Wednesday, 1 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सर्वोच्च न्यायालयानं, आमदार आणि खासदारांविरोधातल्या दीड हजारांवर गुन्हेगारी प्रकरणांची सविस्तर माहिती सहा आठवड्यात सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. २०१४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना, या सर्वांनी जाहीर केलेल्या प्रकरणांचाही यात समावेश आहे. अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयं स्थापन करण्याबाबत सरकारची काय योजना आहे, असंही न्यायालयानं विचारलं आहे. या प्रकरणी १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

****

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एनसीटीई च्या परवानगीशिवाय विद्यापीठांमधून तसंच संस्थांमधून चालवल्या जात असलेल्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना पूर्वलक्षी प्रभावानं परवानगी देण्यासाठी एनसीटीईच्या नियमात सुधारणा केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक विधेयक संसदेसमोर सादर केलं जाणार आहे.

****

राज्यातील कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास सरकारनं पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. परवा ३० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता १५ नोव्हेंबर पर्यंत वाढण्यात आली असून, आता १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी खंडीत केली जाणार नाही.

****

राज्यातल्या  सगळ्या नगरपालिका आणि नगरपरिषदांनी घनकचरा आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्पाची कामं हाती घ्यावीत आणि त्यासाठी भारतीय तंत्रशिक्षण संस्थांनी तयार केलेल्या शाश्वत आणि स्वस्त तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नगर विकास आणि पायाभूत सुविधांसाठी या संस्थांना सुलभ कर्ज आणि अनुदानाचं वितरण आज मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कर्ज आणि अनुदान मिळालेल्या नगरपरिषदांमध्ये मराठवाड्यातल्या सेलू तसंच परळी वैजनाथचा समावेश आहे.

****

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्याच विनय गिरडे पाटील यांची निवड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दोघांनी प्रत्येकी ७४ मतं मिळवत भाजपच्या उमदेवारांचा पराभव केला.

****

वाशिम जिल्ह्याच्या कारंजा इथं भूमिअभिलेख कार्यालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये लाच घेताना आज रंगेहाथ अटक करण्यात आली. उपअधीक्षक प्रभाकर कोंजे आणि लेखापाल माणिक खंदारे यांनी मोजणी पत्रकासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

****

धुळे शहरात २००८ मध्ये झालेल्या दंगल प्रकरणी एका आरोपीला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली असून, १६ जणांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी दाखल उर्वरित खटल्यांचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या व्हॅनवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून, सत्तर लाख रुपये लुटून नेले. सांगोला तालुक्यात मेथवडे फाट्याजवळ आज दुपारी ही घटना घडली.

****

गोकुळ दूध संघानं गायीच्या दुधाच्या खरेदी दरात आज दोन रुपयांची घट केली आहे मात्र विक्री दर तसाच ठेवला आहे. गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांकडून यापूर्वी साडेअठ्ठावीस रुपये प्रतिलिटर या दरानं दुधाची खरेदी करत होता, आता साडेसव्वीस रुपये प्रतिलिटर दरानं खरेदी करणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या हंगामाची थकित बिलं त्वरित देण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसह इतर विविध मागण्यांचं पत्र संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास, संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत आज पुरुषांच्या दहा मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत भारतानं सर्व पदकं जिंकली आहेत. शाहजर रिझवीनं सुवर्ण, ओमकार सिंहनं रजत तर जीतू रायनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या दहा मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या पूजा घाटकरनं सुवर्ण तर अंजुम मुदगिलनं रजत पदक जिंकलं. या स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रजत आणि एक कांस्यपदक जिंकून भारत पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

****

No comments: