Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
आर्थिक कारवाई
कृती दल अर्थात एफ ए टी एफनं सूचवलेल्या दहशतवाद विरोधातली कारवाई पाकिस्तान सप्टेंबर
अखेरपर्यंत पूर्ण करेल अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार
यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली आहे. एफ ए टी एफनं पाकिस्तानला दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या
गटांविरोधात कारवाई करण्यास अपयशी ठरल्यामुळं ऑक्टोबरपर्यंत कारवाई करण्यास बजावले
आहे; अन्यथा या प्रकरणी पाकिस्तानला काळ्या यादीतही टाकले जाऊ शकते असा इशारा दिला
आहे. इस्लामाबाद याबाबत विश्वसनीय आणि ठोस अशी भूमिका घेऊन कारवाई करेल, असंही कुमार
यांनी यावेळी म्हटलं.
****
जम्मू आणि
काश्मीर मधे बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी
ठार झाला. बोनियार पोलिस ठाणे परिसरात भुजथालान जंगलात सुरक्षा दलांकडून नियमित गस्त
सुरु असताना ही चकमक घडली. अतिरिक्त सुरक्षा दलांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं असून,
संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
****
केंद्रीय अन्वेषण
विभागानं २००९ मध्ये प्रशिक्षणासाठीच्या ७५ विमानांच्या खरेदीमध्ये कथित भ्रष्टाचार
प्रकरणी भारतीय हवाई दल, संरक्षण मंत्रालयातील अज्ञान अधिकारी आणि शस्रांस्रांचा डिलर
संजय भंडारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या खरेदीप्रकरणी सी बी आयच्या अधिकाऱ्यांनी
भंडारीच्या कार्यालयावर धाड टाकली असल्याचंही सी बी आयच्या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
या प्रकरणी स्वीत्झर्लंडस्थित पायलटस् एअरक्राफ्ट या कंपनीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात
आला. या प्रकरणी एकूण ३३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचं सी बी आयनं दाखल
केलेल्या गुन्ह्यात म्हटलं आहे.
****
पीक विम्या
पासून वंचित शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी त्वरीत पीक विम्याची रक्कम द्यावी, अन्यथा
त्यांची मुंबईतली सर्व कार्यालये बंद पाडू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
यांनी दिला आहे. त्यांनी आज औरंगाबाद नजीक लासूर स्टेशन इथल्या कृषि उत्पन्न बाजार
समितीतल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांसाठी
सरकार राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्यासाठी
शिवसेना कटीबध्द असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती
हवी असल्याचं त्यांनी म्हटलं. सत्तेत असलो तरी वंचितांसाठी आणि त्यांच्या न्यायहक्कासाठी
शिवसेना नेहमी लढा देणार असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
जालना जिल्ह्यातील
शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भातल्या अडचणी मदत केंद्रांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून
सोडवून शेतकऱ्यांना विमा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पर्यावरण
मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. शिवसेनेच्यावतीनं जालना आणि मंठा इथं सुरू करण्यात
आलेल्या पीकविमा मदत केंद्रास कदम यांनी आज भेट देऊन शेतकऱ्यांना हे आश्वासन दिल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातील
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या
चालू अधिवेशनात मार्गी लावू, असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकास तसंच महिला आणि बालविकास
मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला. पंतप्रधानांनी जाहीर केलेली
मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी
भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
संगमनेर इथली बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन पळविल्याची घटना आज पहाटे घडली.
नाशिक रस्त्यावरील या बँकेचं एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर चोरट्यानी
ते एटीएम मशीन घेऊन पळून गेले. तसंच वडगावपान इथंही एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला
असून यासंदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत साउथम्प्टन इथं खेळल्या जात असलेल्या भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या सामन्यात
भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना
भारतानं ४३ षटकांत चार बाद १९० धावा केल्या आहेत. भारताचा सलामीच्या जोडीतील रोहित
शर्मा हा केवळ एक धाव काढून बाद झाला तर कोहली आतापर्यंत सर्वाधिक ६७ धावा काढून तंबूत
परतला. अफगाणिस्तान कडून गोलंदाज मोहम्मद नबीनं सर्वाधिक दोन बळी घेतले.
****
No comments:
Post a Comment