Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 May 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल
आज ऑनलाईन जाहीर होत आहे. maharesult.nic.in, maha
hssc board.in, आणि
hscresult.mkcl.org
या संकेतस्थळांवर दुपारी
एक वाजता निकाल बघता येईल. गुण पडताळणीसाठी उद्या तीन मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज
करता येतील.
****
चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या
नोटा बँकांकडे परत करण्याच्या घोषणेच्या तीन वर्षांनंतर ९८ पूर्णांक ४७ टक्के नोटा
परत आल्या असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. केंद्रीय बँकेनं आपल्या मुद्रा
व्यवस्थापन अभ्यासानंतर १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याची घोषणा
केली होती. त्यावेळी अशा नोटांची एकूण किंमत ३ पूर्णांक ५६ लाख कोटी रुपये इतकी होती.
यात ३० एप्रिल २०२६ पर्यंत वेगाने घट होऊन या नोटांची किंमत पाच हजार चारशे एकावन्न
कोटी रुपये इतकी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर अजूनही दोन हजार रुपयांच्या
नोटा बदलण्याची सुविधा आरबीआयच्या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.
****
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर
तसंच नाशिकच्या विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या नाशिक महापालिकेच्या 'उन्नत नाशिक' अभियानाचा शुभारंभ जलसंपदा आणि कुंभमेळा
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल नाशिक इथं झाला. नाशिकमध्ये हरीतीकरण, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यावर आधारित हे अभियान असून यात महापालिकेबरोबरच राज्य शासन तसंच विविध
सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण संस्था सहभागी
झाल्या आहेत.
****
पश्चिम बंगालमधल्या १५ मतदान केंद्रांवर
फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या
वेळेत मगरहाट पश्चिम मतदारसंघातील ११ आणि डायमंड हार्बरमधील चार केंद्रांवर मतदान पार पडत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरिक्षकांनी
दिलेल्या अहवालांच्या आधारे संबंधित मतदान केंद्रावरील प्रक्रिया रद्द करण्यात आली
होती.
****
पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा परिसरात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल मिनी ट्रॅव्हलर बसच्या भीषण अपघातात एका
महिलेचा मृत्यू झाला, तर १६ प्रवासी गंभीर
जखमी झाले आहेत. गुजरातमधील एकाच कुटुंबातील हे सर्व प्रवासी होते. बसचं टायर फुटल्यानं
चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अन्य वाहनाने या
बसला जोरदार धडक दिली. या अपघातातील जखमींना
तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेमुळं मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी
वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात
‘बर्ड फ्लु’च्या शिरकाव्यानंतर प्रशासनाने याठिकाणी कारवाईला सुरवात केली आहे. काल
सायंकाळपासून नवापूर मधल्या ‘बर्ड फ्लु’ बाधीत तीनही कुक्कुटपालन केंद्रांमध्ये पशुसंवर्धन
विभाग रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने बाधित कोंबड्या, अंडी, विष्ठा तसंच पशुखाद्याची विल्हेवाट लावत आहे. रात्रीतून
पशुसंवर्धन विभागाच्या ५० कर्मचाऱ्यांनी डायमंड फार्ममधील ११ हजार कोंबड्या आणि आठ
हजार अंडी नष्ट केली असून आज एक किलोमीटर परिसरातील अन्य सहा पोल्ट्रीमधल्या कोंबड्या
आणि अंडी नष्ट केली जाणार आहेत.
****
यंदाच्या मे महिन्यात, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह
हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी या भागांत सरासरीपेक्षा जास्त
तीव्रतेची उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने
वर्तवला आहे. हवामान विभागानं काल आपला मासिक अंदाज जारी केला. त्यानुसार, मे महिन्यात देशाच्या अनेक भागांत
किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी, मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा
प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील
असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई
इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये चेन्नई इथ सायंकाळी साडे सात वाजता
सामना होईल. काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव
केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या २२६ धावांचं लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने
सहा गडी गमावत, १९ पूर्णांक १ षटकात
गाठलं. दिल्ली कॅपिटल्सच्या के. एल. राहुलने या सामन्यात सर्वाधिक ७५ धावा केल्या.
त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment