Wednesday, 10 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-अमेरिका संबंधांच्या बळकटीचा पुनरुच्चार करत, दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारविषयक वाटाघाटींवर विश्वास व्यक्त केला. उभय देशांचे अधिक चांगले, समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर संदेश प्रसारीत करुन, दोन्ही देशांमध्ये यशस्वी तोडगा निघण्यात कुठलीही अडचण येणार नाही, असं नमूद केलं. आपण आपले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेला उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी, भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार अडथळे दूर करण्यासाठी चर्चा करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली.

भारत आणि अमेरिका हे घनिष्ट मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत, दोन्ही देशांमध्ये व्यापार वाटाघाटीसंदर्भातली चर्चा लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा चमू काम करत असल्याचं, मोदी यांनी सांगितलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास आपण उत्सुक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं नुकतेच कररचनेत महत्वपूर्ण बदल केले आहेत. सरकारने हस्तकला वस्तूंवरील जीएसटी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के केला आहे. या निर्णयामुळे कारागीर आणि पारंपारिक हस्तकला क्षेत्राला मोठी चालना मिळेल. भारताची सांस्कृतिक अर्थव्यवस्था मजबूत करणं, ग्रामीण उपजीविकेला आधार देणं आणि शतकानुशतके जुन्या हस्तकला परंपरा जपणं, हे यामागचं उद्दीष्ट आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचे वित्त सल्लागार प्रवीण साहू यांनी या जीएसटी सुधारणांचं स्वागत केलं आहे. यामुळे मध्यमवर्गाला खूप दिलासा मिळेल, त्याचप्रमाणे, उद्योगालाही याचा मोठा फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील त्यांची निवड राष्ट्रवादी विचारसरणीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्यास कटीबद्ध असल्याचं त्यांनी विजयानंतर दिलेल्या भाषणात नमूद केलं. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्त्वाचे आहेत, लोकशाहीचं हित लक्षात ठेवलं जाईल, असं राधाकृष्णन म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली. नेपाळमधली हिंसा ही हृदयद्रावक आहे, असं सांगून पंतप्रधानांनी, नेपाळमधल्या तरुणांच्या जिवीत हानीबद्दल दु:ख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व समाजमाध्यमावरच्या संदेशातून अधोरेखित केलं.

दरम्यान, नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा, जे नागरीक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित रहावं, स्थानिक प्रशासनाच्या तसंच दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन या केंद्रामार्फत करण्यात आलं आहे.

दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिगोसह इतर अनेक विमान कंपन्यांनी नेपाळसाठीची प्रवास उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

****

उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं झालेल्या ढगफुटीच्या ३५ दिवसांनंतर कालपासून पुन्हा गंगोत्री धाम यात्रा सुरू झाली. या आपत्तीत गंगोत्री राष्ट्रीय महामार्गाला मोठं नुकसान झालं होतं. मात्र प्रशासन आणि सीमा रस्ते संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे महामार्ग दुरुस्त करून भाविकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. यात्रेच्या काळात सुरक्षितता आणि सुरळीत वाहतूक करण्यासाठी खास शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. काल संध्याकाळपर्यंत शंभराहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामात पूजा करून दर्शन घेतलं.

****

केंद्र शासनाच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानच्या परीक्षण प्रयोगशाळा म्हणजेच सी पी आर आय चं उद्घाटन आज केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती होणार आहे. शंभर एकर क्षेत्रात साकारलेली ही प्रयोगशाळा महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यातल्या उद्योजकांना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

****

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, हैदराबाद गॅझेटिअरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागण्यांसाठी आज बीड जिल्ह्यातल्या केज इथं ओबीसी बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अन्यथा आम्ही देखील मुंबई जाम करू, असा इशारा ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी यावेळी दिला. 

****

नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रारुप प्रभाग रचनेवर विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या ९१ हरकती आणि सुचनांवर काल तीन तासात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर सर्व हरकतींचा अहवाल शासनाकडे पाठवणार असून, प्रभाग रचनेची अंतिम यादी १३ ते १५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

****

No comments: