Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• शेतकऱ्यांसोबत चर्चेतून मार्ग काढून शक्तीपीठ महामार्ग उभारणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; विरोधकांनी सहकार्य करण्याचं आवाहन
• बोगस प्रकरणांना प्रतिबंधासाठी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात सुधारणा-तत्काळ अंमलबजावणी सुरू
• लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग
• छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची नळ पाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणार, उद्योगमंत्र्यांची विधानसभेत माहिती
आणि
• नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पासाठी ९० कोटी रुपये निधी गोदावरी महामंडळास वितरीत
शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून हा महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या महामार्गाविरोधात मुंबईत आझाद मैदानावर आलेल्या शेतकरी मोर्चाकडे लक्ष वेधलं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडली. कोल्हापूरमध्ये या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या महामार्गामुळे मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांचं जीवनमान अभूतपूर्व बदलेल, असं सांगत, राज्याच्या विकासाबाबत महत्त्वाच्या असलेल्या या महामार्ग उभारणीसाठी विरोधकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, हा महामार्ग रद्द न केल्यास, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूरसह १२ जिल्ह्यातले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
****
सामान्य दरापेक्षा अधिक व्याज परतावा देण्याचं आश्वासन, हा ९९ टक्के गुंतवणूक प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये, असं आवाहन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केलं. टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी मूर्तींवरच्या बंदीसंदर्भात नेमलेल्या, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीचा अहवाल येईपर्यंत, पीओपी मूर्तींच्या परवानगीला मुदत देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत याबाबत शासनाची भूमिका मांडण्याची मागणी केली, त्यावर उत्तर देतांना, कामगारांचा आणि मूर्तिकारांचा विचार करून ही समिती तांत्रिक मार्ग काढेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत बोलताना, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचं काम लवकरच सुरू होऊन, ही योजना कार्यान्वीत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं.
****
बोगस प्रमाणपत्रांना प्रतिबंधासाठी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीला कालपासूनच प्रारंभ झाला. ही प्रमाणपत्रं देण्यासाठी तीनस्तरीय पडताळणी टप्पे निश्चित केले असून, सतरा मुद्द्यांची पूर्तता केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल, मात्र कागदपत्रं बनावट आढळल्यास तत्काळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
****
विधानसभेत कालही अर्थसंकल्पावर चर्चा झाली. मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या महायुती सरकारनं अर्थसंकल्पातून जनतेला काहीही दिलं नसून, आर्थिक गणित मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी, राज्यात गुंतवणूक नेमकी कुठे होणार हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतीमाल वाहतूक विकास कार्यक्रम आखावा, मराठवाडा वॉटर ग्रीड या पाच वर्षांत पूर्ण करावं, अशा मागण्याही देशमुख यांनी केल्या.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी सभात्याग केला. या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी ४७ लाख झाल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, तसंच नमो सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना एक हजार रुपये नमो सन्मान योजनेतून आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील, असं तटकरे यांनी सांगितलं. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रश्न विचारण्याची परवानगी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मागितली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावत कामकाज पुढे सुरू केलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
****
बीड जिल्ह्यात गेवराई इथं महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी केली जाईल, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. या रस्त्यांच्या गुणवत्तेसंदर्भात सदस्य विजयसिंह पंडित यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
****
जालना जिल्ह्यात परतूर मंठा आणि जालना तालुक्यात वॉटरग्रीड योजनेअंतर्गत महसुली थकबाकीच्या कारणावरून दोनशे गावांचा पाणी पुरवठा बंद केल्याचा मुद्दा आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला. वसुलीसाठी महिनाभराचा वेळ द्यावा, मात्र पाणी पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी लोणीकर यांनी केली.
****
छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांना पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेली नळ पाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य विलास भुमरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता. या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा उच्च न्यायालय दर १५ दिवसांनी आढावा घेत असून, न्यायालयाच्या सूचनांनुसार या योजनेची कामं केली जात असल्याचं सामंत यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज १६६ एम एल डी पाण्याची आवश्यकता असून, सध्या ९० एम एल डी पाणी पुरवठा होत असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पासाठी ९० कोटी रुपये निधी गोदावरी महामंडळास वितरीत झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना प्राधान्याने सानुग्रह अनुदान वाटप आणि या प्रकल्पाच्या घळभरणीचं काम समांतरपणे त्वरीत सुरु करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
****
बुलडाणा जिल्ह्यात एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला बीड पोलिसांनी प्रयागराज इथून अटक केली. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ही माहिती दिली. भोसलेवर खुनाच्या प्रयत्नाचे दोन, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक आणि वन कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल असून, अहिल्यानगर जिल्ह्यातही काही प्रकरणं प्रलंबित आहेत.
****
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी काल केज न्यायालयात झाली. सुरक्षेच्या कारणामुळे आरोपींची ओळखपरेड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २६ मार्चला होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात डोंगरगाव इथं काल वॉटरशेड यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवावा, तसंच गावांच्या लोकसंख्येनुसार प्रती व्यक्ती दोन झाडं लावावीत, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या मौजे जडगांव इथं काल, एक दिवस गावकऱ्यांसोबत अर्थात ग्राम दरबार हा कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्याच्या गटविकास अधिकारी मीना रावताळे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
****
नांदेड इथं अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये ग्लॅन्डर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड शहरात बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या अश्ववर्गीय प्राण्यांची वाहतूक करण्याला बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केले.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉक्टर राहुल धाकडे, तर सचिवपदी गोरख शेंद्रे यांची निवड झाली असून, ही कार्यकारिणी पाच वर्षांसाठी असेल.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळावा घेण्यात आला. यात १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment