Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली
वाहिली जात आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात तसंच भारतीय दूतावासांमध्येही विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजघाट इथल्या गांधीजींच्या समाधीस्थळावर सर्वधर्म
प्रार्थना सभा घेण्यात आली. गांधी जयंतीचं औचित्य साधून आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय
अहिंसा दिवस पाळण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्यांनी राजघाट इथं गांधीजींच्या
समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज
साजरा होत आहे. काल महानवीच्या पूर्णाहुतीनंतर नवरात्रोत्सवाची आज सांगता होत आहे.
आज सरस्वती पूजन, शस्त्र पूजन तसंच वाहन
पूजनही केलं जातं, या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत
झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे.
हिंदू कालगणनेनुसार साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त सोन्याचांदीच्या
आभुषणांसह विविध वस्तू खरेदीचा प्रघात आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमी हा सकारात्मकतेचा संदेश
घेऊन येणारा सण असून जनतेला सत्य आणि न्यायाच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देतो, असं त्यांनी म्हटलं आहे. तर हा सण
सर्वांना धैर्य, ज्ञान आणि भक्तीच्या
मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा देवो असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
**
६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये
साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल
झाले आहेत. यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली होती. यावेळी
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई
यांनी अनुयायांना बुद्ध वंदना दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बुद्ध
लेणी परिसरातल्या विपश्यना केंद्रान धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
विजयादशमीच्या तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा
शताब्दी सोहळा आज साजरा झाला. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ
कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोहळ्याच्या सुरुवातीला बौद्ध धम्म गुरु
दलाई लामा यांचा संघशताब्दीनिमित्त शुभेच्छा संदेश महानगर संचालक डॉ. राजेश लोया यांनी
वाचून दाखवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
****
बीड इथल्या कंकालेश्वर मंदिर आणि
सातारा जिल्ह्यात औंध इथल्या संग्रहालयाचं संवर्धन करताना कामं दर्जेदार व्हाव, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी दिले आहे. यासंदर्भातल्या बैठकीत
ते काल बोलत होते. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसंच या स्मारकांच्या
परिसरातलं एकही झाड तोडलं जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या
सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, बारामतीसह यवतमाळ, धाराशिव आणि लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने
तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पवार यांनी
दिले.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र
भगवानगड विश्वस्त मंडळाला खरवंडी इथल्या वन विभागाची चार हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यास
मंजुरी मिळाली आहे. या जमिनीवर भाविकांसाठी आवश्यक सेवा सुविधा, रुग्णालय, तसंच प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा
मानस महंत नामदेव शास्त्रीमहाराज यांनी व्यक्त केला होता. या मागणीचा सातत्याने केंद्र
सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आणि पर्यावरण मंत्रालयानं हा प्रस्ताव मान्य केला.
या निर्णयामुळे भगवानगड परिसरात भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि समाजोपयोगी
कामांना चालना मिळणार आहे.
****
लोकसहभागातून आदर्श तसंच जलसमृद्ध
गावाची उभारणी करण्याचं आवाहन, जलजीवन मिशनच्या प्रकल्प
संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी केलं आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण
कार्यशाळेत बोलत होत्या.
****
परभणी - जालना - परभणी ही रेल्वे
दैनंदिन चालवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. आजपासून हा बदल लागू झाल्याचं
रेल्वेनं जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा
९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या ३२ हजार ८३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातून सध्या १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी
नदीपात्रात सोडलं जात आहे. माजलगाव धरणातून आठ हजार ४१५, येलदरी धरणातून चार हजार २२०, तर मांजरा धरणातून पाच हजार २४१ दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment