Thursday, 13 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १३ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १३ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिज्यूअल ॲण्ड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल. जगभरातल्या १०० हून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्हज परिषद होणार आहे. 

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं काल तेजस या लढाऊ विमानातून स्वदेशी अस्त्र या दृष्टीक्षेपाच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या चंडीपूर इथून यशस्वी चाचणी घेतली. उडणाऱ्या लक्ष्यावर क्षेपणास्त्राचा थेट प्रहार यावेळी यशस्वी झाल्याचं दिसून आलं. संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओनं तयार आणि विकसित केलेलं अस्त्र हे क्षेपणास्त्र १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरच्या लक्ष्याला अचूकपणे नष्ट करण्याकरता सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र या आधीच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं आहे. 

****

फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर कमी होऊन तीन पूर्णांक ६१ शतांश टक्क्यांवर आला. सात महिन्यातली ही निचांकी पातळी आहे. जानेवारीत हा दर चार पूर्णांक २६ शतांश टक्के होता. 

****

महाराष्ट्र राज्य हे परकीय थेट गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनलं असून, केवळ नऊ महिन्यांत एक लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टी आय ईकॉन मुंबई यांच्यावतीने आयोजित देशाच्या आघाडीच्या उद्योजकीय नेतृत्व शिखर संमेलन कार्यक्रमात पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा "टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम" पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. स्टार्टअप्सच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याने आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

****

राज्यात विक्री होत असलेलं कृत्रिम पनीर आणि चीज नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचं असून, ते विक्री करणारे विक्रेते आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिला. त्यासाठी, या नमुन्यांची तपासणी करून त्याचं विश्लेषण करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या नवीन प्रयोगशाळा तसंच प्रयोगशाळांच्या बळकटीकणासाठी भरीव निधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 

****

स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य श्वेता महाले यांनी याबाबत उपस्थ‍ित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अवैधरित्या होत असल्या स्त्रीभ्रूणहत्यांची माहिती देण्यासाठी १०४ हा क्रमांक कार्यरत असून तो अधिक सक्षम केला जाईल, असंही आबिटकर यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचं आणि एकंदर वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचं उद्दीष्ट महावितरणनं ८२ दिवसात पूर्ण केलं आहे. ८२ दिवसात ५७ हजारहून अधिक घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत आतापर्यंत राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकंदर ८०० कोटी रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यात थेट देण्यात आलं आहे. यामध्ये नागपूर प्रथम तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. 

****

नाशिक मध्ये भरणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य शासनानं नाशिक मधल्या बाह्य रिंग रोड सह प्रमुख १२ रस्त्यांसाठी, दोन हजार २७० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचं मजबुतीकरण आणि नाशिक- त्रंबकेश्वर रस्त्याचं २४ मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी काल कुंभमेळा पूर्वतयारीच्या बैठकीत दिली.

****

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स २०२५ मध्ये भारताचं वर्चस्व कायम आहे. भालाफेकीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये पुष्पेंद्र सिंह, रिंकू हूडा आणि रितेंदर यांनी सुवर्णपदकं मिळवली. महिला विभागात भाग्यश्री जाधवनं बाजी मारली. थाळीफेक प्रकारात अतुल कौशिकनं सुवर्णपदक मिळवलं. दोन दिवसांतल्या विविध स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या ९५ वर गेली आहे. त्यात ३३ सुवर्णपदकं, २९ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे.

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...