Sunday, 30 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2019....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९ दुपारी १.०० वा.
****
सुमारे चार महिन्यांच्या खंडानंतर आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चित्रपट, क्रीडा, कथा-कीर्तन क्षेत्रांतल्या धुरीणांनी, प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ‘हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती’ याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत, माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर ‘शेअर’ कराव्यात, असंही ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती, हे सांगतानाच, लाखो शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलांनी दिवस-रात्र परिश्रम केल्यामुळेच निवडणुका पार पडू शकल्या, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. २१ जूनला जगभरात ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आल्याबद्दल त्यांनी जगभरातल्या नागरिकांचे आभार मानले.
तसंच, ‘बुके नाही तर बुक’ या आपल्या आग्रहाचा पुनरुच्चार करतानाच, त्यांनी प्रेमचंद यांच्या कथांतील काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच, शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं, गुजरातमध्ये राबवण्यात आलेल्या ‘वांचे गुजरात’ मोहिमेचं उदाहरणही त्यांनी दिलं. 
****
जम्मू काश्मीरच्या, बडगाम जिल्ह्यातल्या, बुगाम चडूरा, भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. या परिसरात पोलीस आणि सुरक्षादलांनी घेराव करून शोधमोहीम सुरू केली असता, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. घटनास्थळावर हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आकाशवाणीला दिली आहे. तसंच मृत दहशतवाद्याची आणि त्याच्या गटाची ओळख पटवण्याचं कामही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणी वरुन दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून प्रसारित केलं जाईल. आजचा सामना जिंकल्यास भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल, तर इंग्लंडचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. भारत सहा सामने खेळून ११ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड सात सामने खेळून आठ अंकासह पाचव्या स्थानावर आहे. काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा, तर पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला.
****
हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर, कनेरगावच्या, पैनगंगा नदीवरच्या, पुलाजवळ रुळाखालची, पट्टी तुटल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून, या मार्गावर धावणारी अकोला-पूर्णा रेल्वे लाल झेंडी दाखवून थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. पट्टी बदलण्याचं काम केल्यानंतर एक तासाने रेल्वेगाडी मार्गस्थ झाली.
****
काल रात्रीपासून औरंगाबादसह मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे. सर्वदूर झालेल्या या पावसानं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात तुरळक हजेरी लावली. औरंगाबाद शहरात आज सकाळी १८ पूर्णांक ४ मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं. तसंच जिल्हाभरात सरासरी ४ पूर्णांक ३२, जालना जिल्ह्यात १२ पूर्णांक ४६, परभणीत १३ पूर्णांक ८१, हिंगोलीत १४ पूर्णांक ६२, नांदेडला १० पूर्णांक ३५, बीड जिल्ह्यात ९ पूर्णांक ४१, लातूरमध्ये ९ पूर्णांक ९१, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी ३ पूर्णांक ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, मुळा नदीवरील आंबित धरण भरले आहे. त्यातून ५०० क्यूसेक्स वेगानं पाणी त्याखालच्या पिंपळखांड प्रकल्पात सोडलं जात आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.06.2019 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Akashwani Aurangabad Urdu News Bulletin 8.40 AM 30.06.2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2019....07.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९  सकाळी ७.१० मि.
****
·      आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची सूचना.
·       गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
·      महिलांना राजकीय आरक्षण देण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका - प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे.
आणि
·      विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची सूचना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. दिल्लीत काल त्यांनी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यातल्या पक्ष नेत्यांची बैठक घेतली, या बैठकीत बोलतांना त्यांनी ही सूचना केली. बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची पक्षाची तयारी असल्याचं सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे, मात्र अद्याप दोन्ही पक्षात जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
सरकार पुढच्या वर्षीपर्यंत देशात 'एक शिधापत्रिका' योजना राबवणार आहे. या नव्या योजनेनंतर कुणीही गरीब व्यक्ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित झालेल्या नागरिकांनाही वितरण व्यवस्थेचा लाभ विनासायास घेता येईल. अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रासह इतर दहा राज्यांनी याआधीच या योजनेचा लाभ देणं सुरु केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
‘स्टार्टअप इंडिया’योजने अंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात एकोणीस हजार ३५१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून, यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक तीन हजार ६६१ ‘स्टार्टअप’ उद्योगांची नोंदणी झाली आहे. वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकवला आहे. राज्यात एकूण अडूसष्ट `स्टार्टअप`मध्ये ४४० कोटी ३८ लाख रुपयांची वैकल्पिक गुंतवणूक झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सहा आठवड्यांच्या उन्हाळी सुटीनंतर, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज उद्यापासून सुरू होत आहे. अयोध्या राम जन्मभूमी प्रकरण, राफेल खरेदी प्रकरण आणि राहुल गांधी यांच्याविरोधातलं न्यायालय अवमान प्रकरण आदी संवेदनशील खटल्यांवर यापुढे सुनावणी होणं अपेक्षित आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आपल्या संपूर्ण क्षमतेसह म्हणजे सर्व ३१ न्यायमूर्तींसह सुरू होईल, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं नमूद केलं आहे.
****
गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात काल भिंत कोसळून दगावलेल्या पंधरा जणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत बिहार आणि पश्चिम बंगालमधून आलेल्या कामगारांच्या कुटुंबातल्या पंधरा जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच, प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संवादाचा अनुवाद प्रसारित होईल, आज रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुन:प्रसारण केलं जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रम मालिकेचा हा ५४ वा भाग असेल. पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच कार्यक्रम आहे.
****
महिलांना राजकीय आरक्षण मिळावं ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं भाजप महिला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माधवी नाईक यांनी, येत्या राखीपौर्णिमेपासून सभासद नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल जाधव यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपडाळे यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव आणि भाजपच्या दिपाली लाड यांच्यात झालेल्या लढतीत दोघींनाही समान मतं मिळाली, त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीद्वारे जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली.
****
औरंगाबादच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यावर्षी बीडचे पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. प्रांत संघचालक मधुकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी या पुरस्काराचं वितरण औरंगाबाद इथल्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी दिली.  
****
क्रिकेट:
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला असून, एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
या स्पर्धेत काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा तर ऑस्ट्रेलियानं न्युझीलंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्ताननं पाकिस्तानला विजयासाठी २२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयानंतर गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतल्या अन्य सामन्यात, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं विजयासाठी न्यूझीलंडला २४४ धावांचं लक्ष्य दिलं होतं, मात्र न्युझीलंडचा संघ ४४व्या  षटकांत १५७ या धावसंख्येवर सर्वबाद झाला.
****
विद्यापीठं फक्त परीक्षेपुरती मर्यादीत न राहता तिथून संशोधन होण्याची आवश्यकता त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. समाज बदलायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे, राष्ट्राची आणि चारित्र्याची उभारणी शिक्षणामधून करण्याची गरज असल्याचं मत धारुरकर यांनी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी, निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ दिवसात कराव्यात, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी केलं.
****
राज्यात कालही अनेक भागात चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात काल रात्री तर, परभणी शहरासह जिल्ह्यात काल दमदार पाऊस पडला. मानवत, पाथरी, जिंतूर, सोनपेठ, तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेनं केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीसोबत पथदिव्यांबाबतचा करार केला आहे. यानुसार पहिल्या टप्यामध्ये सध्याचे पारंपारिक पद्धतीचे ९५ टक्के पथदिवे बदलण्यात येतील.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.06.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Saturday, 29 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2019....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-ट्वेंटी शिखर परिषदेत आज शेवटच्या दिवशी इंडोनेशिया, ब्राझील आणि तुर्कस्तानच्या अध्यक्षांशी चर्चा केली. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान उभयपक्षी व्यापारासाठी सुमारे ५० अब्ज अमेरिकन डॉलरचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. वर्ष २०२५ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचं असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि तर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यब एर्दोगान यांच्या बरोबरही व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याविषयी पंतप्रधानांनी आज व्यापक चर्चा केली.
****
‘एक देश एक शिधापत्रिका’ या धोरणानुसार केंद्र सरकारनं, राज्य सरकार आणि घटक राज्यांना नावं नोंदवण्यासाठी एक वर्षाची अंतिम मुदत दिली आहे. या योजनेनुसार शिधापत्रिका धारकाला देशातल्या कोणत्याही भागात स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेता येणार असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘सर्वांसाठी घरं आणि परवडतील अशी घरं’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात कोंढवा इथं तलब मशिदी जवळच्या झोपड्यांवर साठ फूट लांब भिंत कोसळल्यामुळं दगावलेल्या पंधरा जणांच्या कुटुंबीयांना बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात चौका, खुलताबाद तालुक्यातील काही गावं आणि वैजापूर तालुक्यातल्या सवंदगाव, लोणी बुद्रुक या गावांमध्ये मक्या अमेरिकन लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात जवळपास एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी होणार असून या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ दिवसात करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी यावेळी केलं.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला. मानवत, पाथ्री,जिंतूर सोनपेठ, तालुक्यात अद्याप सर्वत्र पाऊस पडत आहे. अमरावती जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस पडत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळं मुंबई गोवा महामार्गावर ठीक ठिकाणी भराव खचला आहे. काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. पालघर जिल्ह्यात सरासरी आतापर्यंत १७४ पूर्णांक ४४ मिमी पाऊस झाला आहे.
****
परभणी महानगर पालिकेच्यावतीनं शहरात स्वच्छता मोहीमेला सरुवात करण्यात आली असून शहरातील विविध परिसरातील अतिक्रमण आज काढण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जीर्ण असलेल्या इमारतीची पाहणी करून त्यांना तत्काळ नोटीस देण्याचे तसंच स्वच्छता विभागाची बैठक बोलावून शहरातील नाला सफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या पोरज इंथं विहिरीतलं पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्यानं मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुलं दबल्याची दुर्घटना घडली असून यात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन मुलं गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं  आहे. 
****
लातूर इथल्या गांधीचौक पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला लाच स्वीकारताना आज अटक करण्यात आली. एका खुनाच्या आरोपीला पोलिस कोठडीत न ठेवता न्यायालयात हजर केल्याचं बक्षीस म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागणाऱा नारायण गरड या पोलिसाला या प्रकरणी अटक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप केला. सातवा वेतन आयोग, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी आंदोलन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद – दि.29.06.2019 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बात...

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...