Friday, 31 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं-केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन

·      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयकडून कापूस किसान मोबाईल ॲप विकसित

·      नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, आजही मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता

आणि

·      महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आयोजनाविषयी अधिक माहिती देणारा हा वृत्तांत…

‘‘स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैदराबादसह देशभरातल्या सुमारे सहाशे संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल हे भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचं औचित्य साधून यंदा देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. गुजरातमधे केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संचलनात विविध राज्यांची पोलिस दलं तसंच चित्ररथ सहभागी असतील. एकतेचा धागा या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथही यात सहभागी हो आहे. या महोत्सवात येत्या ७ आणि ८ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा दाखवणारं १५ ते २० कलाकारांचं सादरीकरण होणार आहे.

राज्यात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात पदयात्रा, निबंध वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची ओळख करुन दिली जाईल या उपक्रमात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्यशासनानं केलं आहे.’’

दरम्यान, पंतप्रधान काल गुजरात दौऱ्यावर दाखल झाले. त्यांच्या हस्ते काल सुमारे एक हजार १४० कोटी रुपयांच्या विकास योजनांचा प्रारंभ तसंच पायाभरणी करण्यात आली. एकता नगर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी २५ इलेक्ट्रिक बसचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या परिसरात ई बसची संख्या आता ५५ झाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सरदार पटेल यांच्यावरील विशेष टपाल तिकीट आणि दीडशे रुपयांचं नाण्याचंही काल प्रकाशन करण्यात आलं.

पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र पदयात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं सकाळी साडे सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून पदयात्रा सुरु होणार आहे.

****

शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं, असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. नवी दिल्लीत कृषी उत्पादक संघटनांच्या संमेलनात काल ते बोलत होते. आतापर्यंत कृषी उत्पादक संघटनामधे ५२ लाख शेतकरी सदस्य आहेत, आता एका वर्षात २ कोटी शेतकरी सदस्य व्हावेत असं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, असं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान

****

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रात्री मुंबई इथं सह्याद्री अतिथीगृहात शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्या बैठकीनंतर फडणवीस बोलत होते. सध्या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य असल्याचं फडणवीस म्हणाले. आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या आठवड्याअखेर १८ हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम दिली जाईल, असे निर्देश दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

दरम्यान, सरकारनं ई-पीक पाहणी नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागाकडून काल जारी करण्यात आलं.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातल्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चमर्यादा निर्धारित करून दिल्या आहेत.

****

निवडणूकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १८००-११-१९५० या टोल-फ्री क्रमांकावर नागरिकांच्या तक्रारींचं निरसन केलं जाणार आहे.

****

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कापूस महामंडळ- सीसीआयनं कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाव नोंदणी, वेळ निर्धारण प्रक्रियेसाठी मदत होणार आहे. हे ॲप कापूस हंगामात २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. या प्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कापस किसान ऑफसियल या युट्युब संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कापूस महामंडळानं केलं आहे. राज्यात अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी वेळ निश्चिती दररोज सकाळी १० वाजता सुरू होईल, अशी माहिती पणन महासंघाच्या वतीनं दिली आहे.

****

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत भुसे बोलत होते. शालेय पोषण आहार कामगारांना सध्या अडीच हजार रुपये मानधन दिलं जातं.

****

राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागेल, असा विश्वास, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्तवला आहे. वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित केली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत, यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत गोऱ्हे बोलत होत्या. शासनाने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं गोऱ्हे यांनी नमूद केलं.

****

लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथं रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोलंगे यांनी अतिवृष्टीने खराब झालेलं सोयाबीन रेणापूर तहसील कार्यालयात जाळत सरकारचा निषेध केला. अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला.

****

सरकारनं राज्याला थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार केला असून, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं, सार्वजनिक आरोग्य तसंच कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. “एक पाऊल थॅलेसेमीया मुक्तीकडे” या अभियानात त्या काल बोलत होत्या. या आजाराच्या रुग्णांसाठी परभणी जिल्ह्यात दहा खाटांचा स्वतंत्र रुग्ण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं, बोर्डीकर यांनी सांगितलं. परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात आयोजित या अभियानाचा आज समारोप होत आहे.

****

क्रिकेट

महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. काल मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच खेळाडू राखून पराभव केला. ३३९ धावांचं आव्हान भारतानं केवळ पाच खेळाडू गमावत पूर्ण केलं. जेमिमा रोड्रिग्सने १३४ चेंडूंमध्ये नाबाद १२७ धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूंमध्ये ८९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तत्पुर्वी, ऑस्ट्रेलिया संघानं ४९.५ षटकांत ३३८ धावा केल्या होत्या. स्पर्धेत रविवारी नवी मुंबई इथल्या डी वाय पाटील स्टेडिअमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान अंतिम सामना होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक १०३ पूर्णांक ७५ मिलिमीटर पाऊस हा हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव महसूल मंडळात झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २२० पूर्णांक ३० मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण १३७ पूर्णांक ३० टक्के पाऊस झाला आहे.

****

हवामान

राज्यात आज विदर्भ आणि खानदेशातल्या काही जिल्ह्यांसह, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

****

No comments: