Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची
शपथ दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते.
शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी राजघाट इथं राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
राधाकृष्णन यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा
राष्ट्रपतींकडे सूपूर्द केला. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सध्या गुजरातचे
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत ज्ञान
भारतम विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी ते ज्ञान भारतम पोर्टलचं
उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी ज्ञान भारतम
या डजिटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताच्या
ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणं, ही या परिषदेची संकल्पना असून, कालपासून या परिषदेची सुरुवात झाली. देशोदेशीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज्ञ आणि धोरण तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.
****
येत्या ३१ मार्च पूर्वी देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन
होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगढ मध्ये गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षादलांबरोबर
झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाल्याच्या वृत्ताचा उल्लेख करत शहा यांनी, नक्षलवादाविरोधात हा मोठा विजय असल्याचं नमूद केलं. उरलेल्या
इतर नक्षलवाद्यांनी देखील वेळेआधी आत्मसमर्पण करावं, असंही त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं.
****
भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन - एन पी सी आय नं
व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातील युपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत
वाढवली आहे. येत्या १५ तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा
असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या, अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. मात्र, व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा १ लाख रुपये प्रति
दिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. इतर क्षेत्रातही युपीआय व्यवहाराची मर्यादा
वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक मर्यादा प्रति व्यवहार
२ लाखांवरून ५ लाख रुपये, तर ई-मार्केटप्लेसवरील शासकीय व्यवहार मर्यादा १ लाखांवरून ५
लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बिल
भरणा आता प्रति दिवस ५ लाख रुपयांपर्यंत करता येणार असून, सोने-चांदी दागिने खरेदी आता १ लाख रुपयांऐवजी २ लाख रुपयांपर्यंत
करता येणार आहे. या सुधारित मर्यादांमुळे विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उच्च-मूल्य
व्यवहारासाठी यूपीआय अधिक उपयुक्त ठरेल आणि यामुळे देशातल्या डिजिटल व्यवहारांच्या
प्रमाणात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास एन सी पी आय ने व्यक्त केला आहे.
****
मुंबई विद्यापीठात स्वतंत्र ‘विमुक्त जाती - भटक्या जमाती
संशोधन केंद्र’ स्थापन केलं जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व विभागांमध्ये या समाजघटकांचा
विस्तृत अभ्यास आणि संशोधन केलं जाणार आहे. या स्वतंत्र केंद्रामुळे विमुक्त जाती
- भटक्या जमातींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कृतिक पातळीवर नवं व्यासपीठ मिळेल, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर रवींद्र कुलकर्णी
यांनी म्हटलं आहे.
****
उजबेकिस्तान च्या समरकंद इथं सुरु असलेल्या फिडे ग्रँड
स्विस बुद्धीबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारतीय बुद्धीबळपटू निहाल सरीनने ईराणच्या
परम मघसूदलू चा पराभव केला. या स्पर्धेत निहाल आणि जर्मनीचा मथायस ब्लूबाम साडे पाच
गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर आहेत.
दरम्यान, विश्वविजेता डी गुकेश याचा सातव्या फेरीत तुर्कीच्या एडिज गुरेलनं
पराभव केला असून, गुकेशला या स्पर्धेत
सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला तीन गुण मिळाले असून, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकावा
लागणार आहे.
****
पैठणचं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे १२ दरवाजे
अर्धा फूट उघडून सहा हजार २०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात
सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा अधिक करण्यात येईल, असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यात अवैधरित्या राहणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना
पोलीसांनी अटक केली. यात सहा महिलांचा समावेश आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून
या नागरीकांना ताब्यात घेतल्याचं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment