Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
माजी उपपंतप्रधान दिवंगत सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटी दौड आयोजित
केली जाणार आहे. देशवासीयांना यात सहभागी होऊन सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या अखंड
भारताच्या स्वप्नाचा सन्मान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील
संदेशातून केलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या
हस्ते मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं उद्घाटन होत आहे. याप्रसंगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री
डॉ. प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची उपस्थिती आहे. याशिवाय, अमित शहा आज माझगांव गोदीत खोल समुद्रात
मासेमारी करण्यासाठीच्या विशेष नौका लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोग आज नवी दिल्लीत
पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू
आणि विवेक जोशी आज दुपारी सव्वा चार वाजता माध्यमांसमोर उपस्थित राहणार आहेत. यावेळी
मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम, एसआयआर संदर्भात महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आणि काही
राज्यांतील निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती
सुत्रांकडून मिळाली आहे.
****
छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात काल
२१ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. यामध्ये १३ महिलांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांनी तीन एके-४७ रायफल, चार एसएलआर, इतर शस्त्र आणि स्फोटकं पोलिसांकडं
सुपूर्द केली.
****
धाराशिव तालुक्यातील तेर येथील संत
गोरोबाकाका यांची पालखी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर कडे मार्गस्थ झाली. या पालखीचं
काल धाराशिव शहरात भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं.
****
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा
सरकारचा संकल्प असून, या प्रकल्पासाठी सर्व
संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आळंदी
नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात
आलं, त्यावेळी ते बोलत होते. कार्तिकी
वारीपूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या
कामासाठी नगरविकास विभागामार्फत एक कोटी
रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.
****
सूर्याच्या उपासनेला समर्पित छठ पूजेचा
आज तिसरा दिवस, कार्तिक शुक्ल षष्ठीला
विशेषतः बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशात
या पुजेत नदी, तलाव किंवा समुद्रात
उभे राहून सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची प्रथा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
देशवासियांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून सुख, समृद्धी आणि पर्यावरण संरक्षणाची
प्रेरणा घ्यावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी
केलं आहे.
****
देशातला एकमेव पद्म महोत्सव यंदा
५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंग मंदिर इथं
आयोजित करण्यात आला आहे. यंदा बारा पद्म सन्मानार्थी या महोत्सवात सहभागी होत आहेत.
या महोत्सवाचं हे चौथं वर्ष आहे.
****
चौथ्या दक्षिण आशियाई एथलेटिक स्पर्धेत
अर्थात सॅफ मध्ये काल तिसऱ्या दिवशी भारतानं सहा देशांच्या पदकतालिकेत आघाडी घेतली
आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतानं ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकं पटकावत अग्रस्थान पटकावलं. भारतीय
खेळाडूंनी काल अनेक विक्रमही मोडीत काढले. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ५१ पदकं
जिंकली असून त्यात १८ सुवर्ण, १८ रौप्य आणि १५ कांस्य
पदकांचा समावेश आहे.
****
भारोत्तलनपटू प्रीतिस्मिता भोई हिनं
बहरीनमधे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात ९२ किलो वजन उचलत नवा विक्रम
प्रस्थापित केला. या स्पर्धेत तिनं एकूण १५८ किलो वजन उचललं असून तिच्या खात्यात सुवर्णपदक
निश्चित झालं आहे.
****
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी
दाबाचा पट्टा आता तीव्र होत असून ‘मोंथा’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ उद्या संध्याकाळी
किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनाऱ्यावर तीव्र स्वरूपात धडकू शकतं. या चक्रीवादळामुळे
आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये
अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि स्थानिक
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध
भागात काल पाऊस पडला. जालना जिल्ह्यात वेचणीला आलेल्या कापसाचं या पावसानं नुकसान होत
आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या जोरदार पावसामुळं काढणीला आलेला कांदा, सोयाबीन, मका, टोमॅटो, भाजीपाला पिकांचं मोठं
नुकसान झालं आहे. भंडारा आणि गोंदियात पावसामुळं धान पिकाला मोठा फटका बसला आहे, तर. धुळे आणि पालघर जिल्ह्यातही काल
पावसाच्या सरी पडल्या.
दरम्यान, पुढील दोन दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही
ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली
आहे.
****
No comments:
Post a Comment