Wednesday, 1 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सर्वोच्च न्यायालयानं, आमदार आणि खासदारांविरोधातल्या दीड हजारांवर गुन्हेगारी प्रकरणांची सविस्तर माहिती सहा आठवड्यात सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. २०१४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना, या सर्वांनी जाहीर केलेल्या प्रकरणांचाही यात समावेश आहे. अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयं स्थापन करण्याबाबत सरकारची काय योजना आहे, असंही न्यायालयानं विचारलं आहे. या प्रकरणी १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

****

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एनसीटीई च्या परवानगीशिवाय विद्यापीठांमधून तसंच संस्थांमधून चालवल्या जात असलेल्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना पूर्वलक्षी प्रभावानं परवानगी देण्यासाठी एनसीटीईच्या नियमात सुधारणा केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक विधेयक संसदेसमोर सादर केलं जाणार आहे.

****

राज्यातील कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास सरकारनं पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. परवा ३० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता १५ नोव्हेंबर पर्यंत वाढण्यात आली असून, आता १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी खंडीत केली जाणार नाही.

****

राज्यातल्या  सगळ्या नगरपालिका आणि नगरपरिषदांनी घनकचरा आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्पाची कामं हाती घ्यावीत आणि त्यासाठी भारतीय तंत्रशिक्षण संस्थांनी तयार केलेल्या शाश्वत आणि स्वस्त तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नगर विकास आणि पायाभूत सुविधांसाठी या संस्थांना सुलभ कर्ज आणि अनुदानाचं वितरण आज मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कर्ज आणि अनुदान मिळालेल्या नगरपरिषदांमध्ये मराठवाड्यातल्या सेलू तसंच परळी वैजनाथचा समावेश आहे.

****

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्याच विनय गिरडे पाटील यांची निवड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दोघांनी प्रत्येकी ७४ मतं मिळवत भाजपच्या उमदेवारांचा पराभव केला.

****

वाशिम जिल्ह्याच्या कारंजा इथं भूमिअभिलेख कार्यालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये लाच घेताना आज रंगेहाथ अटक करण्यात आली. उपअधीक्षक प्रभाकर कोंजे आणि लेखापाल माणिक खंदारे यांनी मोजणी पत्रकासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

****

धुळे शहरात २००८ मध्ये झालेल्या दंगल प्रकरणी एका आरोपीला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली असून, १६ जणांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी दाखल उर्वरित खटल्यांचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या व्हॅनवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून, सत्तर लाख रुपये लुटून नेले. सांगोला तालुक्यात मेथवडे फाट्याजवळ आज दुपारी ही घटना घडली.

****

गोकुळ दूध संघानं गायीच्या दुधाच्या खरेदी दरात आज दोन रुपयांची घट केली आहे मात्र विक्री दर तसाच ठेवला आहे. गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांकडून यापूर्वी साडेअठ्ठावीस रुपये प्रतिलिटर या दरानं दुधाची खरेदी करत होता, आता साडेसव्वीस रुपये प्रतिलिटर दरानं खरेदी करणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या हंगामाची थकित बिलं त्वरित देण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसह इतर विविध मागण्यांचं पत्र संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास, संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत आज पुरुषांच्या दहा मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत भारतानं सर्व पदकं जिंकली आहेत. शाहजर रिझवीनं सुवर्ण, ओमकार सिंहनं रजत तर जीतू रायनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या दहा मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या पूजा घाटकरनं सुवर्ण तर अंजुम मुदगिलनं रजत पदक जिंकलं. या स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रजत आणि एक कांस्यपदक जिंकून भारत पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

****

AIR NEWS BULEETIN AURANGABAD 01.11.2017_13.00

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.11.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०१ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

मुंबईत आज काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला, यावेळी पोलिसांनी सौम्यबळाचा वापर करत, अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचं वृत्त आहे. काँग्रेस पक्षानं आज मुंबईत दादर इथं फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काढलेला मोर्चा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचत असताना, हा प्रकार घडला.

****

रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून अंमलात आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार अनेक गाड्यांच्या वेळेत बदल झाला असून, प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. दक्षिण मध्य विभागात वेळेत बदल झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड संभलपूर, नांदेड विशाखापट्टणम, परळी अकोला, परळी आदिलाबाद, हैद्राबाद अजमेर, नांदेड बंगळुरू, ओखा रामेश्वरम, शिर्डी सिकंदराबाद, पुणे हैदराबाद, बिकानेर सिकंदराबाद, आदी गाड्यांचा समावेश आहे.

****

इझ ऑफ डुईंग, या सुलभतेनं व्यवसाय करता येण्यासंदर्भातल्या जागतिक यादीत पहिल्या पन्नास देशात स्थान मिळवण्याचं भारताचं लक्ष्य आहे, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. भारतानं यावर्षी या यादीत तीस स्थानांची प्रगती करत शंभरावं स्थान मिळवल्याचं, जागतिक बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. सुलभतेनं कर भरता येण्यासंदर्भातल्या जागतिक यादीतही भारतानं त्रेपन्न स्थानांची प्रगती करत एकशे एकोणीसावं स्थान मिळवल्याचं जेटली यांनी सांगितलं.

****

अंकेक्षण अहवाल सादर करणाऱ्या करदात्यांसाठी ई-फायलिंगच्या माध्यमातून आयकर विवरणपत्रं दाखल करण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवली असून आता यासाठी सात नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे.  काही करदात्यांनी केलेल्या विनंतीमुळे ही मुदत दुसऱ्यांदा वाढवल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून सांगण्यात आलं.

****

शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा जातीसाठी आरक्षित १६ टक्के जागांवर तात्पुरती नेमणूक झालेल्या खुल्या प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना आणखी ११ महिने मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेताना न्यायालयानं, या जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश देत, या जागांवर खुल्या प्रवर्गातल्या पात्र उमेदवारांची अकरा महिन्यांसाठी तात्पुरती नेमणूक करण्यास परवानगी दिली होती. या प्रकरणी पुढची सुनावणी, मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या पीठासमोर येत्या सहा नोव्हेंबरला होणार आहे.

****

राज्यातली कोणतीही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यभर दिव्यांग नोंदणी अभियान चालवलं जाणार आहे. ग्रामीण विकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निधीपैकी तीन टक्के निधी दिव्यांग कल्याण योजनांसाठीच खर्च केला जाईल, असं नमूद करत, जे अधिकारी यात हयगय करतील, त्यांच्यावर कारवाईचा इशारा भुसे यांनी दिला.

****

विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम येत्या पंधरा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी  दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात एक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ‘महाडीबीटी या पोर्टलवर विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल, असं शिंदे यांनी सांगितलं.

****

हिंगोली इथं बनावट नोटा प्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हिंगोली वाहतुक शाखेचे प्रीतम चव्हाण आणि नवनाथ जाधव या दोघांनी अन्य एकाच्या साथीनं ऊसतोडणी मुकादम लक्ष्मण बोडखे याला पाच लाख रुपयात चौपट नोटा देण्याचं आमीष दाखवलं. मात्र बनावट नोटा देण्यापूर्वीच पोलिस पाच लाख रुपये घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी तिघांविरोधात बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली आहे.

****

सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज शहरातल्या गणपती घाटावर नोटाबंदी निर्णयाचं वर्षश्राध्द आणि पिंडदान करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तसंच नोटबंदीनंतर काळा पैसा बाहेर आला नाही, याबद्दल हे आंदोलन करत असल्याचं पक्षानं सांगितलं.

****


Regional Urdu Audio Bulletin, Aurangabad, Date: 01.11.2017 ,Time:8.40-8....


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 01.11.2017 ,Time:8.40-8.45 am

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.11.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·     व्यवसाय सुलभ करण्यासंबंधीच्या जागतिक बँकेच्या अहवालात भारताची १३० व्या स्थानावरून शंभराव्या स्थानावर झेप

·     लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून सर्वत्र साजरा; माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आदराजंली.

·     राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आदेशात सुधारणा, आता फक्त संप कालावधीतल्या चार दिवसांचं वेतन दंड म्हणून कपात करणार

आणि

·     लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

****

व्यवसाय सुलभ करण्यासंबंधीच्या जागतिक बँकेच्या अहवालात भारतानं १३०व्या स्थानावरून शंभराव्या स्थानावर झेप घेतली आहे. याचबरोबर मानांकनात सुधारणा करणाऱ्या सर्वोत्तम देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. दक्षिण आशियामधल्या देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे.  व्यवसाय आणि उद्योग करण्यासाठी कोणते देश उत्तम आहेत, यासंदर्भात जागतिक बँक २००३ पासून दरवर्षी क्रमवारी जाहीर करते. जागतिक बँकेनं निश्चित केलेल्या १० मापदंडांपैकी आठ मापदंडांच्या निकषात भारतानं उत्तम कामगिरी केली आहे.

जागतिक बँकेच्या या अहवालावरून आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांमध्ये भारत सर्वात पुढे असल्याचं दिसून येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अहवालानुसार व्यवहार सुलभ करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा लागू करणाऱ्या मुख्य दहा देशांमध्ये भारताचं नाव आलं असल्याचं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' काल सर्वत्र साजरा झाला. या निमित्तानं काल 'एकता दौड' घेण्यात आली. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणीसह राज्यात ठिकठिकाणी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. औरंगाबाद इथं क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. टिळक पथावरूनही सकाळी एक संदेश फेरी काढण्यात आली. लातूर इथं अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी एकतेची शपथ दिली. जालना इथंही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात केली. नांदेड इथं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी एकता दौडच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना शपथ दिली. परभणी इथं राजगोपालाचारी उद्यानातून सुरू झालेली एकता दौड प्रियदर्शनी मैदानात विसर्जित झाली.

नाशिक, वाशिम, धुळे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली इथंही एकता दौड काढण्यात आली तसंच एकतेची शपथ देण्यात आली. ठिकठिकाणच्या या आयोजनांमध्ये विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना काल त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात इंदिरा गांधी यांना आदराजंली वाहिली. औरंगाबाद इथं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि कार्यकर्त्यांनी गांधी भवन इथं इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नांदेड इथं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार डी पी सावंत, जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता कळसकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं संप काळातलं तसंच एका दिवसासाठी आठ दिवसाचं वेतन कपात करण्याच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. आता फक्त संप कालावधीतल्या चार दिवसांचं वेतन दंड म्हणून कपात करण्यात येणार आहे. किंवा जे कर्मचारी संपकाळातल्या चार दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांचं कोणतही वेतन कपात होणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांच्या उपस्थितीत काल महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

रूग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ दूरध्वनी क्रमांकावर दूरध्वनी केल्यास डॉक्टर उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या सेवेस आजपासून राज्यात सुरूवात होत आहे. ही दूरध्वनी सेवा मोफत असणार असल्याचं  आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार कर्नाटकी संगीत गायक टी एम कृष्णा यांना काल काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जनआक्रोशाचं वादळंच भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचेल असा इशारा राज्यसभेतले  विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे. अहमदनगर इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध निर्णयांवर कडाडून टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या मेळाव्यात राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप सरकार जल्लोष करीत असल्याचं सांगत, शेतकऱ्यांची कर्जमाफीतही फसवणूक केल्याचं ते म्हणाले.

****

 भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना सत्तेबाहेर ठेवलं जात असल्याचं, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे, ते धुळे इथं एका कार्यक्रमात बोलत होते.  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पुणे औद्योगिक वसाहतीतल्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

****

लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूर इथल्या भुकंपमापन केंद्रात या धक्क्याची तिव्रता ३ रिश्टरस्केल अशी नोंदवली गेली असुन त्याचा केंद्रबिंदु लातूर पासुन ४२ किलोमीटर अंतरावर दाखवला गेला आहे. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या तीन स्टील कारखान्यांसह अन्य दोन प्रतिष्ठानांवर काल आयकर विभागानं छापे टाकले. आयकर विभागाच्या औरंगाबाद, नाशिक आणि पुणे इथल्या पथकांनी एकाच वेळी टाकलेल्या या छाप्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरु होती. कर चुकवेगिरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विशेष वार्ता गटात नांदेडचे माधव आटकोरे यांना प्रथम पुरस्कार, हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरचे पत्रकार रमेश कदम यांना द्वितीय तर तृतीय पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा इथले पत्रकार दीपक बारकुल आणि लातूर जिल्ह्यातल्या चापोली इथले पत्रकार डॉक्टर रविंद्र भताने या दोघांना विभागून देण्यात आला आहे. शोधवार्ता गटात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्याचे पत्रकार बालाजी वडजे यांना प्रथम तर बीडचे अमोल मुळे यांना द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तृतीय पुरस्कार लातूर जिल्ह्यातले उदगीरचे पत्रकार मुल्ला रोशन अब्दुल कादर आणि लातूरचे पत्रकार राजहंस कांबळे यांना जाहीर झाला आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्या तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पाच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये पक्षाच्या सदस्य संख्येनुसार काँग्रेसचे तीन, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असेल.

****

औरंगाबाद इथं भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलच्या दूरसंचार सल्लागार समितीची जिल्हास्तरीय बैठक काल खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बीएसएनएलनं दूरध्वनीसह मोबाईल ग्राहकांना सुरळीत, स्वस्त आणि जलदगतीनं सेवा पुरवण्याची सूचना खैरे यांनी यावेळी केली.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना आज सायंकाळी सात वाजता दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर होत आहे. गोलंदाज आशिष नेहराचा या संघात समावेश करण्यात आला असून, या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करणार असल्याचं नेहरानं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

****


AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.11.2017_6.50

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...