Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 December
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नौदल दिवस आज साजरा होत आहे. समुद्राच्या पलीकडील क्षितिजावर
राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या आपल्या नौदल वीरांच्या अतुलनीय शौर्य, शिस्त आणि समर्पणाला सलाम करण्याचा
हा दिवस. समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते आव्हानात्मक समुद्रात जीवित बचाव मोहिमा
राबवण्यापर्यंत, भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं
आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलातले सर्व अधिकारी, जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या
आहेत. देशाच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी नौदलाने दाखवलेलं शौर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची पंतप्रधानांनी
प्रशंसा केली.
****
लोकसभेत आज आरोग्य सुरक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय
सुरक्षा उपकर विधेयक २०२५ वर चर्चा होणार आहे. या विधेयकातील तरतुदी, त्यांचा वित्तीय परिणाम आणि मिळणाऱ्या
महसूलाचा विनियोग याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहाला माहिती देतील.
राज्यसभेत विविध मंत्रालयं आणि विभागांच्या संसदीय स्थायी समित्या आपले अहवाल आज सादर
करतील.
****
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून दोन दिवसांच्या
भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत सहभागी
होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यातील वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि
रशियामधल्या धोरणात्मक भागीदारीतील सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे.
****
छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या
चकमकीत १२ नक्षलवादी मारले गेले. यात जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक दलाचे तीन सैनिक हुतात्मा
झाले, तर दोन जण जखमी झाले.
दंतेवाडा – बिजापूर सीमेवर हे नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर तिथं संयुक्त शोधमोहीम
राबवण्यात आली.
****
डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता मिळले, फक्त १५ रुपयात अधिकृत उतारा उपलब्ध
होईल, तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची
गरज राहणार नाही. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि १६ अंकी पडताळणी
क्रमांक असलेले ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असतील. हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी
सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान
सेवा यांचा नवा अध्याय असेल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
****
दत्त जयंती आज सर्वत्र मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात
साजरी होत आहे. औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन यांसारख्या दत्ताच्या प्रमुख
स्थानांसह राज्यभरातल्या दत्त मंदिरांत पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
शिर्डीत श्री साईबाबा मंदिर, दत्त मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
****
राज्यातल्या काही नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका
मतदानाच्या एक दिवस आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, या निर्णयाशी राज्य सरकारचा काहीही
संबंध नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते
नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या घोळासाठी शासनाला जबाबदार धरलं असून, त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारणच
दिसते, अशी टीका बावनकुळे यांनी
केली. निवडणुका पुढे ढकलू नयेत म्हणून शासनाने आयोगाशी चार वेळा पत्रव्यवहार केला होता, असंही त्यांनी सांगितलं.
****
बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर
दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करणाऱ्या आणि
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. शहरातील
गांधी प्राथमिक शाळेमध्ये आणि शासकीय तंत्रनिकेतन इथल्या मतदान केंद्रावर ही कारवाई
करण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यात लोहारा पोलिस ठाण्यातले तत्कालिन
पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज भिमाळे यांना ५०
हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी उमरगा इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन वर्ष
सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लोहारा इथल्या शिक्षण संस्थेच्या
विरोधात दिलेल्या तक्रारी अर्जावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांनी ५० हजार रुपयांची
लाच मागितली होती.
****
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी प्रारुप मतदार
यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. विभागातल्या आठही जिल्ह्यात मिळून एक लाख ८८ हजार ७७१
पुरूष, ५१ हजार ७६३ महिला तर
१५ तृतीयपंथी, असे एकूण दोन लाख ४०
हजार ५४९ मतदार आहेत. या यादीवर दावे तसंच हरकती १८ डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार
आहेत. अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२६ ला प्रसिद्ध होणार आहे.
****
नांदेड इथं आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवाला आजपासून
सुरूवात होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या या महोत्सवाचं
उद्घाटन माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
****
No comments:
Post a Comment