Friday, 31 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. केवडिया येथील एकता नगर इथं झालेल्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी संबोधित केलं. आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या एकतेला बळकटी देण्याचा संकल्प केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करून दिवसाची सुरुवात केली. या प्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना एकता दिवसाची शपथ दिली. त्यानंतर भव्य एकता दिवस परेड झाली. या परेडमध्ये बीएसएफ, सीआरपीएफ आणि विविध राज्य पोलिस दलांच्या तुकड्यांचा समावेश होता. यावर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर आयोजित 'राष्ट्रीय एकता परेड'मुळे हा कार्यक्रम वैशिष्टय्पूर्ण बनला. या वर्षीचे एक वैशिष्ट्य म्हणजे बीएसएफच्या मार्चिंग तुकडीत केवळ स्वदेशी श्वान होते. 'विविधतेत एकता' या थीमचे प्रतिबिंबित करण्यासाठी डिझाइन केलेले दहा आकर्षक चित्रफित देखील विविध राज्ये आणि एनएसजी, एनडीआरएफकडून प्रदर्शित केली.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज शतकोत्तर सुवर्ण जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सरदार पटेल यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि ते देशाचे पहिले उपपंतप्रधान देखील होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील पटेल चौकात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. सरदार पटेल हे महान देशभक्त, दूरदृष्टी असलेले नेते आणि राष्ट्रनिर्माते होते, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. आपला दृढ  निर्धार, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी राष्ट्राला एका सूत्रात बांधण्याचे ऐतिहासिक कार्य केले. सरदार पटेल यांचं समर्पण आणि राष्ट्रसेवेची भावना सर्व भारतीयांना सतत प्रेरणा देत असते.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहीली. सरदार पटेल यांचा दृढ निर्धार आणि दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश एका लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र बांधला गेला, असं राधाकृष्णन यांनी एका संदेशात म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शाह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. सरदार पटेल यांनी संस्थानांचे एकत्रीकरण करून देशाची एकता आणि सुरक्षा अधिक बळकट केली, असं शहा यांनी एका संदेशाद म्हटलं आहे. सरदार पटेल यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी, वंचित आणि दुर्बल घटकांना एकत्र आणून देशाला स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेल्याचं शहा यांनी सांगितलं. सरदार पटेलांनी न्याय आणि एकतेच्या तत्त्वांवर आधारित उभं केलेल्या राष्ट्राचे संरक्षण करणे हे प्रत्येक देशभक्ताचं कर्तव्य आहे, असे शहा म्हणाले.

****

स्वातंत्र्यलढा आणि अखंड भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या दृढनिश्चय व समर्पणाचे स्मरण करून आपण सर्वांनी देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटिबद्ध राहावं, असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित एकता पदयात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज येथील उद्यानातील पुतळ्याजवळ झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता आणि स्वदेशी वस्तू वापराची शपथ देण्यात आली.

****

विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनेच्या १४६६ कर्मचाऱ्यांना वर्ष २०२५ साठी केंद्रीय गृहमंत्र्यांचं दक्षता पदक प्रदान करण्यात आलं. विशेष मोहिमा, तपास, गुप्तचर कार्य आणि न्याय वैज्ञानिक विज्ञान क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याची दखल घेत हे पदक देण्यात येतं. हा सन्मान प्रत्येक वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केला जातो.

****

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील ७६ प्रमुख रेल्वे स्थानकांवर आधुनिक प्रवासी होल्डिंग क्षेत्रे उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत राज्यातल्या आठ प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या होल्डिंग क्षेत्रांची बांधणी २०२६ च्या सणासुदीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, ही सर्व केंद्रे स्थानिक हवामान, प्रवासी गरजा आणि परिसराच्या परिस्थितीनुसार मॉड्युलर डिझाईनमध्ये केली आहेत.

****

No comments: