Monday, 8 September 2025

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरापगड जातींना मुख्य प्रवाहात आणणार-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, रामोशी-बेडर समाजासाठी विविध योजना जाहीर

·      ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम, उपसमित्यांकडून कोणावरही अन्याय होणार नाही-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

·      मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात काल गणेश विसर्जन संपन्न, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे दीड लाख मुर्त्यांचं विसर्जन

·      आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर मिळवला विजय

आणि

·      जायकवाडी आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा प्रशासनाचा इशारा

****

छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारलं, त्यांचं शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणं हेच शासनाचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथं आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचं बिगर तारण कर्ज, तसंच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

इतर मागासवर्ग - ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम असून, यासंदर्भात स्थापन उपसमित्यांकडून कोणावरही अन्याय होणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ओबीसी संघटनांना आंदोलनाचा अधिकार आहे, उपसमितीच्या शिफारशींमुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील, असं बावनकुळे म्हणाले.

बाईट- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

ओबीसी पदाधिकारी न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, सरकारही न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडेल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही राजकीय बाऊ न करता उपसमितीकडे आपली बाजू मांडावी, असं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं.

****

मातंग समाजातल्या युवक युवतींनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मोठ्या प्रवाहात येत प्रगती करावी, असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. ते काल बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय सामाजिक मंत्रालयाच्या विदेश शिष्यवृत्ती बद्दल आठवले यांनी माहिती दिली.

****

राज्यात अनेक ठिकाणी परवा सुरु झालेली गणपती विसर्जन मिरवणूक काल संपली. मुंबईच्या लालबागच्या राजाचं विसर्जन तराफ्यातल्या बिघाडामुळे बराच वेळ खोळंबलं होतं, ते काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास झालं. तसंच उमरखाडीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह सुमारे २० सार्वजनिक गणेशमंडळांच्या मानाच्या गणेशाचं विसर्जनही काल शांततेत पार पडलं. पुण्यातही काल दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.

**

छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या गणपतींचं काल विसर्जन झालं. परंपरेनुसार एक दिवस उशिरा छावणी परिसरातल्या गणेश मंडळाच्या वतीनं बाप्पाला निरोप देण्यात येतो. छावणी परिसर तसंच नंदनवन कॉलनी, पडेगाव, तिसगाव, भीमनगर, भवसिंगपुरा इथली गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी झाली होती.

छत्रपती संभाजीनगर शहरात यंदा एकूण एक लाख ४३ हजार ७९४ मुर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं, तर जवळपास ५२ टन निर्माल्य जमा करण्यात आलं. विसर्जनानंतर मध्यरात्रीपर्यंत महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी सर्व विसर्जन विहीर तसंच कृत्रिम तलाव परिसर स्वच्छ केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना, तर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक बैठक आज दिल्लीत बोलावण्यात आली आहे.

****

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. यातल्या काही बाबींविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

‘‘लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवर १२ टक्क्यांऐवजी आता पाच टक्के कर आकारला जाणार आहे. त्या मध्ये बाळांच्या दुधाच्या बाटल्या, निपल्स, डायपर्स, खेळणी, विशेषतः स्वदेशी कारागीरांनी तयार केलेल्या बाहुल्या, इत्यादीं वस्तूंचा समावेश आहे.

पेन्सिल, शार्पनर, आणि खोडरबर, शालेय वह्या पुस्तकं, प्रयोगवह्या, आलेख वह्या, नकाशे, शैक्षणिक उपकरणं आदी साहित्य करमुक्त होणार आहे. कंपासपेट्या आणि रंगपेट्या, मुलांच्या तीनचाकी सायकल, हँडमेड कागद, दप्तरं, पाऊचेस, पत्त्यांचे कॅट, कॅरमबोर्ड आणि इतर बैठ्या आणि मैदानी क्रीडासाहित्यावरचा कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे. मात्र उंची दर्जाचे विशेष वापरासाठीचे कागद, पॅकिंगसाठी वापरले जाणारे कोरोगेटेड पुठ्ठे या सामुग्रीवरचा कर १२ ऐवजी १८ टक्के करण्यात आला आहे. नवीन कररचना येत्या २२ सप्टेंबरपासून लागू हो आहे.’’

****

खग्रास चंद्रग्रहण काल भारतातून स्पष्टपणे दिसलं. रात्री नऊ वाजून ५७ मिनटांनी सुरु झालेलं हे ग्रहण, उत्तर रात्री एक वाजून २७ मिनटांनी संपलं. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं ही एक दुर्लभ खगोलीय घटना घडते. एका दशकातल्या सर्वात दिर्घ ग्रहणांतलं हे एक ग्रहण होतं.

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस ग्रहण काळात स्नान घालून श्वेत वस्त्रात ठेवण्यात आलं होतं. ग्रहण समाप्तीनंतर देवीचे दैनंदिन विधी पंरपरेनुसार करण्यात येत आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथलं शेंद्रा - बिडकीन औद्योगिक क्षेत्र - ऑरिक स्मार्ट सिटी, सहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. औद्योगिक प्रगती, जागतिक गुंतवणूक आणि शाश्वत विकासाचा प्रवास यानिमित्तानं साजरा होत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी:

‘‘राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट शहरांपैकी हा एक प्रकल्प आहे. सहा वर्षात या औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक आणि मिश्र वापराच्या श्रेणीमध्ये ३२३ भुखंड वितरित करण्यात आले. यामध्ये तीन हजार २९ एकर औद्योगिक जमीन आणि ११७ एकर मिश्र वापराच्या जमीनीचा समावेश आहे. या क्षेत्रातली एकूण गुंतवणूक क्षमता ७१ हजार ३४३ कोटी, तर रोजगार क्षमता ६२ हजार ४०५ एवढी आहे. सध्या ऑरिक सिटीमध्ये ७८ युनिट्स कार्यरत आहेत. उद्योगांच्या गरजा आणि कौशल्य यांचा मेळ घालण्यासाठी सी आय आय च्या सहकार्यानं या परिसरात २० हजार चौरस फुटांचे कौशल्य विकास केंद्र उभारलं जात आहे.’’

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. शहरातल्या विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. संत एकनाथ रंग मंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यालाही शिंदे उपस्थित राहणार आहेत.

****

दिवंगत साहित्यिक बी रघुनाथ यांनी आपल्या लेखनातून त्या वेळचा काळाचं प्रभावी चित्रण केल्याचं, प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठेकर यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं, कुमठेकर यांच्या 'इत्तर गोष्टी' या कथासंग्रहाला प्रसिद्ध समीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते बी रघुनाथ पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आलं, या पुरस्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. किरण क्षीरसागर यांनी यावेळी इत्तर गोष्टी या कथा संग्रहाचं समीक्षेच्या अंगाने विवेचन केलं. देशपांडे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना, साहित्याच्या सर्वच प्रकारात लेखन करणारे बी रघुनाथ हे पूर्ण लेखक असल्याचं मत व्यक्त केलं. शताब्दी कविता हा नामवंत कवींच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला.

****

हिंगोलीत काल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान विविध गावांमध्ये स्वच्छता, आरोग्यासंदर्भात तपासणी होणार आहे.

****

भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई स्पर्धेचं विजेतेपदक पटकावलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण कोरियावर चार - एक असा विजय मिळवला. या विजयासह भारत २०२६ मध्ये नेदरलँड आणि बेल्जिअम मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या ३३ हजार ८१९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे दोन फूट उघडून ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडलं जात आहे. आवक बघून पाणी सोडण्याचं प्रमाण कमी अथवा जास्त करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

**

लातूर शहराला पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्पही जवळपास ९९ टक्के भरला आहे. धरणातून सध्या एक हजार ७४७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

No comments: