Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
June 2019
Time 18.00
to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१९
सायंकाळी
६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-ट्वेंटी शिखर परिषदेत
आज शेवटच्या दिवशी इंडोनेशिया, ब्राझील आणि तुर्कस्तानच्या अध्यक्षांशी चर्चा केली.
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान उभयपक्षी व्यापारासाठी
सुमारे ५० अब्ज अमेरिकन डॉलरचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. वर्ष २०२५ पर्यंत हे
उद्दिष्ट गाठायचं असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार
यांनी दिली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि तर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यब
एर्दोगान यांच्या बरोबरही व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याविषयी
पंतप्रधानांनी आज व्यापक चर्चा केली.
****
‘एक देश एक शिधापत्रिका’ या धोरणानुसार केंद्र सरकारनं,
राज्य सरकार आणि घटक राज्यांना नावं नोंदवण्यासाठी एक वर्षाची अंतिम मुदत दिली आहे.
या योजनेनुसार शिधापत्रिका धारकाला देशातल्या कोणत्याही भागात स्वस्त धान्य दुकानातून
धान्य घेता येणार असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे.
ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘सर्वांसाठी घरं आणि
परवडतील अशी घरं’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला
प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध
विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या
समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात कोंढवा इथं तलब मशिदी जवळच्या झोपड्यांवर
साठ फूट लांब भिंत कोसळल्यामुळं दगावलेल्या पंधरा जणांच्या कुटुंबीयांना बिहारचे मुख्यमंत्री
नितिश कुमार यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत
आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच
लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात चौका, खुलताबाद तालुक्यातील काही
गावं आणि वैजापूर तालुक्यातल्या सवंदगाव, लोणी बुद्रुक या गावांमध्ये मक्या अमेरिकन
लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात जवळपास एक लाख
८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी होणार असून या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ
दिवसात करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी यावेळी केलं.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला. मानवत,
पाथ्री,जिंतूर सोनपेठ, तालुक्यात अद्याप सर्वत्र पाऊस पडत आहे. अमरावती जिल्ह्यातही
सकाळपासून पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात
पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळं मुंबई गोवा महामार्गावर ठीक ठिकाणी भराव खचला आहे.
काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. पालघर जिल्ह्यात सरासरी आतापर्यंत १७४ पूर्णांक
४४ मिमी पाऊस झाला आहे.
****
परभणी महानगर पालिकेच्यावतीनं शहरात स्वच्छता मोहीमेला
सरुवात करण्यात आली असून शहरातील विविध परिसरातील अतिक्रमण आज काढण्यात आलं. आपत्ती
व्यवस्थापना अंतर्गत जीर्ण असलेल्या इमारतीची पाहणी करून त्यांना तत्काळ नोटीस देण्याचे
तसंच स्वच्छता विभागाची बैठक बोलावून शहरातील नाला सफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी
दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या पोरज
इंथं विहिरीतलं पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्यानं मातीच्या भरावाखाली चार
शाळकरी मुलं दबल्याची दुर्घटना घडली असून यात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
अन्य तीन मुलं गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथल्या गांधीचौक पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला
लाच स्वीकारताना आज अटक करण्यात आली. एका खुनाच्या आरोपीला पोलिस कोठडीत न ठेवता न्यायालयात
हजर केल्याचं बक्षीस म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागणाऱा नारायण गरड या पोलिसाला
या प्रकरणी अटक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या अकृषी विद्यापीठीय
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी
आज लाक्षणिक संप केला. सातवा वेतन आयोग, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर
वेतनश्रेणीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी आंदोलन करत असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment