Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 10 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
सी पी राधाकृष्णन देशाचे १७ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती
आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन
·
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा
हप्ता जमा
·
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी
८२२ कोटी २२ लाख रुपये निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
·
मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जीआर मागे घेण्यासाठी छगन
भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, जीआर मागे घेणार नसल्याचं राधाकृष्ण विखे
पाटील यांचं स्पष्टीकरण
आणि
·
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना यजमान
युएई संघासोबत
****
देशाचे
१७ वे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन निवडून आले आहेत. या पदासाठी काल झालेल्या
निवडणुकीत राधाकृष्णन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश
न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. राधाकृष्णन यांना ४५२
मतं तर रेड्डी यांना ३०० मतं मिळाली. राधाकृष्णन यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा हा
संक्षिप्त आढावा...
‘‘चार मे १९५७
रोजी तत्कालीन मद्रास प्रांतात तिरुपूर इथे जन्मलेले राधाकृष्णन यांनी वयाच्या १६
व्या वर्षापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच जनसंघासाठी काम सुरू केलं. १९९८
तसंच १९९९ मध्ये ते दोन वेळा कोयंबतूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. खासदार
पदाच्या कार्यकाळात राधाकृष्णन यांनी वस्रोद्योग विभागाच्या संसदीय समितीचं
अध्यक्षपद भुषवलं. अर्थ, तसंच सार्वजनिक
क्षेत्रातल्या उपक्रमांच्या संसदीय समित्यांचे सदस्य तसंच शेअर बाजार घोटाळ्याच्या
चौकशी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
केंद्र सरकारने २०२३ मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून तर गेल्या वर्षी ३१
जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.’’
दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या
या निवडणुकीत एकूण ७८१ मतदारांपैकी ७६७ खासदारांनी मतदान केलं, यापैकी १५ मत अवैध तर ७५२ मतं वैध ठरल्याचं, राज्यसभेचे
महासचिव तथा या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी पी सी मोदी यांनी सांगितलं.
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले, ही महाराष्ट्रासाठी
अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकारच्या
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण काल करण्यात आलं. मुंबईत राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पात्र
शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर
एक हजार ८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
उपसा जलसिंचन
योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
कालच्या बैठकीत घेतला. अतिउच्चदाब, उच्चदाब, आणि लघुदाब
उपसा जलसिंचन, अशा सर्व प्रकारच्या एक हजार ७८९ योजनांना वीज
दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी
राज्य शासनाकडून एक हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती
संभाजीनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी २२ लाख रुपये निधी उपलब्ध
करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी नागरी पायाभूत सुविधा
विकास कर्ज योजनेत हुडको कडून दोन हजार कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी मान्यता देण्यात
आली.
****
मराठा आरक्षणाबाबतच्या
शासन निर्णयात सुधारणा करावी किंवा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी
इतर मागास प्रवर्गाचे नेते तथा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबतचं
निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल सादर केलं. हैदराबाद गॅझेटियर
लागू करण्यासंदर्भातल्या या शासन निर्णयात सुधारणा करावी, तसंच
ओबीसी आरक्षणावर याचा काहीही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट करावं,
किंवा हा निर्णय मागे घ्यावा, असं भुजबळ यांनी
या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ
उपसमितीने याबाबतचे सर्व निर्णय अतिशय विचार करुन घेतले आहेत. त्यामुळे शासन निर्णय
मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचं, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण
विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत, भुजबळ यांचा
काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून तो दूर करु, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
**
मराठा आरक्षणाचा
शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही, कुणबी असल्याचे
पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला
कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल
सावे यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी काल
मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक तसंच सामाजिक दृष्ट्या सक्षम करणं हा शासनाच्या सर्व योजनांचा उद्देश
आहे, ओबीसी समाजाच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने चर्चा
करून निर्णय घेतले जातील, असं सावे यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल स्वच्छ वायू सर्वेक्षणाचे पुरस्कार प्रदान
केले. यामध्ये तीन ते १० लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्रातल्या अमरावती शहराने ७५
लाख रुपयांचा पहिला पुरस्कार पटकावला आहे. १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गटात मध्यप्रदेशातल्या
इंदूरनं पहिला क्रमांक मिळवला आहे.
****
स्वातंत्र्यलढ्यात
प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबार इथल्या बाल हुतात्म्यांना काल त्यांच्या ८३व्या
स्मृतीदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. चले जाओ चळवळीत सहभागी झालेले शिरीषकुमार
मेहता, लालदाद शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या पाच बाल सत्याग्रहींना इंग्रजांच्या गोळीबारात
हौतात्म्य आलं होतं. नंदुरबार जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक
आणि शालेय विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्थळावर जाऊन या बालहुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
वस्तू आणि
सेवा कर परिषदेने नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या
जीएसटी करात बदल झाला आहे. शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टरचे
तसंच ट्रॉलीचे ट्यूब टायर्स, खतं तसंच कीटकनाशकांचे घटक पदार्थ,
कडुनिंबापासून तयार झालेली कीटकनाशकं, यांच्यावरचा
जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्के झाला आहे. याविषयी ऐकूया परभणीचे शेतकरी विजय बनसोडे
यांनी दिलेली प्रतिक्रिया…
बाईट - विजय बनसोडे
दरम्यान, तंबाखू सेवनाला
प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीनं पानमसाला, तंबाखूची इतर उत्पादनं,
ई सिगरेटसारखी निकोटीन आधारित पण धूर न सोडणारी उत्पादनं यावरचा कर २८
टक्क्यांवरुन वाढवून ४० टक्के करण्यात आला आहे. याला अपवाद फक्त तेंदुपत्त्यापासून
तयार होणाऱ्या विड्यांचा असून, त्यावरचा कर १८ टक्क्यांवरुन ५
टक्के झाला आहे. नवीन कररचना येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा राबवण्यात येणार
आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी केलं. ते काल याबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. येत्या १७ सप्टेंबर
रोजी ७० हजार शालेय विद्यार्थ्यांचा राष्ट्रगीत आणि राज्य गीत समूहगीत गायन कार्यक्रम
घेणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या
सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं
आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी
केलं. जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेत त्या काल बोलत होत्या.
****
नांदेड
- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यातल्या वरुड शिवारात बस आणि दुचाकीच्या
भीषण अपघात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दुचाकीला
धडक देऊन वीजेच्या खांबाला धडकली. मृत शिवाजी वाघमोडे हे वरुड इथल्या आश्रम शाळेत सेवक
म्हणून कार्यरत होते. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
हरित आणि
प्रदूषणमुक्त शहराच्या निर्मितीसाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते
वृक्षारोपण उपक्रमाचं काल औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. शहरातल्या प्रमुख रस्त्यांचे
दुभाजक तसंच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा
संकल्प जॉन्सन यांनी व्यक्त केला.
****
आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना दुबईत यजमान युएईच्या संघाशी होणार आहे. भारतीय
वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. संयुक्त अरब अमिरातीत कालपासून
सुरू झालेल्या या स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झाला. भारताचा
पुढचा सामना येत्या १४ तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे.
****
No comments:
Post a Comment