Wednesday, 12 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड इथल्य प्रिती संगमावरील  समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, यावेळी उपस्थित होते.  यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत असून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देत असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

****

शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला एकाच संकेतस्थळावर मिळावी, यासाठी ‘सीएम डॅश बोर्ड’ म्हणजे ‘स्वॅस’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती, अद्ययावत माहिती, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी आणि यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये, या उद्देशानं ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबरच न्यायालय, रेरा तसंच कायदा आणि सुव्यवस्था या सेवांचाही या प्रणालीत समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या बैठकीत दिले. 

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात काल लोकसभेत अर्थसंकल्पातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पुरवणी मागण्या, २०२१-२२ साठी अतिरिक्त अनुदानाच्या मागण्या, मणिपूर अर्थसंकल्प २०२५-२६ आणि मणिपूर २०२४-२५ साठी पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूरसाठी आकस्मिक निधी स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. 

देशातून होणारी संरक्षण क्षेत्राची निर्यात २०१३-१४ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ३० पटीनं वाढली असल्याचं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. भारत सध्या ८५ देशांमध्ये संरक्षण उत्पादनं आणि उपकरणं निर्यात करत आहे आणि १०० कंपन्यांचा विकासात वाटा आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

त्यानंतर सभागृहात विनियोजन विधेयक २०२५, विनियोजन विधेयक क्रमांक दोन २०२५, मणिपूर विनियोजन विधेयक २०२५ मंजूर करण्यात आले. लोकसभेत काल स्थलांतर आणि परदेशी नागरिकांशी संबंधित विधेयक सादर करण्यात आलं.

****

केंद्र सरकारनं अवामी ॲक्शन कमिटी आणि जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन दहशतवादी संघटनांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भातली अधिसूचना जारी केली. या दोन्ही संघटना देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. 

****

खादी कारागिरांचं वेतन येत्या एक एप्रिलपासून २० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केली आहे. गेल्या ११ वर्षांमध्ये सरकारने खादी कारागिरांचं वेतन २७५ टक्क्यांनी वाढवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

देशातली निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. मतदार याद्यांमधे घोळ असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रक्रीयेत काही अडचणी असल्यास येत्या ३० एप्रिलपर्यंत कळवाव्या असं पत्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राजकीय पक्षांना लिहीलं आहे.

****

पुणे जिल्ह्यात आगामी पाच वर्षात अधिकाधिक क्षेत्र केळी पिकाखाली आणण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी काल या संदर्भात झालेल्या बैठकीत दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, पाण्याचा कार्यक्षम वापर, याचबरोबर शीतसाखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ अश्या विविध बाबींचा विचार करण्यात आला आहे.

****

सोलापूर जिल्हयात एक ते ३१ मार्च दरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत नवजात बालक ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील ही मोहीम राबवण्यात येत आहे.

****

चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत क्षयरोग निर्मूलन मोहीमेअंतर्गत ६३४ आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत. यामध्ये एक लाख २३ हजार २५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ६० नागरिक क्षयरोगग्रस्त आढळून आले आहेत.

****

जनावरांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन चोरी करण्याची घटना काल परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं उघडकीस आली. लक्झरी कारमधून जनावरांची चोरी करतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं. ज्या गाई, म्हशी, आणि वासरांना बेशुद्ध करून चोरी करता आले नाहीत अशा गाईंवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 29 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...