Friday, 14 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा-बंजारा तांड्यावर रंगोत्सवाचा उत्साह

·      जालन्यात हत्तीरिसाला परंपरा उत्साहात साजरी तर विड्यात जावयाची गर्दभस्वारी यंदा स्थगित

·      प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे दोन लाख सौर उर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

आणि

·      सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश

****

धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज पहाटे साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो.

****

यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही पाळण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारीक लेंगी नृत्य सादर झालं.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपारिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज इस्कॉन संघटनेतर्फे संध्याकाळी शहरातील अदालत रोड नजिकच्या केंद्रात गौर पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक आज उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे १३६ वे वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा-प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते, त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात, असा प्रघात आहे. आजही ही मिरवणूक उत्साहात पार पडली. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवाणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.

****

येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली, त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता ५६ रुपये प्रतिलीटरवरून ५८ रुपये प्रतिलिटर, तर म्हशीच्या दुधाची विक्री ७२ रुपये प्रतिलीटरवरून ७४ रूपये प्रतिलिटर होणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली.

****

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० लाख ९ हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

यूएफबीयू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या २४ आणि २५ मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. बँकांमधल्या रिक्त पदांवर भरती, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन बरोबर युएफबीयूची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानं, संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने उपग्रह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे साडे चौदा कोटी अमेरिकी डॉलर महसूल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षांत इस्रोने एकूण ३९३ विदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सिंगापूरसह ३४ विकसित देशांच्या उपग्रहांचा समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचही सूचित करण्यात आलं आहे.

****

पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष २०२० मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अवघ्या चार वर्षांत पुन्हा लेपन करण्याची वेळ येते, म्हणजे यापूर्वीचे काम निकृष्ट झालं होतं, असं संघटनेनं म्हटलं आहे. अशा पद्धतीने वारंवार लेपन केल्यास, मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.

दरम्यान, मंदिराच्या जतन-संवर्धन-जीर्णोद्वाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी - पाच जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. याकामाच्या आढाव्यासह टोकन पध्दतीने दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्याने अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वेगेट पार करत असताना अचानक मालवाहून ट्रॅक बंद पडल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहराने कळवली आहे. या अपघातात जीवीत हानी झाली नाही मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतून विस्कळीत झाली आहे.

****

पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठीचे प्रकल्प तयार करण्यासाठी विविध १५ संकल्पना देण्यात आल्या. या उपक्रमात ३६ जिल्ह्यातले १७ हजार ९५६ विद्यार्थी सहभागी झाले होते.

****

इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. येत्या २४ मार्चपासून २०२५ चा हंगाम सुरु होत असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समधे विशाखापट्टणम इथं होईल.

****

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा ९४ धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...