतिनिधींना सहकार्य करणार असून, गावांमध्ये परिवर्तन झालं, तर देशाचं परिवर्तन होईल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. सरकारच्या सर्व योजना गावागावात पोहोचतात की नाही, याकडे सर्व पंचायत राज प्रतिनिधींनी लक्ष द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ २००१ ते २००९ मधल्या थकीत कर्ज खातेदारांनाही देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचं, जालना इथं उपकेंद्र स्थापन करण्यासाठी ३९६ कोटी रुपयांचा खर्च आणि आवश्यक पदांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचं सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करणं, तसंच राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा संस्था स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी, व्यापारी आणि अडते या घटकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम-१९६३ मध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. वन विभागातल्या योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित ५६९ कामगारांना कायम करण्याचा निर्णय, तसंच भूमिगत जलवाहिन्या टाकणं आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमीन वापर हक्काचं संपादन करण्यासह इतर बाबींच्या तरतुदीसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

****

नक्षलग्रस्त भागातल्या गडचिरोली जिल्ह्यात लागोपाठ दोन दिवस झालेल्या नक्षलविरोधी चकमकींमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३७ झाली आहे. या परिसरात आज राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान १५ मृतदेह सापडले. पोलिस जनसंपर्क अधिकारी प्रशांत दिवटे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई आहे. कसनासूर आणि जिमलगट्टा जंगलात गेल्या दोन दिवसांत झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

****

जगातील इतर देशात रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणारं आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याचा अभ्यास करून राज्यातल्या रस्ते निर्मितीमध्ये सुधारणा करावी, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित, ‘सार्वजनिक खरेदी प्रक्रियेमध्ये मूल्य निश्चिती’ या विषयावरच्या कार्यशाळेत ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे रस्ते निर्मिती करताना त्याचा दर्जा उत्तम रहावा, यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आठ जुलै रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. उद्यापासून येत्या १५ मे पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या परीक्षेशी संबंधित सर्व माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

वाहन चालवताना सावध राहण्याचं आवाहन परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केलं आहे. परभणी इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलिस कुठल्याही चौकशीला बोलावणार नाहीत, त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीस दवाखान्यापर्यंत पोहोचवून त्याचा जीव वाचवण्यास मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं.

****

राज्य शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल, ज्येष्ठ समीक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ.ॠषीकेश कांबळे यांचा, कैलास पब्लिकेशन्स आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे. उद्या मसापच्या ना.गो.नांदापूरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते, कांबळे यांचा सत्कार होणार आहे.

****

राज्यात आज सर्वात जास्त ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी ४२ पूर्णांक नऊ, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: