Saturday, 15 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे दोन लाख सौर उर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

·      येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन

·      सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश

·      धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा-जालन्यात हत्तीरिसाला परंपरेचा उत्साह तर विड्यातली जावयाची गर्दभस्वारी यंदा स्थगित

आणि

·      महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना

****

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० लाख ९ हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

यूएफबीयू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या २४ आणि २५ मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. रिक्त पदांवर भरती, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन सोबत युएफबीयूची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानं, संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.

****

जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात येत आहे. ग्राहकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा अबाधित ठेवणं, ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना चालना देणं तसंच या हक्कांचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणं, या उद्देशाने हा दिवस पाळण्यात येतो. शाश्वत जीवन शैलीसाठी न्यायोचित परिवर्तन ही या वर्षीच्या ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. पितांबर सरोदे यांचं काल नंदुरबार इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. सरोदे यांची ३० हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. आकाशवाणीच्या जळगाव आणि धुळे केंद्रावरून त्यांनी पन्नासहून अधिक व्याख्यानं आणि चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता.

****

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचही सूचित करण्यात आलं आहे.

****

भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने काल रात्री एक अंतराळ यान अवकाशात पाठवलं. सुनिता आणि बूच विल्मोर हे दोघं अंतराळवीर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवडाभरासाठी अंतराळ स्थानकावर गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून ते तिथेच अडकून पडले आहेत.

****

जर्मन भाषा मराठीतून शिकता यावी यासाठी बालभारतीने जर्मन कोर्सबुक म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात जर्मन उच्चार देवनागरी लिपीतून देण्यात आले आहेत.

****

धुलिवंदनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिकांनी कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा केल्याचं पहायला मिळालं.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध असलेली राजवाडी काठीची होळी काल पहाटे साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. या अनोख्या होलिकोत्सवासह राज्यभरातल्या धुलिवंदन सोहळ्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.

‘‘ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो.

**

यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते.

दरम्यान, यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारीक लेंगी नृत्य सादर झालं.

**

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपारिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.

**

जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे १३६ वे वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा-प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते, त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात, असा प्रघात आहे. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवाणुकीत मोठ्या संख्यने सहभाग घेतला.

**

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.

**

छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत - इस्कॉन संघटनेच्या वतीनं काल गौर पौर्णिमा उत्सव साजरा झाला. अनेक बांधव या सोहळ्यात सहभागी झाले.

दरम्यान, नांदेड इथं शीख बांधवांचा होलामोहल्ला सोहळा आज साजरा होणार आहे.

****

महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.

दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.

****

ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल, भारताचा लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. तर, महिला दुहेरीत त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा गाभारा आणि सभामंडप काल द्राक्षांनी सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. ही द्राक्षं नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली.

****

पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष २०२० मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीने वारंवार लेपन केल्यास, मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.

दरम्यान, मंदिराच्या जतन-संवर्धन-जीर्णोद्वाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी - पाच जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. याकामाच्या आढाव्यासह टोकन पध्दतीने दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...