Wednesday, 1 November 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.11.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·     व्यवसाय सुलभ करण्यासंबंधीच्या जागतिक बँकेच्या अहवालात भारताची १३० व्या स्थानावरून शंभराव्या स्थानावर झेप

·     लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून सर्वत्र साजरा; माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आदराजंली.

·     राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आदेशात सुधारणा, आता फक्त संप कालावधीतल्या चार दिवसांचं वेतन दंड म्हणून कपात करणार

आणि

·     लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

****

व्यवसाय सुलभ करण्यासंबंधीच्या जागतिक बँकेच्या अहवालात भारतानं १३०व्या स्थानावरून शंभराव्या स्थानावर झेप घेतली आहे. याचबरोबर मानांकनात सुधारणा करणाऱ्या सर्वोत्तम देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. दक्षिण आशियामधल्या देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे.  व्यवसाय आणि उद्योग करण्यासाठी कोणते देश उत्तम आहेत, यासंदर्भात जागतिक बँक २००३ पासून दरवर्षी क्रमवारी जाहीर करते. जागतिक बँकेनं निश्चित केलेल्या १० मापदंडांपैकी आठ मापदंडांच्या निकषात भारतानं उत्तम कामगिरी केली आहे.

जागतिक बँकेच्या या अहवालावरून आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांमध्ये भारत सर्वात पुढे असल्याचं दिसून येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अहवालानुसार व्यवहार सुलभ करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा लागू करणाऱ्या मुख्य दहा देशांमध्ये भारताचं नाव आलं असल्याचं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' काल सर्वत्र साजरा झाला. या निमित्तानं काल 'एकता दौड' घेण्यात आली. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणीसह राज्यात ठिकठिकाणी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. औरंगाबाद इथं क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. टिळक पथावरूनही सकाळी एक संदेश फेरी काढण्यात आली. लातूर इथं अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी एकतेची शपथ दिली. जालना इथंही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात केली. नांदेड इथं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी एकता दौडच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना शपथ दिली. परभणी इथं राजगोपालाचारी उद्यानातून सुरू झालेली एकता दौड प्रियदर्शनी मैदानात विसर्जित झाली.

नाशिक, वाशिम, धुळे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली इथंही एकता दौड काढण्यात आली तसंच एकतेची शपथ देण्यात आली. ठिकठिकाणच्या या आयोजनांमध्ये विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना काल त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात इंदिरा गांधी यांना आदराजंली वाहिली. औरंगाबाद इथं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि कार्यकर्त्यांनी गांधी भवन इथं इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नांदेड इथं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार डी पी सावंत, जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता कळसकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं संप काळातलं तसंच एका दिवसासाठी आठ दिवसाचं वेतन कपात करण्याच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. आता फक्त संप कालावधीतल्या चार दिवसांचं वेतन दंड म्हणून कपात करण्यात येणार आहे. किंवा जे कर्मचारी संपकाळातल्या चार दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांचं कोणतही वेतन कपात होणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांच्या उपस्थितीत काल महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

रूग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ दूरध्वनी क्रमांकावर दूरध्वनी केल्यास डॉक्टर उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या सेवेस आजपासून राज्यात सुरूवात होत आहे. ही दूरध्वनी सेवा मोफत असणार असल्याचं  आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार कर्नाटकी संगीत गायक टी एम कृष्णा यांना काल काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जनआक्रोशाचं वादळंच भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचेल असा इशारा राज्यसभेतले  विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे. अहमदनगर इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध निर्णयांवर कडाडून टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या मेळाव्यात राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप सरकार जल्लोष करीत असल्याचं सांगत, शेतकऱ्यांची कर्जमाफीतही फसवणूक केल्याचं ते म्हणाले.

****

 भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना सत्तेबाहेर ठेवलं जात असल्याचं, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे, ते धुळे इथं एका कार्यक्रमात बोलत होते.  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पुणे औद्योगिक वसाहतीतल्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

****

लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूर इथल्या भुकंपमापन केंद्रात या धक्क्याची तिव्रता ३ रिश्टरस्केल अशी नोंदवली गेली असुन त्याचा केंद्रबिंदु लातूर पासुन ४२ किलोमीटर अंतरावर दाखवला गेला आहे. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या तीन स्टील कारखान्यांसह अन्य दोन प्रतिष्ठानांवर काल आयकर विभागानं छापे टाकले. आयकर विभागाच्या औरंगाबाद, नाशिक आणि पुणे इथल्या पथकांनी एकाच वेळी टाकलेल्या या छाप्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरु होती. कर चुकवेगिरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विशेष वार्ता गटात नांदेडचे माधव आटकोरे यांना प्रथम पुरस्कार, हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरचे पत्रकार रमेश कदम यांना द्वितीय तर तृतीय पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा इथले पत्रकार दीपक बारकुल आणि लातूर जिल्ह्यातल्या चापोली इथले पत्रकार डॉक्टर रविंद्र भताने या दोघांना विभागून देण्यात आला आहे. शोधवार्ता गटात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्याचे पत्रकार बालाजी वडजे यांना प्रथम तर बीडचे अमोल मुळे यांना द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तृतीय पुरस्कार लातूर जिल्ह्यातले उदगीरचे पत्रकार मुल्ला रोशन अब्दुल कादर आणि लातूरचे पत्रकार राजहंस कांबळे यांना जाहीर झाला आहे.

****

रभणी महानगरपालिकेच्या तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पाच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये पक्षाच्या सदस्य संख्येनुसार काँग्रेसचे तीन, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असेल.

****

औरंगाबाद इथं भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलच्या दूरसंचार सल्लागार समितीची जिल्हास्तरीय बैठक काल खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बीएसएनएलनं दूरध्वनीसह मोबाईल ग्राहकांना सुरळीत, स्वस्त आणि जलदगतीनं सेवा पुरवण्याची सूचना खैरे यांनी यावेळी केली.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना आज सायंकाळी सात वाजता दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर होत आहे. गोलंदाज आशिष नेहराचा या संघात समावेश करण्यात आला असून, या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करणार असल्याचं नेहरानं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

****


No comments: