Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
२०१३ सालच्या एका बलात्कार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामबापूसह तीन आरोपींना जोधपूरच्या विशेष न्यायालयानं आज दोषी
ठरवलं. त्यांच्या शिक्षेबाबत न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद सुरू आहे. गेली
चार वर्षं आसारामबापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असून, सुरक्षेच्या कारणामुळे न्यायालय
या कारागृहातच याबबतचं काम पाहत आहे. जोधपूर
इथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून, प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. या प्रकरणातल्या
पीडितेच्या शहाजहानपूर इथल्या घरालाही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दरम्यान, न्याय मिळाल्यामुळे
आपल्याला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी
अर्जांची छाननी आज होणार आहे. हे अर्ज दाखल करण्याची काल शेवटची तारीख होती. या निवडणुकीसाठी,
दोनशे चोवीस मतदारसंघांसाठी तीन हजारहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकी
साठीचं मतदान येत्या बारा मे ला होणार आहे.
****
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरुद्ध
महाभियोग प्रस्ताव दाखल करणं, ही काँग्रेस पक्षाची चूक होती, असं तृणमूल काँग्रेसच्या
प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस पक्षानं या प्रस्तावाला पाठिंबा
द्यावा अशी काँग्रेसची इच्छा होती, मात्र न्याय पालिकेत हस्तक्षेप करण्याची आपल्या
पक्षाची इच्छा नसल्यानं या प्रस्तावाला पाठिंबा दिला नाही, असं बॅनर्जी यांनी एका बंगाली
वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं.
****
आज जागतिक मलेरिया दिन आहे. मलेरिया या
रोगाबद्दल व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं २००७ सालापासून
हा दिवस पाळायला सुरुवात केली. मलेरियाचा पराभव करण्यास सिद्ध, असं यावर्षीच्या या
दिनाचं घोषवाक्य आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला महाराष्ट्रातल्या
जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि समाजातल्या तळातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास
आणि समृद्धी, हे माझं अभियान आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केलं आहे. मॅन ऑन मिशन महाराष्ट्र, या, फडणवीस सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या,
आशिष चांदोरकर लिखित पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत, केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांच्या
हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गरीब व्यक्तींच्या चेहेऱ्यावर फुललेल्या हास्यानं
मला समाधान आणि प्रेरणा मिळते, असं नमूद करत,
सरकारच्या कामाची प्रशंसा केल्याबद्दल नीतिन गडकरी यांचे आभार मानून, अशा प्रोत्साहना
मुळे लोकांसाठी अधिकाधिक काम करण्याची शक्ती मिळते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या
भावना व्यक्त केल्या. या पुस्तकाचं प्रकाशन औरंगाबादच्या साकेत प्रकाशन, या प्रथितयश
संस्थेनं केलं आहे.
****
शहरामध्ये कचरा विलगीकरणाचं प्रमाण 80
टक्क्यांपर्यंत पोचलं असून, त्यामुळे महानगर पालिकेला दररोज मिळणारा
अंदाजे दीडशे टन ओला कचरा शेतकऱ्यांनी कंपोस्ट
खतासाठी घेऊन जावा, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे.
भापकर यांनी काल विभागीय आयुक्त कार्यालयात कचऱ्यासंबंधी आढावा बैठक घेतली, त्यावेळी
ते बोलत होते. ओला कचरा घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांनी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव
यांच्याशी 70205 79304 या क्रमांकावर संपर्क
साधण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या
ज्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी
अर्ज करायचे आहेत त्यांनी हे अर्ज येत्या सत्तावीस तारखेपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या
माहिती कार्यालयाकडे सादर करावेत असं औरंगाबादच्या जिल्हा माहिती कार्यालयानं कळवलं
आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या चोवीस ग्राम पंचायतींसाठी
येत्या सत्तावीस मे ला मतदान होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनानं आज
अधिसूचना जारी केली आहे. तर, बुलढाणा जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यांमध्ये येत्या जून
ते सप्टेंबर या कालावधीत एकोणचाळीस ग्राम पंचायतींच्या
बहात्तर रिक्त पदांकरता पोट निवडणुका होणार आहेत. या सगळ्या ग्राम पंचायतींसाठी आदर्श
आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
****
नाणारवासीयांची काळजी
असेल तर शिवसेना भाजपा सरकारने या सर्व जमिनीचे करार रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेस
पक्षानं केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काल ही मागणी करत, या
विषयावरून सरकार जनतेची दिशाभूल करत करत असल्याचा आरोप केला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment