Sunday, 26 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      २०२६ हे वर्ष आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष, पंतप्रधान मोदींकडून घोषणा

·      जीएसटी बचत महोत्सवामुळे देशभरातील नागरिकांमध्ये उत्साह, मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होणारच, मुख्यमंत्री फडणवीस यांचा आश्वासन

आणि

·      अनंत भालेराव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर, निळू दामले आणि अरविंद वैद्य यांना जाहीर, नऊ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरात वितरण

****

२१ वं शतक हे भारत आणि आसियानचं शतक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मलेशियामध्ये सुरू असलेल्या अग्नेय आशियातील देशांची संघटना असलेल्या आसियान शिखर परिषदेला ते आज दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. भारत आणि आसियान एकत्रितपणे जगातील जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारत आणि आसियान केवळ भौगोलिकच नव्हे तर ऐतिहासिक संबंध आणि सामायिक मूल्यांच्या धाग्याने देखील जोडलेले आहेत.

भारत-आसियान ही मजबूत भागीदारी जागतिक स्थिरता आणि विकासासाठी एक मजबूत पाया म्हणून उदयास येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. २०२६ हे वर्ष आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून पंतप्रधानांनी घोषित केलं.

****

देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १२७ वा भाग होता. यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं.

ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलं आहे, असंही ते म्हणाले. कधीकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या प्रदेशांमध्येही नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळं यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले, असं सांगून, नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करायच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदी यांनी देशवासीयांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या. संस्कृती, निसर्ग आणि समाजातल्या एकतेचं प्रतीक असलेल्या या सणाच्या निमित्ताने समाजातला प्रत्येक घटक एकत्र येतो, हे भारताच्या सामाजिक एकतेचं सर्वात सुंदर उदाहरण असल्याचं ते म्हणाले.

संस्कृत भाषेचं महत्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. यासाठी युवा वर्ग करत असलेल्या प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणारे असतात, त्यामुळे, यापूर्वी देशवासीयांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण पंतप्रधान मोदी यांनी करून दिलं. त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं पथकांमध्ये भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली.

येत्या ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीदिनाचं स्मरण करून, मोदी यांनी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला.

येत्या ७ नोव्हेंबर रोजी, वंदे मातरम्, या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या गीताचं महत्त्व विषद केलं.

निजामाच्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या कोमरम भीम यांची २२ ऑक्टोबरला जयंती झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधानांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. तसंच १५ नोव्हेंबरच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज छठ पूजेच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, छठ पूजेच्या वेळी भक्त सूर्याची पूजा करतात आणि प्रार्थना करतात. या सणात भक्त नद्या आणि तलावांची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. राष्ट्रपती म्हणाल्या की, हा सण स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतो.

****

अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा अनंत भालेराव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर, निळू दामले आणि अरविंद वैद्य यांना जाहीर झाला आहे. नऊ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, पत्रकारिता, संस्कृती, कला आणि सामाजिक कार्य यासारख्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी आणीबाणी: काल आज आणि उद्या या विषयावर संपादक विनोद शिरसाठ यांचे व्याख्यान होणार आहे.

****

साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. फलटण इथल्या नीरा देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यानंतर ते बोलत होते. या प्रकरणात काही जणांनी राजकारण करत माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला, मात्र असं असतं तर आपण या कार्यक्रमाला आलो नसतो असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निंबाळकर आणि कांबळे यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले. यावेळी फलटण इथल्या प्रकल्पामुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं.

****

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची बीड मधल्या कवडगाव इथं भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. डॉ. संपदा यांचा मृत्यू वेदनादायी असून, त्यांना न्याय मिळवून देऊ, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं. स्थानिक आमदार सुरेश धस यांनीही डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी केली आहे.

****

शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोपरांत विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर विज्ञानश्री पुरस्कारासाठी आठ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत, विविध विषयांमध्ये १४ तरुण शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे, तर कृषी विज्ञानातील योगदानासाठी टीम अरोमा मिशन सी एस आय आरला विज्ञान टीम पुरस्कार देण्यात येणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील योगदानासाठी हे पुरस्कार विज्ञानरत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम या चार श्रेणींमध्ये दिले जातात. काल या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

****

भारतातला एकमेव पद्म महोत्सव यंदा पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे देण्यात आली.

****

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट ऑथरिटी ऑफ इंडिया केंद्राला भेट दिली. यावेळी उपसंचालक आणि एनसीओई छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रप्रमुख डॉ. मोनिका घुगे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील क्रीडा रचना अधिक बळकट करण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक विकास, पायाभूत सुविधा वाढ आणि तळागाळातील खेळाडूंना क्रीडा प्रोत्साहन यासाठी राज्य व राष्ट्रीय योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा झाली.

****

परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी जल जीवन मिशन योजने अंतर्गत परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत लोहगाव, मांडाखळी आणि ब्राह्मणगाव या ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन गावातील पाणी पुरवठ्याची पाहणी केली. गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या माथूर यांनी जाणून घेतल्या. तसंच योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी याबाबत ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना निर्देश दिले.

****

पुढील तीन तासांत जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

****

महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेश विरुद्ध होत आहे. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात भारतानं बांगलादेशला फलंदाजीला पाचारण केलं. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या १३ व्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या आहेत. उशिरा सुरू झाल्यामुळे हा सामना आता ४३ षटकांचा होणार आहे. भारतानं यापूर्वीच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली आहे. तर बांगलादेशला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नसल्यानं हा संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे.

****

ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशानं केवळ ठाणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण परिवहन विभागाचा गौरव वाढवला आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुजाता मडके यांचं अभिनंदन केलं आहे.

****

No comments: