Tuesday, 9 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपसभापती हरिवंश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक सदस्यांनी मतदान केलं. सकाळी दहा वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. मतमोजणीला सायंकाळी सहा वाजेपासून सुरूवात होईल. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ सदस्य, असे एकूण ७८१ खासदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान ३९१ मतांची आवश्यकता आहे.

****

नवी दिल्ली इथं भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांसाठीच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा काल समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केलं. कार्यशाळेत सहभागी झालेल्या खासदारांनी विविध मुद्द्यांवर त्यांची मतं मांडत विस्तृत चर्चा केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मुलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.

****

राज्यशासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं आज वितरण होणार आहे. मुंबईत मंत्रालयात आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जाणार असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेनेच्या मराठवाड्यातील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठीच्या मेळाव्याला मार्गदर्शन केलं.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल मराठी पत्रकार संघाच्या वतीनं फिनिक्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं झालेल्या या कार्यक्रमात आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी दुप्पट बळ मिळल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

****

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक बांधिलकी भागीदार यांच्यामार्फत एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येईल, तसंच तालुका आणि जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन करण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिलं सर्वेक्षण पूर्ण झालं असून नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण लवकरच होणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.

****

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातल्या प्रियांका निलेश खोत यांची सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. वीर पत्नीच्या कोट्यातून देशभरात असलेल्या या एक जागेसाठी प्रियंका यांची निवड करण्यात आली. यासाठीची प्रवेश परीक्षा तसंच ११ महिन्यांचं कठोर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. सैन्य दलात असलेले त्यांचे पती नीलेश खोत यांचं सात नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झालं होतं.

****

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाचं आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'नागरी आपत्ती जोखीम सक्षमता' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला. काल उद्घाटन सत्रानंतर विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आपत्कालीन परिस्थिती आणि जोखीम सौम्यीकरणबाबत मार्गदर्शन केलं. उद्या या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.

****

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी, १७ सप्टेंबरला होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं, विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. शहरातल्या सिध्दार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. संबंधित विभागांनी कार्यक्रमस्थळी नियोजन करण्याची सूचना आयुक्त पापळकर यांनी केली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात काल एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला. नंदूरबारहून वसईकडे जाणाऱ्या बसला सटाणा-ताहाराबाद महामार्गावर वनोली फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांसह तिघे ठार झाले. या प्रकरणी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर आलेल्या १७६ हरकती मान्य करण्यात आल्या, तर १२ हरकती फेटाळून लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर बार्शी बाजार समितीसाठी अंतिम पाच हजार २५८ मतदारांची मतदार यादी झाली आहे.

****

No comments: