Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
देशभरात मतदार याद्या विशेष
सखोल आढावा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून प्रारंभ
·
भारताचा सागरी दृष्टिकोन
सुरक्षा-स्थैर्य-आत्मनिर्भरतेवर आधारित-केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
·
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील मतदार याद्या आक्षेपांचं तत्काळ निराकरणाचे निर्देश
·
स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठात आण्विक डॉकिंग प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ
आणि
·
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची
दुखापतीमुळे चालू वर्षातल्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार
****
देशभरातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल आढावा मोहीम
स्पेशल इंटेन्सिव रिविजन-एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून प्रारंभ होत
आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. महाराष्ट्र वगळता बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही
मोहीम राबवली जाणार असल्याचं ज्ञानेशकुमार यांनी सांगितलं, ते
म्हणाले –
बाईट - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
मतदार याद्या अधिकाधिक शुद्ध करणं, हे
या मोहिमेचं उद्दीष्ट असून,
एसआयआरचा पहिला टप्पा बिहारमध्ये राबवण्यात आला. या
टप्प्यात सुधारित मतदार याद्यांबाबत एकही आक्षेप आला नसल्याचं, ज्ञानेशकुमार
यांनी सांगितलं.
निवडणूक यंत्रणेतले बुथलेवल ऑफीसर घरोघरी जाऊन या याद्यांची
पडताळणी करणार असल्याची माहिती ज्ञानेशकुमार यांनी दिली. ते म्हणाले –
बाईट - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
****
भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षा, स्थैर्य
आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
केलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन
झालं, तेव्हा ते बोलत होते. अलिकडच्या काळात करण्यात आलेल्या व्यापक संरक्षणात्मक
सुधारणांमुळे भारत एक मजबूत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचंही शहा
म्हणाले. गेट वे ऑफ इंडिया सारख्या ऐतिहासिक वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या
मेरिटाईम वीक या परिषदेत गेट वे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी विचारमंथन होणार
असल्याचं ते म्हणाले. वाढवण बंदराचा जगातल्या पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट बंदरामध्ये
समावेश होईल,
असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला, ते
म्हणाले –
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग
मंत्री सर्बानंद सोनोवाल,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. इंडिया मेरिटाईम वीक हा जगातल्या सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यापैकी
एक झाला असून त्यात ८५ देशांनी सहभाग घेतल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं. तर वाढवण
बंदरामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल, असा विश्वास फडणवीस
यांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या
दोन नौकांचं शहा यांनी आज मुंबईत माझगाव गोदीत लोकार्पण केलं. या नौकांची नोंदणी
प्रमाणपत्रं यावेळी लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली.
****
भारताची संरक्षण निर्यात आता २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या
विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. नवी
दिल्ली इथं एसआयडीएम वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. स्वदेश निर्मित
शस्त्रांस्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचंही सिंग
यावेळी म्हणाले.
****
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम
राहील, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हटलं आहे. ते आज
नागपूर इथं बोलत होते. महापालिकेची निवडणूक ही महायुती जिंकेल या भीतीपोटी
महाविकास आघाडी निवडणूक आयोगावर नाहक आरोप करत असल्याचं मतही आठवले यांनी व्यक्त
केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार याद्यांसंदर्भात
नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं, असे
निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात
याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्थानिक स्वरांज्य संस्था निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत
काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज
जैविक शास्त्र संकुलात राष्ट्रीय पातळीवरील आण्विक डॉकिंग या विषयावरील पाच दिवसीय
प्रशिक्षण शिबिराचं उदघाटन करण्यात आलं. हे प्रशिक्षण २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या
दरम्यान चालणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली
हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
****
येत्या दोन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी
निमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनानं स्वच्छतेला प्राधान्य द्यावं तसंच पंढरपूच्या
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आवश्यक सुविधेबरोबरच सुलभ आणि सुखकर दर्शनाचं
नियोजन करावं,
अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
दिल्या आहेत. यात्रा नियोजनाबाबत ते आज आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. कार्तिकी
यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी एक हजार पन्नास बससची व्यवस्था
केल्याचं सरनाईक यावेळी म्हणाले.
****
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने दुखापतीमुळे चालू वर्षातल्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार घेतली आहे. आपल्या समाज
माध्यमावरील संदेशातून सिंधूने ही घोषणा केली आहे. आपली सहायक टीम आणि क्रीडा
उपचार तज्ञ्जांशी चर्चा केल्यानंतर, हा निर्णय घेतल्याचं
सिंधूने या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात
आलेल्या ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त अहिल्यानगर इथं मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीत भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी उपस्थित
अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची’ प्रतिज्ञा दिली. यावेळी
तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं एचएनडी हॉस्टेल पुणे प्रकरणी सकल जैन
समाजातर्फे आज मुकमोर्चा काढून अशा घटना यापुढे होऊच नये, अशी
मागणी या वेळी करण्यात आली. राजाबाजार मंदिर, संस्थान गणपती मंदिर, शहागंज, चेलीपूरा, विभागीय आयुक्त कार्यालय मार्गे हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी पैठण येथेही याबाबत सकल जैन समाजाच्या वतीने देखील तहसिल
कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
****
सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा
रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ आज
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून तीव्र शब्दांत
निषेध नोंदविला. ही घटना केवळ एका डॉक्टरची नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या
सुरक्षिततेवरचा हा प्रश्न आहे, असल्याचं यावेळी संघटनेनं
सांगितलं.
****
नंदुरबार बस स्थानकासाठी देण्यात आलेल्या १०
इलेक्ट्रीक एसी बसचं लोकार्पण आज आमदार डॉ
विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. या बस स्थानकात गेल्या पाच ते सहा
महिन्यांपासून ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचं काम सुरु होतं. ते काम पूर्ण झालं असून या नवीन बस धुळे, नाशिक, पुणे, मुंबई
या मार्गावर धावणार असून,
यामुळे प्रवाशांना सोई सुविधा
लाभणार आहेत.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि
क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रव्यापी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या
अंतर्गत आज धुळ्यात जनजागृती फेरी काढण्यात आली. महिलांवरील अत्याचार, सायबर
जागरूकता, नार्कोटिक्स प्रतिबंध आणि पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक विषयांवरील जनजागृतीवर
विशेष भर देण्यात आला.
****
हवामान
राज्यात आज विदर्भातले काही जिल्हे तसंच मराठवाड्यात जालना, परभणी आणि हिंगोली जिल्हा वगळता सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment