Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत आज काँग्रेस आणि महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला, यावेळी पोलिसांनी सौम्यबळाचा
वापर करत, अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचं वृत्त आहे. काँग्रेस पक्षानं आज मुंबईत
दादर इथं फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काढलेला मोर्चा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या
निवासस्थानाजवळ पोहोचत असताना, हा प्रकार घडला.
****
रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून अंमलात
आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार अनेक गाड्यांच्या वेळेत बदल झाला असून, प्रवासाचा
कालावधी कमी झाला आहे. दक्षिण मध्य विभागात वेळेत बदल झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड
संभलपूर, नांदेड विशाखापट्टणम, परळी अकोला, परळी आदिलाबाद, हैद्राबाद अजमेर, नांदेड
बंगळुरू, ओखा रामेश्वरम, शिर्डी सिकंदराबाद, पुणे हैदराबाद, बिकानेर सिकंदराबाद, आदी
गाड्यांचा समावेश आहे.
****
इझ
ऑफ डुईंग, या सुलभतेनं व्यवसाय करता येण्यासंदर्भातल्या जागतिक यादीत पहिल्या पन्नास
देशात स्थान मिळवण्याचं भारताचं लक्ष्य आहे, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं
आहे. भारतानं यावर्षी या यादीत तीस स्थानांची प्रगती करत शंभरावं स्थान मिळवल्याचं,
जागतिक बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. सुलभतेनं कर भरता येण्यासंदर्भातल्या
जागतिक यादीतही भारतानं त्रेपन्न स्थानांची प्रगती करत एकशे एकोणीसावं स्थान मिळवल्याचं
जेटली यांनी सांगितलं.
****
अंकेक्षण अहवाल सादर करणाऱ्या करदात्यांसाठी
ई-फायलिंगच्या माध्यमातून आयकर विवरणपत्रं दाखल करण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवली असून
आता यासाठी सात नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे.
काही करदात्यांनी केलेल्या विनंतीमुळे ही मुदत दुसऱ्यांदा वाढवल्याचं केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळाकडून सांगण्यात आलं.
****
शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा जातीसाठी
आरक्षित १६ टक्के जागांवर तात्पुरती नेमणूक झालेल्या खुल्या प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना
आणखी ११ महिने मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली
आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेताना न्यायालयानं, या जागा
रिक्त ठेवण्याचे निर्देश देत, या जागांवर खुल्या प्रवर्गातल्या पात्र उमेदवारांची अकरा
महिन्यांसाठी तात्पुरती नेमणूक करण्यास परवानगी दिली होती. या प्रकरणी पुढची सुनावणी,
मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या पीठासमोर येत्या
सहा नोव्हेंबरला होणार आहे.
****
राज्यातली कोणतीही दिव्यांग व्यक्ती
शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यभर दिव्यांग नोंदणी अभियान
चालवलं जाणार आहे. ग्रामीण विकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. जिल्हा
परिषदेच्या निधीपैकी तीन टक्के निधी दिव्यांग कल्याण योजनांसाठीच खर्च केला जाईल, असं
नमूद करत, जे अधिकारी यात हयगय करतील, त्यांच्यावर कारवाईचा इशारा भुसे यांनी दिला.
****
विमुक्त
जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम
येत्या पंधरा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश विमुक्त जाती,
भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात एक आढावा बैठक
झाली, त्यावेळी ते बोलत होते. ‘महाडीबीटी या पोर्टलवर विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, अर्ज भरण्याची
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट शिष्यवृत्तीची रक्कम
जमा करण्यात येईल, असं शिंदे यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं बनावट नोटा प्रकरणी दोन
पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हिंगोली वाहतुक शाखेचे प्रीतम चव्हाण आणि नवनाथ जाधव
या दोघांनी अन्य एकाच्या साथीनं ऊसतोडणी मुकादम लक्ष्मण बोडखे याला पाच लाख रुपयात
चौपट नोटा देण्याचं आमीष दाखवलं. मात्र बनावट नोटा देण्यापूर्वीच पोलिस पाच लाख रुपये
घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी तिघांविरोधात बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन
दोघांना अटक करण्यात आली आहे.
****
सोलापूर
शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज शहरातल्या गणपती घाटावर नोटाबंदी
निर्णयाचं वर्षश्राध्द आणि पिंडदान करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. सरकारनं दिलेली
आश्वासनं पूर्ण केली नाहीत तसंच नोटबंदीनंतर काळा पैसा बाहेर आला नाही, याबद्दल हे
आंदोलन करत असल्याचं पक्षानं सांगितलं.
****
No comments:
Post a Comment