Friday, 14 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १४ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज सकाळी साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो. 

****

येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली, त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता ५६ रुपये प्रतिलीटरवरून ५८ रुपये प्रतिलिटर, तर म्हशीच्या दुधाची विक्री ७२ रुपये प्रतिलीटरवरून ७४ रुपये प्रतिलिटर होणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली.

****

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष अध्ययन करण्यासाठी विदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.  या योजनेअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना विभागाच्या संकेतस्थळावर येत्या ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. 

****

तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला कालपासून लातूर इथं प्रारंभ झाला. शहरातल्या पीव्हीआर टॉकीजमध्ये १७ मार्चपर्यंत चालणारा हा फेस्टिवल सर्वांसाठी नि:शुल्क आहे. लातूर तसंच मराठवाडयातील सिनेरसिकांनी या फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा असं आवाहन, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे. घरत यांनी आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरी आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला आहे. विष्णु बाबुराव सादुळे असं आरोपीचं नाव असून, त्याने शेजारी राहणाऱ्या बालिकेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता, २३ मार्च २०२३ रोजी हा प्रकार घडला होता. 

****

जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्याने अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वेगेट पास करत असताना अचानक मालवाहून ट्रॅक बंद पडल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहराने कळवली आहे. या अपघातात जीवीत हानी झाली नाही मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकच मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतून विस्कळीत झाली आहे.   

****

हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे, या निर्णयाला सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे, दरम्यान, तिरुपती - आदिलाबाद - तिरुपती कृष्णा एक्सप्रेस च्या मार्गात येत्या २६ मार्च पासून बदल करण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी आता सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. 

****

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल १७ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.  यापैकी सहा नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचं बक्षीस होतं. हे  नक्षलवादी 'निया नेलनार' म्हणजेच 'युअर गुड व्हिलेज' या शासनाच्या योजनेनेही प्रभावित झाले आहेत. या योजनेंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासनाकडून ग्रामिण भागात मूलभूत सुविधा पुरवून विकास केला जातो आहे.

****

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा ९४ धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंडिया मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २२० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फक्त १२६ धावाच करू शकला. भारताकडून सचिन तेंडुलकरने ४२ धावा आणि युवराज सिंगने २६ धावा केल्या तर शाहबाज नदीमने चार बळी घेतले. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...