Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पूर्ण-थोड्याच वेळात मतमोजणी
· राज्यशासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण
· छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी ८२२ कोटी २२ लाख रुपये निधी देण्यास मंत्रिमंडळाची
मान्यता
· मराठा आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करावी किंवा निर्णय मागे घ्यावा-मंत्री
छगन भुजबळ यांची मागणी
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ;भारताचा
उद्या यजमान युएईसोबत सामना
****
उपराष्ट्रपतिपदासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. थोड्या वेळातच या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. एनडीएचे
उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार, निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात या पदासाठी थेट लढत
झाली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंह, प्रल्हाद
जोशी,
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, माजी
पंतप्रधान एच डी देवेगौडा, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते
मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर खासदारांनी मतदान केलं. तर बिजू जनता दल आणि
भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी या निवडणुकीत मतदान केलं नाही.
****
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं
आज वितरण करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर
मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित
करण्यात आला. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार ८९२ कोटी ६१ लाख रुपये
जमा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत
देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. अतिउच्चदाब, उच्चदाब,
आणि लघुदाब उपसा जलसिंचन, अशा
सर्व प्रकारच्या एक हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढीचा लाभ
सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून एक हजार सातशे अठ्ठावन्न
कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी
८२२ कोटी २२ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात
आली. यासाठी नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडको कडून दोन हजार कोटी रुपये
कर्ज घेण्यासाठी मान्यता देण्यात आली. यासोबतच नागपूर महापालिकेसाठी २३८ कोटी रूपये
आणि मीरा भाईंदर महापालिकेसाठी ११६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा आणि कानडी
लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चाच्या तरतुदीसही आज मंत्रिमंडळ बैठकीत
मंजुरी देण्यात आली.
****
यंदाच्या खरीप हंगामात देशात १०१ कोटी ५ लाख हेक्टर क्षेत्रावर
पेरणी झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे. या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास
२७ लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं विभागानं याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज स्वच्छ वायू
सर्वेक्षणाचे पुरस्कार प्रदान केले. यामध्ये तीन ते १० लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्रातल्या
अमरावती शहराने ७५ लाख रुपयांचा पहिला पुरस्कार पटकावला आहे. १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या
गटात मध्यप्रदेशातल्या इंदूरनं पहिला क्रमांक मिळवला आहे.
****
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्या
ठिकाणी राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं
केलं आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल मंत्रालयानं दु:ख व्यक्त केलं
आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये समाज माध्यमांवरील
बंदीविरोधात तरुणांनी आंदोलन केलं, यावेळी झालेल्या गोळीबारात १९
जणांचा मृत्यू झाला, तर ३४० पेक्षा जास्त जण जखमी झाले. समाजमाध्यमांवरील
बंदी मागे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा
दिला असून,
अनेक मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याचं वृत्त आहे. या घडामोडीनंतर
नेपाळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
****
स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबार इथल्या
बाल हुतात्म्यांना आज त्यांच्या ८३व्या स्मृतीदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. चले
जाव चळवळीत सहभागी झालेले शिरीषकुमार मेहता, लालदाद
शहा,
धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास
शहा या पाच बाल सत्याग्रहींना इंग्रजांच्या गोळीबारात हौतात्म्य आलं होतं. नंदुरबार
जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी
हुतात्मा स्थळावर जाऊन या बालहुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी पोलीस दलातर्फे हवेत
बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
****
मराठा आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करावी किंवा निर्णय
मागे घ्यावा,
अशी मागणी इतर मागास प्रवर्गाचे नेते तथा अन्न पुरवठा मंत्री
छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना सादर केलं. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा सध्या साडे तीनशेहून अधिक जातींना लाभ
होत आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातल्या या शासननिर्णयात सुधारणा
करावी,
तसंच ओबीसी आरक्षणावर याचा काहीही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट करावं, किंवा हा निर्णय मागे घ्यावा, असं या निवेदनात भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाने कुणबींना ओबीसी तसंच मराठा
समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गात वर्गीकृत केलं आहे, त्यामुळे हे दोन्ही समाज वेगवेगळे असल्याचं सिद्ध होतं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी
उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे. शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टरचे तसंच ट्रॉलीचे ट्यूब टायर्स, खतं
तसंच कीटकनाशकांचे घटक पदार्थ, कडुनिंबापासून तयार झालेली कीटकनाशकं, यांच्यावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्के झाला आहे. याविषयी ऐकूया परभणीचे
शेतकरी विजय बनसोडे यांनी दिलेली प्रतिक्रिया
–
बाईट - विजय
बनसोडे
दरम्यान, तंबाखू सेवनाला प्रोत्साहन मिळू
नये या दृष्टीनं पानमसाला, तंबाखूची इतर उत्पादनं, ई सिगरेटसारखी निकोटीन आधारित पण धूर न सोडणारी उत्पादनं यावरचा कर २८ टक्क्यांवरुन
वाढवून ४० टक्के करण्यात आला आहे. याला अपवाद फक्त तेंदुपत्त्यापासून तयार होणाऱ्या
विड्यांचा असून त्यावरचा कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे. नवीन कररचना येत्या
२२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
****
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची
मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचं
निवेदन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा
आणि भाजीपाला यांचं मोठं नुकसान झालं असून, अनेक
ठिकाणी जनावरं वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं या निवेदनात
म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान
सेवा पंधरवाडा राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी लोकाभिमुख
आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी
प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. याबाबत आज जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याला दिलेलं वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट
पूर्ण करण्याबरोबरच १७ सप्टेंबर रोजी ७० हजार शालेय विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत आणि
राज्य गीत समूहगीत गायन कार्यक्रम घेणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध
पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी नतिशा माथूर यांनी केलं आहे. जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेत त्या आज बोलत
होत्या. यावेळी उपस्थितांना या अभियानात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविषयी माहिती देण्यात
आली.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू
होत असून अबूधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात
लढत होईल. भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएईच्या संघाशी तर येत्या १४ तारखेला पाकिस्तान
बरोबर होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान,
ओमान आणि यूएईचा समावेश असून, ब गटात
श्रीलंका,
अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा
समावेश आहे.
****
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व खेळांच्या पंचांना छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेने मानधन वाढ लागू केली आहे. आता या पंचांना प्रतिदिन ३०० रुपयांऐवजी, प्रति दिन एक हजार रुपये मानधन मिळेल. छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष
पंकज भारसाखळे यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment