Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
विकसित
भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं-पंतप्रधानांचं
आवाहन
·
सरदार
पटेल यांची जयंती तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
देशभरातून अभिवादन; एकता दिनानिमित्तच्या विविध उपक्रमांना नागरिकांचा
उत्स्फुर्त प्रतिसाद
·
राज्यात
१४ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजनेची अंमलबजावणी
·
‘मिशन मौसम’अंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार
बसवण्याला केंद्राची मंजुरी
आणि
·
दुसऱ्या
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर चार गडी राखून विजय
****
विकसित भारताचं स्वप्न साकार
करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं,
असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर
सुवर्ण जयंतीनिमित्त गुजरातमध्ये एकता नगर इथं राष्ट्रीय एकता दिवस समारंभाला
पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या
एकतेला मजबूती देण्याचा संकल्प केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तत्पूर्वी,
एकता नगर इथं आज भव्य एकता दिवस
संचलन करण्यात आलं. यामध्ये सीमा सुरक्षा दल,
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विविध
राज्यांतील पोलीस दलांच्या तुकड्यांचा समावेश होता. हवाई दलाच्या ‘सूर्य किरण’ पथकानं तिरंग्याची आकर्षक
शौर्यगाथा प्रदर्शित केली. ‘विविधतेून एकता’ या संकल्पनेवर
दहा चित्ररथ या संचलनात सहभागी झाले. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश
होता. यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना,
पंतप्रधानांनी, सरकारनं २०१४ पासून नक्षलवाद आणि
दहशतवादाच्या उच्चाटनासाठी निर्णायक प्रयत्न केल्याचं सांगितलं. सर्व भारतीय
भाषांचं संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला, ते म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
सरदार पटेल यांची शतकोत्तर सुवर्ण
जयंती देशभरात आज राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला
पुष्पांजली वाहिली आणि देशवासियांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरदार पटेल यांचा दृढ निर्धार आणि
दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र बांधला गेला, असं उपराष्ट्रपती सी. पी.
राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं.
****
देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान दिवंगत
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्वत्र त्यांच्या स्मृतींना अभिवादन
करण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ साली दिल्लीत शासकीय निवासस्थानी अंगरक्षकाने
केलेल्या गोळीबारात इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता. लोकसभेचे विरोधी
पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष
मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन इंदिरा गांधी यांना
आदरांजली अर्पण केली.
****
मुंबईत राजभवनात तसंच मंत्रालयात
सरदार पटेल तसंच इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं
महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद कार्यालयात सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या
प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रा यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
परभणी शहरात आज भाजपच्या वतीनं
एकता दौड घेण्यात आली. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गोमातेची
पूजा करून एकता दौडचा प्रारंभ केला. परभणी पोलिसांच्या वतीनंही कृषी विद्यापीठ गेट
ते पोलीस कार्यालय अशी दौड घेण्यात आली. हिंगोली पोलिसांनीही एकता दौड घेऊन एकतेचा
संदेश दिला.
छत्रपती संभाजीनगर इथेही एकता
पदयात्रा काढण्यात आली. तिचा समारोप राज्याचे इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे
यांच्या उपस्थितीत झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया - नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या वतीने आज “फिट इंडिया
फ्रीडम रन आणि स्वच्छता जनजागृती धाव” हा उपक्रम पार पडला. दौलताबाद इथं
देवगिरी किल्ल्यावरही रन फॉर युनिटी कार्यक्रम घेण्यात आला.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठात एकता दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले. इंदिरा गांधी आणि
सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड
जिल्हा परिषदेत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकता आणि
अखंडतेची शपथ घेत देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
****
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त
दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या एक हजार चारशे सहासष्ट
पोलिसांना जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या नऊ पोलिस अधिकारी तसंच
कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
****
राज्यात १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत
जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. आज मुंबईत त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘इज ऑफ
डुईंग बिझिनेस’ संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेत १५४
सुधारणांचा समावेश आहे, यात राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘चिंतन शिबिर’ आणि
विभागीय बैठका होतील, तसंच प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान
करण्यात येतील, अशी
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
‘मिशन
मौसम’ योजनेंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसवण्याच्या प्रस्तावाला केंद्र
सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.
जितेंद्रसिंह यांनी पत्राद्वारे ही माहिती दिल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे-
बोर्डीकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथे सी-बँड
प्रकारचा २५० किलोमीटर परिघ कार्यक्षेत्राचं रडार बसवण्याचं काम सुरू असल्याचं
बोर्डीकर यांनी सांगितलं. या केंद्रामुळे मराठवाड्यातल्या शेती, पीक संरक्षण, हवामान पूर्वसूचना आणि आपत्ती
व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे.
****
आदिवासी विद्यार्थ्यांमधील सुप्त
क्रीडा गुण विकसित करण्यासाठी ६०० विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधिनी स्थापन
करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी केली आहे. आज नाशिक इथं
मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या राज्यस्तरीय
क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या
स्पर्धेत दोन हजार ७०४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट
संघात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना यजमान
ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षण स्वीकारत भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. अभिषेक शर्मा आणि हर्षित
राणा वगळता इतर फलंजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघ १९ व्या षटकांत १२५
धावांवर सर्वबाद झाला. यजमान संघानं हे आव्हान १४ व्या षटकांत सहा गडी गमावत पूर्ण
केलं.
मालिकेतला पहिला सामना पावसामुळे
रद्द करावा लागला होता, तर तिसरा टी ट्वेंटी सामना दोन नोव्हेंबरला होणार आहे.
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला अंतिम सामनाही
याच दिवशी खेळवला जाणार आहे.
****
कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर
छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, पैठण आणि आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखड्यासंदर्भात
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज आढावा बैठक घेतली. नाशिक इथल्या आगामी
कुंभमेळ्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विविध
तीर्थक्षेत्रांना भाविकांकडून भेटी देण्याचा अंदाज असून त्या अनुषंगानं जिल्ह्यात
विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात
अतिवृष्टीबाधितांना जाहीर अनुदानाची रक्कम प्रशासनाला प्राप्त झाली आहे. हे अनुदान
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केलं जाईल,
असं तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे
यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यावर्षी
प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी एका
अ-मराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये,
मानचिन्ह आणि मानपत्र असं या
पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हवामान
राज्यात आज विदर्भ आणि
खानदेशातल्या काही जिल्ह्यांसह, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे. जालना, परभणी
तसंच हिंगोली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात उद्या मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment