Wednesday, 12 March 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 12 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतल्या लाभार्थ्यांना २१०० रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी दोन कोटी ३३ लाख ३३ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता, ही संख्या आता २ कोटी ४७ लाख इतकी झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली. 

यावेळी, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रश्न विचारण्याची परवानगी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मागितली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावत पुढचं कामकाज सुरू केलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं ऊसाच्या ट्रकच्या अपघातात मृत व्यक्तींच्या वारसांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडून पाच लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी ५० हजार रुपये वैद्यकीय खर्च देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. ते आज विधानसभेत बोलत होते. जिल्ह्यात कन्नड ते पिशोर मार्गावर काल झालेल्या या अपघातात सहा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, तर ११ कामगार जखमी झाले होते.

****

टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन, हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये, असं आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलं. टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. बँकेपेक्षा तीन टक्क्यांहून अधिक व्याज देणाऱ्या आश्वासनांचं नंतर घोटाळ्यात रूपांतर होतं, त्यामुळे अशा आमिषांना नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषदेत विशेष बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कालची चर्चा आज पुढे सुरू झाली. सत्ताधारी सदस्यांनी केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांकडे लक्ष वेधलं आणि या योजना अधिक बळकट करण्याचं आश्वासन दिलं. विरोधकांनी मात्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीका करत, कांदा, सोयाबीनसारख्या पिकांना योग्य भाव देण्याची मागणी केली. 

****

शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, आदी मागण्यांसाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा सरकारनं अर्थसंकल्पात केली नाही, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

****

क्रीमिलेअरची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल विधानपरिषदेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार क्रीमिलेअरची अट घालण्यात आली असल्याचं सांगून सावे यांनी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं नमूद केलं. 

****

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड इथल्या प्रिती संगमावरील समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत असून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देत असल्याचं पवार यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे.

****

नाशिक शहरात जीबीएस म्हणजेच गुईलेन बॅरे सिंड्रोमचा एक रुग्ण आढळला आहे. नाशिक महापालिकेनं या रुग्णावर उपचार सुरू केले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन नाशिक महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला बीड पोलिसांनी प्रयागराज इथून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून भोसले फरार झाला होता. बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांशी समन्वय साधून खोक्याला अटक केल्याची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी इथला कृषी सहायक भास्कर हरणे याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडलं. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सीताफळ लागवडीसाठीचे फोटो जिओ टॅगिंग करून फळबागेचं मस्टर मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. 

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 29 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...