Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 October
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला पंतप्रधान आज संबोधित
करतील. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपदही ते भूषवणार आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हरियाणातील अंबाला इथं
राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. याआधी एप्रिल २०२३ मध्ये आसाममधील तेजपूर
हवाई दल तळावरून सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून राष्ट्रपती मुर्मु यांनी उड्डाण
केलं होतं.
****
केंद्रीय कामगार, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज संध्याकाळी नवी दिल्ली
इथं सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान देणार आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे. देशाचे पहिले माहिती आणि प्रसारण
मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
आकाशवाणीकडून वार्षिक सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं.
****
केंद्र सरकारनं २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर
केला आहे. या जनगणनेची पूर्वचाचणी १० ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार
आहे. या मोहिमेदरम्यान माहितीचे संकलन करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना
सहकार्य करण्याचं आवाहन जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे यांनी केलं
आहे. जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर, २०२६ या कालावधीत तर दुसरा टप्पा फेब्रुवारी, २०२७ मध्ये पार पडणार आहे.
****
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा येत्या २३
नोव्हेंबर रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४ हजार ३८५ परीक्षार्थीसाठी
दोन सत्रात ३७ केंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रम
राबवण्याचं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केलं आहे. या अभियानाची मुदत नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढवण्यात
आली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत
असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान "नशामुक्त भारत, खुशहाल भारत" हे उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत इयत्ता ६ वी ते १२
वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच एनसीसी स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून
१० कोटी नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून जनजागृती करण्यात येणार
आहे.
****
बहरीन इथं काल झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत
सहा भारतीय कुस्तीपटूंनी अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत अनंत देशमुखने ६६ किलो
वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. मुलींच्या उपांत्य फेरीत विविध वजनी गटात चार खेळाडूंनी
विजेतेपदं पटकावली तर अहानाने ५० किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत
चार सुवर्ण, दहा रौप्य आणि तेरा कांस्य
अशा एकूम २७ पदकांसह भारत पदकतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी-ट्वेंटी सामन्यांच्या
मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांपैकी पहिला सामना आज कॅनबेरा इथं खेळवला
जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी पावणेदोन वाजता सामना सुरू होईल.
****
महिला क्रिकेटमधे एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकनात भारताच्या
स्मृती मंधानानं ८२८ गुणसंख्येसह अव्वल स्थान गाठलं आहे. ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनर
दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची दुसरी सलामीवीर प्रतिका रावल ५६४ गुणांसह २७ व्या
स्थानावर आहे. गोलंदाजीत, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ७४७ गुणांसह अग्रस्थानी आहे.
****
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ काल रात्री आंध्रप्रदेशात
धडकलं. या वादळाचा जोर सध्या कमी झाला आहे. मात्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशासोबतच महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस
सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २६ तुकड्या या तीन राज्यांच्या किनारपट्टीच्या
भागात तैनात आहेत.
ओडिशात मोंथा चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील
जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले
आहे तसंच झाडं उन्मळून पडल्यामुळे काही रस्ते बंद झाले आहेत.
****
दरम्यान, लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातील पाच गावांमध्ये ढगफूटी
सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं नदी, नाले, ओढे यांना पूर आला आहे.
जिल्ह्यात रेणापूर इथं सर्वाधिक १९० मिलीमीटर इतका पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment